वाचुन माझ्या डोळ्यात पाणी आल तुमच्या बघा येत का वाचुन.....

अनेक लहान सहान गावातून येणारी मातीची निमुळती पायवाट, एखाद्या मेन डांबरी रोडला मिळत असते.अशाच निमुळत्या पायवाटे वरुन चिखल तुडवत सागर , काँलेजला जाण्यासाठी बसची वाट बघत बसस्टाँप वर थांबला. गावाकडे बसस्टाँप म्हणजे एखादं पटकन लक्षात येणारं मोठ झाड किंवा एखादी पान टपरी. सागर ही वडाच्या झाडाखाली थांबला होता. नुकताच पाऊस पडल्याने वातावरण खुप प्रसन्न , हिरवगार वाटतं होतं. तरीही आभाळ थोड दाटलेलच होत . बसस्टाँप वर दुसर कोणीही नव्हतं. तेवढयात एक ५०-५५ वर्षाचे गृहस्थ हातात लाल पिशवी , खिशाला पेन , पांढऱ्या शर्टच्या खिशाला तंबाखूचे पिवळे डाग पडलेले. चप्पल थोडी फाटलेली , तुटलेली... पण तशीच शिवलेली. शेतात काम करुन टाचा उललेल्या.चेहरा माञ चिंतेने ग्रासलेला. डोळ्यात कसलतरी दुःख दाटलेलं. पिशवी खाली टेकवुन ते गृहस्थ वडाखाली बसले.तशी सागरने त्यांच्याकडे एक नजर टाकली. आणि त्यांच्या बाजुला थोडी जागा राखुन तो ही बसला. मोबाईल वर गेम खेळण्यात तो गुंतला. कमीत कमी दहा ते पंधरा मिनीटे असेच गेले असतील... पाखरांची किलबिल...निरव शांतता...थंडगार वारा. अचानक मुसुमुसु रडण्याचा आवाज आला. सागरने लगेच बाजुला वळुन पाहिले. बाजुचे गृहस्थ , हुंदके आवरण्यासाठी तोंडावर रुमाल दाबत होते. डोळ्यातुन माञ असंख्य धारा घळाघळा वाहत होत्या. सागर त्यांना बघुन अस्वस्थ झाला. मोबाईल खिशात ठेवुन तो त्यांच्याकडे सरकला.

सागर - काका, काय झालं ?
तसे ते गृहस्थ भानावर आले. डोळे पुसुन काहीनाही काहीनाही असा चेहरा करु लागले.

सागर - काका , कुणी काही बोलल का ? भांडण झालय का ?

तरीही काका नुसती मान हलवत होते.

सागर -कुणाची आठवण येतेय का ?
यावर गृहस्थ अजुनच रडायला लागला.

सागर - काही मनात असेल तर बोलु शकता. बोलल्याने दुःख हलक होतं.

 गृहस्थ भरल्या डोळ्याने सागर कडे बघु लागले. सागर कडे बघुन त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक. पण तोंडातुन शब्दांचा पाऊस कोसळावा तसे ते घडाघडा बोलु लागले. कधीकधी ओघाच्या भरात आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला सर्वकाही सांगुन जातो.

गृहस्थ - अवघड असतं स्वतः चे स्वप्न दुसर्यासाठी  सोडुन आयुष्यभर जगणं. रोज थोड थोड काळीज झिजतं. वडिल अचानक वारले, मी मोठा... छोटी बहिण भाऊ..आई. खाणारी चार तोंड. आठवीतच शाळा सोडली. मिळेल ते काम करायला लागलो. पैसे कमवायला लागलो. म्हणटल आपण नाही शिकलो तरी बहिण भावाला शिकवु. ते शिकले काय अन मी शिकलो काय ? एकच आहे. दोघांनाही शिक्षक बनवलं. लग्न लावुन दिलं. पण नंतर ते फिरकलेच नाहीत.
अवघड असतय दुसर्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आयुष्यभर कष्ट करुन पै पै जोडणं. मला गायक व्हायच होतं पण होता आल नाही. म्हणटल मुलाला गायक बनवु. तो गायक झाला.. मुंबईतच शिकला तिकडेच राहीला. परवा त्याला अँवाँर्ड मिळाला. त्यात म्हणाला , याच सार श्रेय माझे गुरु आणि बायकोला जातं. त्याच्या बोलण्यात मी कुठच नव्हतो रे...
मला पण वाटायच इस्ञीचे कपडे घालावे पाँश रहावे. पर रोज इस्ञिला ४ रुपय महिण्याचे १२०. ते मुलाला खर्चायला होतील म्हणुन कधीच इस्ञीचे कपडे घातले नाहीत. मला बी वाटायच गाडी घ्यावी पर पोराला काँलेज ला उशीर होतो आणि तास बुडतात म्हणुन त्याला गाडी घेवुन दिली. कसली चैन..मोज केली नाही. सगळ्यात जास्त वाईट कधी वाटतं माहितीये ,  ज्याच्यासाठी त्याग केला त्यालाच त्याची जाणीव नसते तेव्हा.
आता वाटतं काय कमवल मी आयुष्यात ? काहीच नाही..फक्त मन मारत जगत आलो. आता वय झालयं.,. मरणाची भिती झोप लागु देत नाही.आणि अर्धवट स्वप्न चैन पडु देत नाहीत. सारखे विचार येतात. मग बसतो समाधी लावुन. तर लोक म्हणतात वेड लागलयं. पण मी वेडा नाही रे... खरचं. एक कलाकार कलेसाठी हळवा असतो इतकच. बाकी काही नाही. माझा आवाज ऐकवु का तुला ? म्हणजे कळेल मी वेडा नाही, कारण  मेलेल्या स्वप्नांच दुःख च इतक जड असत की वेडं होवुनच ते पेलण्याची ताकत येते. बोलताना अश्रु वाहतच होते. चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. घुसमट बाहेर पडत होती. सागरला त्यांची तळमळ बघुन गहीवरुन येत होतं.

सागर - हो ऐकवा ना..

हो ऐकताच ते खुप खुश झाले. वर्षानुवर्षे होरपळलेल्या , घुटत आलेल्या एखाद्या कलाकाराला त्याची कला दाखवण्याची संधी मिळाली आणि त्याने ती न स्विकारावी तर नवलच. गृहस्थ आनंदाने गाणं म्हणायला तयार झाले. आजवर त्यांच गाण कुणीही ऐकल नव्हत.

      " तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी, हैरान हूँ मैं
       तेरे मासूम सवालों से, परेशान हूँ मैं
      जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे
      मुस्कुराये तो मुस्कुराने के, क़र्ज़ उतारने होंगे
    मुस्कुराऊं कभी तो लगता है, जैसे होंठों पे क़र्ज़ रखा है
      तुझसे..."

त्यांचा आवाज खरच अफलातुन होता. त्यातले चढ उतार मधुरता.. कणखरपणा अगदी परफेक्ट. जणुकाही हे गृहस्थ म्हणजे रानटी हिरा.. जो योग्य जोहरी न मिळाल्याने प्रसिद्धी पासुन कोसो दुर कड्या कपारीत दगडांमध्ये पडुन होता. एक वेगळा दुर्लक्षित दगड म्हणुन. आवाजाची किमया इतकी होती की झाडं ..पानं..फुलं..वेली आणि सागर सर्व तृप्त होत होते. इतकावेळ दाटलेल ढग सुद्धा बरसायला लागले. जणुकाही एका सच्च्या रसीकाप्रमाणे गाण्यावर ते दाद देत होते. गृहस्थाचे दुःख , त्याची कथा आणि आवाजातील जादू ऐकुन वड सुद्धा रडत होता.  पारंब्यातून अश्रुंच्या सरी बरसत होत्या. आभाळ कोसळत होतं. सागर आवाजात हरवला होता. तेवढयात बसच्या आवाजाने तो भानावर आला.

गृहस्थ - चल पोरा माझी बस आली.. येतो. लय बरं वाटलं बोलुन.

 गृहस्थ बस मध्ये बसुन निघुन गेले. सागर बसकडे बराच वेळ बघत होता. जणुकाही ती बस एका अज्ञात अवलीयाला घेवुन जात आहे , स्वतःच्या नकळत. आणि जाता जाता तो  अनामिक सुरांचा सम्राट खिडकीतुन आपल्या गाण्याचे बोल पावसाच्या सरीत मिसळण्यासाठी उधळत होता.
  सागरच्या मनात वादळ सुरु झालं. काही आठवणी आठवु लागल्या. त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम. हातावरच पोटं. मुलगा - मुलगी असा भेद नव्हता, पण..आई वडिलांनी सागर आणि त्याच्या बहिणीपुढे एक पर्याय ठेवला होता. ' आम्ही दोघांपैकी एकाच्याच शिक्षणाचा खर्च करु शकतो. तुम्ही दोघांनी आपआपसात ठरवा.. कुणी शिकायचं ते ?त्यावर बहिण म्हणाली , सागरला शिकवुया.तिचेही स्वप्न होते.  ती सागर इतकीच हुशार होती पण तिने त्याग केला स्वप्नांचा... भावासाठी. सागरच्या मनात एकच वाक्य घोळत होत , " वाईट याच वाटतं की ज्याच्यासाठी त्याग केला त्याला त्याची जाणीव नसते,"
सागरने फोन काढला आणि बहिणीला फोन केला.

बहिण - हा सागर बोल बाळा..
सागर शांत... तिचा आवाज ऐकत
बहिण - हँलो... बोल ना आवाज येतोय का ??
सागर - ताई.... Thank you..! I respect you.
बहिण - कशासाठी ?

सागरने फोन कट केला. पाऊस उतरला होता. मोबाईल च्या स्क्रिन वरील पावसाचे थेंब त्याने  पुसले . आणि जुना हिरोईनचा वाँलपेपर काढुन ताईचा फोटो सेट केला . फोटोकडे बघुन गोड स्माईल केली. फोटोवर मायेने ओठ टेकवले. आणि मोबाईल  परत खिशात टाकला. तेवढयात काँलेज ला जाणारी बस आली आणि तो गेला.
आपल्या आजुबाजुला , घरात अशी असंख्य माणसं असतात, जी नेहमी इतरांसाठी जगतात. सोप्प नसतं इतरांसाठी झुरणं आणि जगणं. सोप्प नसत समोरच्याच्या आनंदात आनंदी होणं. त्यासाठी खुप मोठ मन लागतं. गट्स लागतात. अशी आगळीवेगळी माणसं जपायला हवी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel