रजनी करकुल सुंदर देखुनि अवतरसी ।

प्रगटे धरणीधर तो सोदर बहुत रसी ॥

धरुनि सगुणाकारा वज्रजन उद्धरिसी ।

रक्षुनियां वृंदारक असुरातें हरिसी ॥ १ ॥

जय देव जय देव जय राधारमणा ।

पयसागरतनयावर धाराधरवर्णा ॥

सुंदरवर पीतांबर धारीं मुरहरणा ।

करुणाकर मुरलीधर नमितों तव चरणा ॥ धृ. ॥

हस्ती धरुनी मुरली विचरसि गोपृष्ठीं ॥

मुष्टिक चाणुर दामिसि हाणुनि निजमुष्टी ॥

वृष्टी करितां इंद्रें बल्लव बहुकष्टीं ।

दृष्टीं देखुनी धरिसी गिरीवर अंगुष्टी ॥ जय देव. ॥ २ ॥

कामा सोडुनि सकळां सत्वर व्रजरामा ।

दामा देती तुजला देखुनि अभिरामा ॥

कामा पुरवुनि त्यांच्या टाळिसि भवभ्रमा ।

मामा मारिसी वारिसी रुक्मिणि आणि भामा ॥ जय. ॥ ३ ॥

कालिंदीचे जळीं होता बहुकाळीं ॥

काळीया तो गरळे बहुतांतें जाळी ॥

मौळी त्याच्या रगडति मर्दिसिजैं काळीं ।

गौळी म्हणती विजयी झाला वनमाळी ॥ जय. ॥ ४ ॥

मायावेषा धरिसी त्रिजगा सकळा या ॥

गाया करिसी कीर्ती अनुगां सकळा या ॥

देवा इच्छी बल्लव निशिदिनि यदुराया ।

कायावाचामनें नमितों गुरुपायां ॥ जय. ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel