श्रीकृष्ण गोविंद गोपाळ राधे । ओवाळूं आरती मंगळानंदें ॥धृ०॥

रोहिणीसुत बळिराम अनंत । अनंत श्रीकृष्ण हा भगवंत ।

अनंत पुण्याचें फळ हें सुबुद्धें ॥ओवाळूं० ॥१॥

ब्रह्म सनातन भक्‍तपरायण । आला तुझ्या गृहीं अदि नारायण ।

धन्य तुझें बाई भाग्य यशोदे ॥ओवाळूं० ॥२॥

धुंडितां सकलही ब्रह्मांड सृष्टी । न पडेचि हा रवि-चंद्राचे दृष्टीं ।

नाढळे जपतप श्रुतिशास्त्रवादें ॥ओवाळूं० ॥३॥

सकळही गोपी गोपाळ गवळी । आनंदें येऊनि कृष्णाचे जवळीं ।

गर्जती जयजय मंगळवरदे ॥ओवाळूं० ॥४॥

श्रावण अष्टमी प्रति कृष्णपक्षीं । गर्जती श्रीकृष्ण जयकृष्ण पक्षी ।

सुरवर मुनिजन गोधन-वृंदें ॥ओवाळूं० ॥५॥

गोकुळीं जन्मला हरी चक्रपाणी । जाहलें निश्‍चळ यमुनेचें पाणी ।

वाजती करटाळ मृदंग वाद्यें ॥ओवाळूं० ॥६॥

केशव माधव हे मधुसुदना । पंकजनेत्रा सुप्रसन्न वदना ।

दावी निरंतर चरणारविंदें ॥ओवाळूं० ७॥

जन्मला पुरुषोत्तम विश्‍वस्वामी । आनंदली सर्व पाताळ भूमी ।

जगीं धन्य विष्णूदास प्रसादें ॥ओवाळूं० ८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel