चित्र :-- सुखाचा व स्वातंत्र्याचा सूर्य वर आहे. परन्तु अज्ञानाचे ढग घराभोवती असल्यामुळें त्याचा प्रकाश मिळत नाहीं. मशिदी, मंदिरे, चर्च, त्या चित्रांत आहेत, ढगांत गुरफटलेले गांव आहे.
हें चित्र नीट समजून घ्या. देवाची अशी का इच्छा असेल कीं तुम्हीं दु:खात असावें ? आईला कधीं वाटतें का, आपली लेकरें दु:खी असावी? परमेश्वर जगन्माऊली आहे. त्यानें आपल्या सुखाचा सूर्य सर्वांसाठी तळपत ठेवला आहे. परन्तु ढग आड आले तर? हें आपलें अज्ञान आड येतें, व सुखाचा किरण घरांत येत नाहीं. येथें हीं मंदिरें, मशिदी, चर्च दाखवले आहेत. याचा अर्थ हा कीं हिंदुस्थानांत नाना धर्म आहेत. मशिदींत, मंदिरांत, चर्चमध्ये जाणारे आहेत. सा-यांनी शिकलें पाहिजे. हे सारे हिंदुस्थानचेच लोक. ते आतां कोठें जाणार? मलबार किना-यावरचे ख्रिश्चन येथेंच राहणार. या सर्वांनी शिकावें. या मंदिरांतून, मशिदींतून सुंदर ज्ञान देणा-या शाळा निघाव्यात. तेथें ज्ञानाचा प्रकाश मिळावा असा हेतु आहे. कांही लोकांनी शिकून भागणार नाहीं. सारें शिका.
चित्र :-- म्यु.टीचा मनुष्य शिडी घेऊन कंदील लावीत आहे.
तुम्ही म्हणाल या चित्रांत काय आहे मोठेंसे? परन्तु त्यांत फार अर्थ आहे. म्यु.टीस सांगाल का कीं, एका गल्लींत दिवा लावला म्हणजे सर्व शहराला पुरें? नाहीं. असें म्हणणार नाहीं. दिवा प्रत्येक गल्लींत हवा. गल्लींत दहा दहा दिवे हवेत. ज्ञानाचें असेंच आहे. आपण म्हणतों, ''बामणांनीं शिकावें, कुणब्यांनी कशाला? '' परंन्तु तुम्ही म्हणाल का, ''बामणांच्या गल्लींत म्यु.टीनें दिवा लावावा. किसान कामगारांच्या गल्लींत नको? '' तुम्हीं म्हणणार नाहीं. त्याप्रमाणें ज्ञानाचा दिवा सर्व जातींत गेला पाहिजे. जो जो माणूस म्हणून आहे, त्याला ज्ञान हवें; लिहिता वाचतां आलें पाहिजे. खरें ना?
चित्र :--शेताच्या बांधावर एक सुखी शेतकरी बसला आहे. दुसरा एक दु:खी शेतकरी त्याच्या समोर उभा आहे.
हें चित्र शेतक-यांनी नीट बघावें. हा शेतकरी आनंदी आहे. हा दुसरा रडत आहे. कां बरें असें? तो दु:खी शेतकरी त्या सुखीं शेतक-याला विचारतो, ''तूं कां सुखीं, मी का दु:खीं? तूं काय पुण्य केलेंस, मी काय पाप केले?'' त्या सुखी शेतक-याच्या हातांत ती पहा वहीं आहे. ती जमाखर्चाची वही आहे. तो सांगतो. ''मी जमाखर्च नीट ठेवतों. हिशोब ठेवतों. सावकार, सरकार ह्यांचे जवळून पावती घेतों. यंदा पीक आलें नव्हतें. मामलेदाराला हिशोब दाखविला. त्यानें सारा सूट दिली. '' तूंहि गेला होतास सारा माफी मागायला. मामलेदार म्हणाले, '' जमाखर्च दाखव.'' तुला दाखवतां आला नाहीं. ज्ञान हवें, लिहिणें, वाचणे आलें पाहिजे. माझ्याप्रमाणें शीक. रात्रीच्या काँग्रेसने काढलेल्या वर्गांमध्यें जात जा.
चित्र :-- तुरुंगात कैदी शिकत आहेत. त्यांना काँग्रेसचे मंत्री शाबासकी देत आहेत.
हा तुरुंगाचा देखावा आहे. पूर्वी कैद्यांचे फार हाल होत. त्यांना तेथें माणुसकी नसे. परन्तु चोर तरी चोरी कां करतो? त्याला खायला नसतें, धंदा मिळत नाहीं. काँग्रेसच्या लक्षांत हे सारें आहे. तुरुंगात हाल न करतां या पहा शाळा काढल्या आहेत. सारे कैदी शिकत आहेत. हे काँग्रेस मंत्री या कैद्याला शाबासकी देत आहेत. तुरुंगातहि शाळा निघाल्या, मग तुमच्या घरीं नाहीं का शाळा सुरू करणार! मुलाबाळांजवळ शिका. तुरुंगाहून घरें नीच करूं नका.