जयशिवशंकर, सर्वेशा । परमेश्‍वर, हरिहरवेषा ॥धृ०॥

कर्पुंरगौरा, शुभवदना । श्रीघननीळा, मधुसुदना

सदाशिव, शंभो, त्रिनयना । केशवाच्युता, अहीशयना

अखंड, मी शरण मदनदहना । दाखवी चरण गरुडवाहना

चाल - दयाळा हिमनगजामाता । कृपा कर श्रीलक्ष्मीकांता

स्तवितों दिनवाणि, पाव निर्वाणीं, गजेंद्रावाणि

सोडवी तोडुनि भवपाशा । धाव अविलंबें जगदीशा ॥जय.॥१॥

सुशोभितजटामुकुटगंगा । धृतपदालंच्छनभुजंगा

वामकरतलमंडितलिंगा । त्रिशुळ, जपमाळ, भस्म अंगा

निरंजन, निर्गुण, निःसंगा । सगुण रुप सुंदर आभंगा

चाल- क्षितितळवटीं जगदोद्धारा । करुणामृतसंगमधारा

जाहली प्रकट, चिंतितां लगट, शीघ्र सरसकट

करी नटखट चट गट क्लेशा । पालटवी प्राक्‍तनपटरेषा ॥जय० ॥२॥

लाविती कर्पुरदिप सांभा । आरती करिती पद्मनाभा

दिसतसे इंद्रभुवन शोभा , कीर्तनें होति, गाति रंभा

निरसुअ कामक्रोधलोभा । लाभति नर दुर्लभ लाभा

चाल- द्विजांच्या सहस्त्रावधि पंक्‍ति । प्रसादें नित्य तृप्‍त होती

चंद्रदिप भडके, वाद्यध्वनि धडके, पुढें ध्वज फडके

पतित जन होती निर्दोषा । ऐकुनि भजनाच्या घोषा ॥जय० ॥३॥

दीन ब्रिद वत्स वाढविणें । यास्तव रचिलें वाढवनें

प्रभुच्या चरणाश्रयिं रहाणें । वांच्छिति सनकादिक शाहणे

कशाला भागिरथिंत न्हाणें । तरि नको पंढरपुर पहाणें

पहातां समुळ दुःख विसरे । भुलोकीं वैकुंठचि दुसरें

गरुड-बैलास, वाटे कैलास, चढे उल्हास

विष्णुदास पावे हर्षा । करितां नमन आदिपुरुषा ॥जय० ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to शंकर आरती संग्रह