जगदीश जगदीश देव तुज म्हणती ॥
परि या जनामाजी देशील मुक्ती ॥
पुण्यपापविरहित सकळां अधिपती ।
जळीं नलिनी जैशी अलिप्त तव गती ॥ १ ॥

जय देव जय पंढरीनाथा ।
नुरे पाप विठ्ठल म्हणतां सर्वथा ॥ धृ. ॥

आगम निगम तूच नेणती कोणी ।
परि तूं भावभक्ती जवळीच दोन्ही ॥
नेणता विधियुक्त हा तें पूजूनी ।
न माये ब्रह्मांडी तो संपुष्टशयनीं ॥ २ ॥

असुरां काळ भासे विक्राळ पुढें ।
पसरी मूक एक चावी घो धुडें ॥
भक्तां शरणागतां चालतो पुढें ।
दावी वाट जाऊं नेदी वांकुडें ॥ ३ ॥

एकाएकीं बहु विस्तरला सुखें ।
खेळे त्याची लीला तोची कवतूकें ॥
तेथें नरनारी हीं कवण बाळकें ।
काय पापपुण्य कवण सुखदु:खे ॥ ४ ॥

सकळां वर्मा तूंची जाणसी एका ।
बंधमोक्ष प्राप्त आणिक सुख्नदु:खें ॥
जाणों म्हणतां तूज थकली बहुतेक ॥
तूका म्हणे शरण आलों मज राख ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel