श्रीगणेशायनम: ॥ श्रीआनंदमूर्तयेनम: ॥ घेतां सज्जनांचीं नांवें ॥
पापी जीव जरी स्वभोवें । त्यांहीं पुण्यवंत व्हावें । हें महिमान नामाचें ॥१॥
सत्कथा करितां श्रवण । पापी जन जाय उद्धरोन ॥
ऐसें बोलती गीर्वाण । व्यासाचिये भरतीं ॥२॥
बहु पुराणीं इतिहास । एतद्विषयीं असती बहुवस ॥
सूत - शौनक - संवाद विशेष । सत्कारोन होतसे ॥३॥
नृसिंह म्हणे दयाळा । चरितामृत ग्रंथ रसाळा ॥
प्रविष्ट होतां श्रोत्र - युगला । आनंद ह्रदयीं वोसरे ॥४॥
पुढें पवित्र निरूपण । करोन निववी अन्त:करण ॥
जया निरूपणीं सज्जन । होय म्हणती तें करी ॥५॥
अवश्य म्हणोनिया बापू । उद्युक्त सांगण्या जो सत्कृपू ॥
रोमांचयुक्त होऊनि वपू । निरोपी चरितामृत ग्रंथा ॥६॥
कोणी एके संवत्सरीं । दुर्भिक्ष पडलें पृथ्वीवरी ॥
श्रीचे उत्सवा भीतरीं । सामग्री जमली अनुष्टुपां ॥७॥
समुदाय मिळाला अपार परम । अन्यवर्ण आणि द्विजोत्तम ॥
बहुत करोनि पाहिला श्रम । सामुग्री न मिळे किंचित ॥८॥
ब्रम्हास्व घेऊनि सावकाराचें । कार्य केलें उत्सवाचें ॥
पुढें संकट ऋणमुक्तीचें । निवारिता श्रीरघुनाथ ॥९॥
दिनचर्या नित्यकृत्य । मठामाजीं साहित्य ॥
मिळवितां कष्ट बहुत । भिक्षाटण न मिळतां ॥१०॥
दुर्भिक्षयोगें बहुत ब्राम्हाण । भोजना येती साक्षेपें करोन ॥
तयांचें करितां संगोपन । परम संकट पडियेलें ॥११॥
रामनवमी भाद्रपदींचा । उत्सव प्रतिवर्षीं नेमाचा ॥
शिवाय दिनचर्या विप्रांचा । भोजनाचें मुक्तद्वार ॥१२॥
हें सदावर्त दृढतर । सिद्धि पावविता श्रीरघुवीर ॥
ऋण काढोन कुटुंबी विप्र । किती एक रक्षिले ॥१३॥
ब्राम्हाणभोजनामुळें यांस । ब्रम्हास्व जाहलें बहुवस ॥
ऐसें वृत्त पन्हाळ्यास । मामलेदारा कळों आलें ॥१४॥
तो संपन्न सर्वांविषयीं । बहुत धन त्या संग्रहीं ॥
धर्मानुकूल बुद्धी पाही । धीमंत आणि दयाळू ॥१५॥
तया उपजली बुद्धी । ब्राम्हाण भोजणनामुळें सुधी ॥
विप्र गुंतला ऋणबंधीं । मुक्त करणें बहु पुण्य ॥१६॥
ऐसें चित्तीं आणोन । स्वामींस आमंत्रण पाठवून ॥
किल्ले पन्हाळयास नेऊन । सत्कारिलें बहुसाल ॥१७॥
विचारी आनंदमूर्तींस । ब्रम्हास्व किती आपणांस ॥
श्रीनें कथिलें होतें तैसें । संख्या व्याज मुद्दलाची ॥१८॥
परिसतां तदनुरूप त्यानें । मोहरा पुतळया आणि होन ॥
किती येक मिळवोनी सुवर्ण । खिचडी केली द्रव्याची ॥१९॥
आसनीं बैसवोन स्वामिराजा । अर्ध्य - पाद्यादि केली पूजा ॥
उत्तम वस्त्रें देवोनि वोजा । अलंकारिली श्रीमूर्ती ॥२०॥
शेवटीं अभिषेक सुवर्ण । श्रीचे मस्तकीं करोन ॥
चित्तीं कृतार्थता मानोन । नमस्कारिलें साष्टांगीं ॥२१॥
ठेवोन घेतले किती एक दिवस । संतोषविले सन्मनास ॥
मग निरोप मठा जावयास । घेऊन निघाले श्रीमूर्ती ॥२२॥
द्रव्य मिळालें हें वर्तमान । तेथील मांगरामोशी यानें ॥
ऐकून योजना केली त्यानें । द्रव्य हरण करावें ॥२३॥
सांगलीस जातां विप्रमांदी । मार्गीं लुटावें अडचणी संधीं ॥
बातमी राखोनि अनवधी । वाटोवाटें निघाले ॥२४॥
मग रामोशी पाठीमागें । लुटावयाचा पाहती लाग ॥
निबिड संधींत आडमार्ग । रोधिते झाले तेधवां ॥२५॥
संपादित द्रव्य बरोबर । कंठाळ्या घातल्या अश्वावर ॥
सह ब्राम्हण पांच चार । आपण मार्गीं निघाले ॥
मातंगें लुटावें हांक देऊन । इतुक्यांत धर्नुर्धर दोघेजण ॥
पाठीं तूणीर करीं बाण । मनोहर रूपें दीसतो ॥२७॥
मांग रामोशी चोर पंक्ती । शंका पावले आपुले चित्तीं ॥
कोणी वाटसरू हे असती । गांठ तुटल्या मग लुटूं ॥२८॥
तेथोनिया एके ग्रामीं । वस्तीस आनंदमूर्ती स्वामी ॥
राहिलिया अंतर्यामीं । बातमी राखिती तस्कर ॥२९॥
तेथूनि प्रभातीं निघाले । चोर मंडळी मागें चाले ॥
संगतींत पाहूं लागले । तंव न दिसती धनुर्धर ॥३०॥
असती मंडळी ब्राम्हाण । आज करूं सर्वहरण ॥
पाठलाग करीत जाण । संधी पाहती लुटावया ॥३१॥
निबिडस्थळ चाळणा राखून । तस्कर गेलें वेगें करून ॥
गांठ घातली पाहून । शस्त्रें परजोन स्वहस्तेम ॥३२॥
खडग खेटक तूणीर । धनुष्या लाऊनि शर ॥
उभे राहिले समोर । पाहिल्या चोरें दोन मूर्ती ॥३३॥
संकट - हर्ता श्रीराम । भक्त - काम - कल्पद्रुम ॥
तेज: पुंज निरुपम । धनुर्धर प्रबळ रूपधारी ॥३४॥
तस्कार झाले भयाभीत । उभे ठेले सचकित ॥
तदा लुटावयाची मात । सहज सांडिली तस्करीं ॥३५॥
म्हणती आज प्रात: काळीं । फक्त होती द्विजमंडळी ॥
आतां आले त्यांचे जवळीं । धनुर्धर दोघे कोठून हे ॥३६॥
आतां असो या समयीं । गोष्ट ही करितां नीट नाहीं ॥
वेळ टाकोन पुढें पाही । संधी साधून लुटावें ॥३७॥
पुढें गाठिलें तया चोरें । तों संगें दिसती धनुर्धर ॥
ऐसेंच झालें तीन वार । तस्कार झालें हिंपुटी ॥३८॥
ऐसें करीत करीत । स्वामीस पोंचविलें सांगलींत ॥
लीलाविग्रही श्रीरघुनाथ । अगम्य चरित्न न वर्णवे ॥३९॥
मागून चोरही सांगलीस । येवोन भेटले श्रीमूर्तीस ॥
शस्त्रें ठेवून भूमीस । दंडवत् पडले पुढारा ॥४०॥
स्वामियें पुसिलें कोण तुम्ही । येरू बोलिले तस्कर आम्ही ॥
आपणां लुटावयाचे कामीं । उद्योग केला त्रिवार ॥४१॥
पाठीं रक्षिता श्रीरघुवीर । आपणां रक्षी निरंतर ॥
तेजस्वी पुरुष धनुर्धर । दोघे देखिलें तुम्हांसवें ॥४२॥
येरवीं पाहतां न दिसती । लुटते समयीं जवळ असती ॥
येथें येऊनि तयांप्रती । पाहतां न दिसती कोठेंचि ॥४३॥
तुम्हां रक्षी श्रीरघुराज । रोम वक्र करी कोण दुजा ॥
ऐसें स्पष्ट समजोन आज । शरणागत पातलों ॥४४॥
स्वस्थ नांदवें उघड द्वारीं । भय काळजी सांडोनि दूरी ॥
आपुला हस्त अभय शिरीं । मस्तकीं आमुच्या ठेविजे ॥४५॥
ऐसी ऐकतां चोर - उक्ती । सद्नदित आनंदमूर्ती ॥
नमन तया चोरांप्रती । करिते झाले साष्टांग ॥४६॥
तुम्ही थोर पुण्यवंत । म्हणोनि तुम्हां श्रीरघुनाथ ॥
दर्शन देऊनि झाले गुप्त । महिमा तुमचा अगाध ॥४७॥
बोलाऊनि मांदी तस्करांची । भोजन वाढिलें यथारुची ॥
समाधीनी करून त्यांची । राहविले दिन एक ॥४८॥
दुसरे दिनीं तयांसी । निरोप दीधला जावयासी ॥
लाला वर्णित गृहासी । चोर गेले आपुल्या ॥४९॥
द्रव्य आणिलें संपादून । तें कर्जदारांस देऊन ॥
श्रीमूर्ती अनृणी होऊन । योगक्षेम करिते झाले ॥५०॥
एक रघुवीर प्रसाद जरी । रोमाग्र कोण वक्र करी ॥
गोपाळात्मज संतांघरीं । भराडा होऊं इच्छित ॥५१॥
इति श्रीआनंदचरितामृत ग्रंथ । बापानंद - विरचित ॥
सदा परिसोत श्रोते संत । सप्तमोध्याय गोड हा ॥५२॥

॥ श्रीरघुनाथार्पणमस्तु ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel