तव ध्यानें माझें मन मोहित झाले ।
मनमोहन नाम तुझें म्हणूनी शोभलें ॥
भजनामृतप्रेमें । प्राशन पै केलें ।
करुणा करिं देवा सार्थक हें गमलें ॥ १ ॥
जय एव जय देव जय मंगलधामा ।
भावें भजतों तुजला दे सौख्या रामा ॥ धृ. ॥
देवा केलें तुवां अगणित उपकार ।
सकळहि जगतांचा तूंची आधार ॥
निजभक्तांचा घेसी माथां तूं भार ।
ऎशी करुणा तुझी देवा अपार ॥ जय देव . ॥ २ ॥
अर्पीली काया अवघी ही तूंतें ।
पातकि आहे परि तूं उद्धरी मातें ॥
शिशुहारी पडतां रक्षावे तातें ।
सांभाळीं धरुनीं निजभक्तांतें हातें ॥ जय. ॥ ३ ॥
आनंदाचा सतत दिन ऎसा यावा ।
मग आम्ही प्रेमाने करुं उत्सवा ॥
दयेने तो तुवां मान्य करावा ।
हेचि प्रार्थित आहें तुजपाशीं देवा ॥ जय देव. ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.