आम्हां शूद्र शेतकर्‍यासंबंधीं आर्य भट ब्राह्यणांस सूचना, व सांप्रत सरकारनें कोणकोणते उपाय योजावेतः-
हें शेवटचें पांचवें प्रकरण सुरू करण्याचे पूर्वी या प्रकरणांत भट पडूं नये, या इराद्यानें या देशांतील महाधूर्त आर्य भटब्राह्यणांस या प्रसंगी कांहीं सूचना करितों. त्या योगानें आमच्या परदेशी विद्वान सरकारासह आपल्या स्वदेशी अज्ञानी " द्स्तू " शूद्र बांधवांचे डोळे उघडून शुद्धीवर येवोत, असें माझें देवाजीजवळ मागणे आहे. कारण त्यांनीं आतांशीं आपल्या धर्मरूपी तरवारीनें सर्व लोकांच्या. ऐश्वर्यांचे चरचरा गळे कापणार्‍या शास्त्नरूप खड्‌गास सोंवळयाच्या वळकुटयांनीं लपवून आपण मोठया स्वदेश अभिमान्यांचीं सोंगे आणून मांगामहाराकडे ढुंकून न पाहतां शूद्र, पारशी, मुसलमान लोकांतील अल्लड होतकरू पोरासांरांस एकंदर सर्व आपल्या पुस्त्कांनीं, वर्तमानपत्नानीं, सभांनी, वगैरे मार्गांनीं आपल्या देशांतील उच्चनीच भेदभावाविषय़ीं आपण सर्वत्नांनीं आपआपसांत कुरकुरण्याचे एकीकडे ठेवून, एकचित होऊन आपली सर्वांची एकी केल्याशिवाय या आपल्या हतभाग्या देशाची उन्नती होणे नाहीं, असा उपदेस करितात. हें ऐकून अक्षरशून्य शेतकर्‍यांनीं काहीं विपरीत आचरण करू नये, म्हणून येथे थोडास प्रसत्न करून पहातों. या उपर त्यांचे नशीब.
पूर्वी धूर्त भटब्राह्यणांच्या पूर्वजांनीं आपल्या धनुर्विद्येच्या जोराने ( द्स्यू ) शूद्रांवर वर्चस्व मिळवून त्यांजवर त्यांनीं आपला कडकडींत अम्मल बसविल्या दिवसापासून आज ह्जारों वर्षे पराजित झालेल्या ( द्स्यू ) शूद्र रयतेचा चालत आलेला व आजतागाईत त्यांनीं आपल्या ह्स्तगत झालेल्या शूद्रांस मतलबाने अज्ञानी ठेविल्यामुळे, शूद्र शेतकर्‍यास आपल्या मूळच्या वास्तविक मानवी-अधिकाराचा विसर  पडुन, ते यांनीं बनविलेल्या ग्रंथातील मतलबी मतास बौद्ध, महमदी व ख्रिस्ती पुस्तकांतील सार्वजनिक मानवधर्माप्रमाणे पवित्न मानून विश्वास ठेवूं लागल्यामुळें, एकंदर सर्व अज्ञानी शूद्र, ब्राह्यणांचे अंकित होऊन ते इतर मनुष्यमात्नांचा. अधिकारानुसारी खर्‍या धर्माचा तिरस्कार करून त्यांची निंदा करण्यामध्यें पुण्य मानू लागले. यामुळें ते यांच्याशीं कोणत्याही प्रकारच्या दगलबाज्या करूं लागले. तथापि हे ( शूद्र ) तसें करणें हा त्यांचा अधिकारच, असें मानूं लागले. व ब्राह्यणांच्या दगलबाज्यांविषय़ीं शूद्रांनीं शंकासुद्धां घेऊं नये, हाच काय तो शूद्रांचा धर्म, म्हणून जो प्रचार पडला, तो आजकाळपावेतों चालू आहे. यांतील वास्तविक व्यांगिताविषयी परदेशस्थ इंग्लिश सरकार व त्यांचें ऐषआरामी गोरे कामगार सर्व प्रकारें गैरमाहीत असल्यामुळें त्यांच्यानें याजविषयीं योग्य बंदोवस्त होत नाहीं. यास्तव एकंदर सर्व शूद्र शेतकर्‍यांची स्थिती एवढया दैन्यवाण्या मजलशीस येऊन पोहोंचली आहे व अद्यापही आपण नामानिराळें राहन परभारें शेतकर्‍यांकडून मोठमोठीं महत्वाचीं कामें करून घेण्याचे उद्देशानें हे ( ब्राह्यण ) आपल्या सभांनीं, वर्तमानपत्नांनीं व पुस्तकांनीं त्यांस आपल्या नादीं लावण्याकरितां नेहमीं उपदेश करितात कीं "शूद्र शेतकर्‍यांनीं ब्राह्यणांबरोबर एकनिष्ठेनें राहून त्यांच्याशीं एकी केल्याशिवाय या दुर्दैवी देशाची उन्नत्ति होणेंच नाहीं ." आतां ह्या त्यांच्या पोंकळ उपदेशावरून अज्ञानी शूद्र शेतकर्‍यांस उन्नत्तीच्या थापा देऊन, त्यास केवळ फसविण्याचा हेतु दिसतों. कारण ब्राह्यणांच्या पूर्वजांनीं आपल्या सत्तेच्या मदांत आपणास भूदेव मानून, निर्बळ शूद्र शेतकर्‍यांस दासासारखे बागवूं लागले. व ती अति नीच सुरू केलेली वहिवाट आजदिनपावेतों अन्य रीतीनें जागृत ठेविली आहे. यावरून शेतकर्‍याबरोबर अशी परकी ब्राह्यणांची एकी कशी होऊं शकेल, हें महाप्रतापी, " डॉक्टर फ्रॅकलीन " "टामस पेन " वगैरे प्रमुख गृहस्थांनीं या विद्येच्या प्रतापाने रात्नंदिवस सतत परिश्रम करून उद्योग करणारे अमेरिकन कसबी लोक आपल्या कलाकुसरीच्या सहाय्यानें युरोपखंडांतील एकंदर सर्व राष्ट्रांतील कारगीर लोकांस मागें हटवून, तेथील कोटयवधि रुपये साल दरसाल घेऊन जातात, ती विद्या ब्राह्यणांच्या पूर्वजांनीं आपल्या वर्चस्वाच्या धुंदींत शूद्र शेतकर्‍यांस देऊं नये, म्हणून आपल्या मतलबी ग्रंथांत अटोकाट बंदीचे लेख करून ठेविले. यामुळें या देशांतील खरी शिपाईगिरी व धनुर्विद्येची बढती होण्याचें काम अगदीं बंद पडलें. तसें जर नाहीं म्हणावें, तर आपण आपल्या डोळयांनीं नेहमीं पहातों कीं,आतांशीं शिंदे, होळकर वगैरे महापुरुषांच्या घराण्यांतील कित्येक तरूण खासें घोडयावर बसून भालेबोथाटयाची बरीच टुरटुर करितात, परंतु त्या ह्तभाग्यांस दुर्बिणी कशा लावून कोणत्या ठिकाणीं मोर्चे बांधून, तोफेचे गोळे कसे डागावेत, या कामीं ते काळया कपिला गाईचे बाप ! ते आपल्या पागोठयाला पिळावर पिळ घालून वडिवलांच्या अब्रूचा खराबा करून शूद्र शेतकर्‍यांचे उरावर खायला काळ आणि धरणीवर भार मात्न झाले आहेत. या कारणावरून अनेक वेळीं ’ फ्रेंच ’,’पोर्च्युगीज ’ व ’मुसलमान ’ वगैरे लोभी बादशहांनी या देशांत स्वार्‍या करून येथील अतोनात द्रव्य आपल्या देशांत घेऊन गेले, त्यांतून कित्येकांनीं ब्राह्यणांच्या मतलबी धर्माची विटंबना केली. अखेरीस कित्येक खुदापास्त मुसलमान सरदारांनीं हजारों भटब्राह्यणांच्या कानांला आपल्या मानवी धर्मांत ओढीत नेऊन त्यांच्या चटचटा सुंता केल्या. तथापि त्यांनीं हा काळपावेतों आपल्या संस्कृत पाठशाळांनीं शूद्र शेतकर्‍यांचे मुलांस विद्या शिकविण्याची बंदी कायम ठेविली आहेच. यावरून शेतर्‍यांबरोबर अशा ब्राह्यणांची एकी कशी होऊं शकेल ? आतां सृष्टीक्रमास ताडून पहातां ज्ञानाशिवाय मनुष्यामध्यें व एकंदर सर्व प्राणीमात्नांमध्यें इतर स्वभावजन्य गुण सर्व समान आहेत. असें अनुभवास येतें. जसें पशूस आहार, निद्रा, मैथून, आपल्या बच्चांची जतणूक करणें, शत्नूपासून आपला बचाव करणेंव पोट भरल्यावर डुरक्या फोडून धडका घेण्याशिवाय दुसरें कांहीं कळत नाहीं, यास्तव त्यांच्याने सदरच्या व्यवहारांत कोणत्याही प्रकारची तिळमात्न सुधारणा करवत नसल्यामुळें त्यांच्या मूळचा स्थितींत कोणत्याच तर्‍हेची उलटापालट होत नाहीं. परंतु मानव प्राण्यांस स्वभावतःच एक चमत्कारिक विशिष्ट बुद्धि आहे. तिच्या योगानें तो एकंदर सर्व जलजंतू, पशू, पक्षी, कीटक बगैरे प्राणीमात्नांमध्यें महत्त्वास चढून श्रेष्ठत्व पावला आहे व त्याच बुद्धीच्या योगाने त्यानें आपले विचार कागदांवर टिपुन ठेवण्याची युक्ति शोधून काढली. यावरून चोंहों खंडांतील लोकांस आजपावेतों लागलेल्या ठेचांविषयीं अनुभवशीर वृत्तांत टिपून ठेवितां आल्यामुळें हल्लीं जगांत अनुभविक ज्ञानभांडाराचा येवढा मोठा समुदाय जमला आहे व त्या अनुभविक ज्ञानाच्या सहाय्यावरून बुद्धीच्या मदतीनें युरोपियन लोक आपले महत्त्वाचे विचार तारायंत्नाद्वारें हजांरों मैलांचें अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळांत आगबोटींतून व आगगाडींतून वगैरे लक्षावधि खंडी धान्य एकमेकांचा बचाव करितात. आणि अशा बुद्धिमान मानवजातीपैकीं शूद्र शिवाजी शेतकर्‍यांनें एका देवास भजणार्‍या मुसलमानी बादशहास जरजर करून गाईब्राह्यणांसह त्यांच्या मतलबी धर्माचा प्रतिपाळ केला. हा प्रकार मनीं स्मरून अक्षरशून्य शूद्र शिवाजीच्या निमकहराम पेशवे सेवकानें शिवाजीच्या अज्ञानी वंशजास सातारचे गडावर कैदेंत ठेवून, त्यांची चौकशी ठेवण्याचें काम महाक्रूर निर्दय अशा त्निंबकजी डेंगळयावर सोंपवून आणि पुणें शहरांत आपल्या जातीच्या आर्य भटब्राह्यणांस रमण्यामध्यें रुपयेमोहोरांची दक्षिणा वाटून ब्राह्यणतर्पणें करून रात्नंदिवसकाळ कुष्णलीलेचें पुण्यआचरण करितां करितां, ब्राह्यणासारखे एकेरी धोतर नेसण्याबद्दल शूद्र शेतकर्‍यांसह शिंपी वगैरे जातीच्या लोकांस शिक्षा करीत बसले, इतकेंच नव्हे, परंतु हल्लींचे भटब्राह्यण शेतकर्‍यांच्या विष्ठा खाणार्‍या गायांचे मूत्नास पवित्न तीर्थ मानून त्याच्या सेवनानें शुद्ध होतात. आणि तेच भटब्राह्यण आपल्या मतलबी धर्माच्या हिमायतीनें शूद्र शेतकर्‍यांस नीच मानितात. यावरून शेतकर्‍यांबरोबर अशा ब्राह्यणांची एकी कशी होऊं शकेल ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel