आरती १ ली.

सद्रगुरु म्हणे शिष्या परिसी तूं आतां । मी हा देह ऐशा सांडूनि अध्यास ।
तूं तव सश्चिदघन सुखैकरूप । देहत्रय नव्हसी जड साभस ।
जयदेव जयदेव सच्चिदगननीळा । जडां तारक एक तूंचि दयाळा ।
दु:खनाशक सुखदायक त्रैलोक्यपाळा । तूं तंव आम्हां दीनांलागी स्नेहाळा ज० ज० ॥१॥
स्थूल देह जाग्रदभिमानी विश्व । नेत्रस्थान भोग स्थूल पै द्दश्य ।
वैखरीवाचा रजोगुण विलास । तूं तंव याचा साक्षी स्वयंप्रकाश ॥२॥
लिंगदेह तैजस स्वप्न अवस्था । कंठस्थान भोग प्रविविक्त जाणता ।
मध्यमा वाचा नव्हसी निभ्रांता । सकळिक सत्वगुण तूंचि पै द्रष्टा ॥३॥
कारणदेह प्राज्ञ अवस्था सुषुप्ती । मीच ब्रम्ह ऐसें जाणे तो ज्ञप्ती ।
पश्यंतीवाचा आनंदभोग नव्हसी । सकळिक तमोगुण तूं तव चिन्मूर्ती ॥४॥
महाकारण देह तुर्य अवस्था । मीच ब्रम्हा ऐसी जाणे व्यवस्था ।
तूं तंव प्रत्यगात्मा नव्हसी निभ्रांता । निर्गुण निर्विकार तूं ब्रम्हा सत्या ॥५॥
ऐसें त्वंपदलक्षण निरसन केलें । तत्पद ईश्वरलक्षीं सहज निरसलें ।
असिपद पूर्ण ब्रम्हा उरलें । तेंचि सद्‌गुरुनाथें आम्हांसी केलें ॥ ज० ज० ॥६॥

आरती २ री.

ब्रम्हानंदा सुखदा जय ज्ञान - मूर्तीं । द्वंदातीतानंता चिद्‌व्योमस्फूर्तीं ।
त्रिपदी साक्षा लक्षा सहज संविति । एका नित्या श्रुती न वर्णवे कीर्ती ।
जयदेव जयदेव सद्‌गुरु श्रीरामा । सुखमूर्तीं आरती जय पूर्ण कामा । ज० ज०॥१॥
जय अमला जय अचला बुद्धि - प्रकाशा । भावातीता त्रिगुण - रहिता भवनाशा ।
स्मरणें रजतम मोडुनि तोडिशि भवपाशा । त्वन्मय आरति ह्रदयीं सद्‌गुरु शांतेशा ॥ ज० ज०॥२॥
शिवह्रदया रघुराया सुखरुप निजनामा । भक्त गाती नाचति डोलति निजप्रेमा ।
चिदघना परिपूर्ण सहज निजधामा । अद्वय आरति हृदयीं दासा जयरामा । ज० ज०॥३॥

आरती ३ री.

कृष्णाविष्णुरूप पूर्व - वाहिनी । वेदरूप वेदावती स्वामिनी ।
उभय संगमयुक्त वाहे अनुदिनीं । श्रीराम श्रीस्वामी आले ठाकोनी ।
जयदेव जयदेव जय कृष्णा रामा । आरती ओवाळूं तुज पुरुषोत्तमा । ज० ज०॥१॥
गुणातीत रूप अवतार स्वामी । संपविला स्वलीलें वसंत ग्रामीं ।
तेथुनिया गमन पुण्य संगमीं । ब्रम्हानाळ क्षेत्र कृष्णातिरिं भूमी । ज० ज० ॥२॥
महायोगिराज श्रीगुरूमूर्तीं । वरदहस्तें भक्तां तारी निजकीर्ती ।
जयजयकारें घोष जयराम करिती । त्याची चरण धूळ आनंदमूर्ती । ज० ज० ॥३॥

आरती ४ थी.

सत्कर्म साधनें हो । सदाचार संपन्न । अनुष्ठान पूर्ण योगी । मंत्र मंत्रार्थ ज्ञान । शोधिर्ली सर्व शास्त्रें ।
क्रियारूप आपण । श्रीराम - नाम शोभे । गुरुराज चिदघन । जयजया योगमूर्ती ।
घनानंद निजकीर्तीं । श्रीराम - नाम दीप्ती । परब्रम्हा विख्याती । जय जया योगमूर्ती ॥१॥
विरक्ती पूर्ण भक्ती । ज्ञान संपन्न मूर्ती । विध्युक्त साधनें हो । साध्य सुख उन्नती ।
साधनातीत साध्य । अखंड समाधि ख्याती । बाणला बोध अंगीं । जगन्मिथ्या प्रतीती ॥ज०॥२॥
जीवन्मुक्त योगिराजा । सत्य - प्रतिज्ञा वोजा । कृपाळु दिनबंधू । ऐसा नाहीं पै दुजा ।
शापानुग्रह पूर्ण । ईश्वर पाहे पहा सहजा । तारिलें सर्व जनां । महानंदांतुनी ज्या ।
जय जया योगमूर्ती ॥३॥
सत्यज्ञान सत्यवेधी । सत्यवचन गुणनिधी । परब्रम्हाप बोधी । चिदानंद संसिद्धी ।
आनंद भक्तजना । आप्तस्वामि दयाब्धी । जयजयकार घोष । करिती बाल वृद्ध ती ।
जयजया योगमूर्ती ॥४॥
श्रीराम - नाम वाचे । सदा आनंद पूर्ण । श्रीगुरुराम स्वामी । दयानिधी संपन्न ।
साधनातीत साध्य । घनानंद चिदधन । आनंद राम - पायीं । लोळे अखंड दीन ।
॥ जय जया योगमूर्ती । घनानंद निज कीर्ती ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्रीआनंद - चरितामृत