१८७२ मध्ये मॅट्रीक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृष होते. त्यांच्या पत्नी तापीबाईपण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्विकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारिरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यांनी व्यायामशाळेला जाणे चालू केले आणि नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले. कुस्ती, पोहणे व नौका चालन हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षाअंती त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परिक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारिरीक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यात झाला.