जगशिवशंकर गंगाधर गौरी कांता ।

प्रमाण आद्य गुरो तुज जय हर जगयंता ॥ धृ . ॥

कर्पुरगौरा कांती भस्मचर्चित काय ।

नीलप्रभ - कंठ विषें भूषणचि होय ॥

चंद्र दिवाकर वन्ही नेत्र तुझे तीन ।

चारी वेद मुखे तव दिव्य किती ध्यान ॥ १ ॥


न वर्णवे तव महिमा कुंठित मन - वाणीं ।

श्रुति ही मौनवीत त्या नेऽति असे म्हणुनि ॥

नटसी द्विगुणी परि तूं अससी गुणातीत ।

मायामय तव लीला मुग्ध करी चित्त ॥ २ ॥


होता भंग तपाचा जाळियला मदन ।

दक्षणखा नेसि लया होता अवमान ।

कल्पान्ती विश्वाचा करसि संहार ।

तांडव नृत्य तदा तव चाले बहु घोर ॥ ३ ॥


परि शिवा , तूं भोळा भाळसिं भक्तिला ॥

आत्मलिंगही देंसी रावण दैत्याला ॥

प्राशिसि विष जे दाहक हो ब्रह्मांडाला ।

भक्तिस्तव झेलिसि शिरी तू गंगौघाला ॥ ४ ॥


हर तूं हरसी पापा अन्   भव तापाते ।

शिव शंकर तूं देसी नित कैवल्यातें ॥

जय वरदा जय सुखदा सदाशिवा गतिदा ॥

गणेश नमुनी याची रति तव पायी सदा ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel