जय देव जय देव जन रतिपतिदहना ॥
मंगल आरती करितों छेदी अधविपिना ॥ धृ. ॥

गौरीहर गंगाधर तनु कर्पूरऎशी ॥
गजव्याघ्राची चर्मे प्रेमें पांघुरसी ॥
कंठी कपाळमाळा भाळीं दिव्य शशी ॥
अनिलाशन भूषण हर शोभत कैलासीं ॥ जय. १ ॥

त्रिपुरासुर अतिदस्तुर प्रबल तो झाला ॥
तृणवत मानित वासव विधी आणि हरिंला ॥
तेव्हां निर्जर भावें स्मरताती तुजला ॥
होउनि सकृप त्यांवरी मारिसी त्रिपुराला ॥ जय. ॥ २ ॥

जे तव भक्तिपुरस्सर जप तप स्तव करीती ॥
त्यांते अष्टहि सिद्धी स्वबलानें वरतीं ॥
शिव शिव या उच्चारे जे प्राणी मरती ॥
चारी मुक्ती येऊनी त्यांचा कर धरिती ॥ जय. ॥ ३ ॥

वृषभारुढा मूढां लावी तव भजना ॥
भवसिंधु दुस्तर तो करि गा सुलभ जना ।
होवो सुलभ मला तव मायेची रचना ॥
दास म्हणे ताराया दे तव सकृप वचना ॥ जय. ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel