यशोदा सदाशिव साने
मृत्यू २ नोव्हेंबर १९१७

श्यामची आई नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो  आहे.

ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातलीसुद्धा नव्हती.   

कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे घरातल्या व्यक्तीसारखे पुजावे हे विलक्षण आहे.             

गुरुजींची आई कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. इतर भारतीय स्त्रियांसारखी माजघराच्या चुलीच्या धूरात विझून गेलेली ही आई. नवरा सासू सासरे मुले आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तीचं स्थान काय म्हणून कायम आहे?

वसंत बापट यांनी गुरुजींच्या एका नातेवाईकाला मोठ्या उत्सुकतेने विचारले होते की कशी होती हो गुरुजीची आई? तेव्हा तुसडेपणाने ते म्हणाले की अहो काही विशेष नव्हती. चार चौघीसारखी दिसायची.काही वेगळी नव्हती.

यावर वसंत बापट लिहितात की सामान्य असण्यातील हेच तिचे असामान्यत्व आहे.

मला 'शिक्षण विषयाच्या या लेखमालेत म्हणून गुरुजींच्या आईवर का लिहावेसे वाटते? महात्मा गांधी म्हणत की 'आई हे मुलाचे पहिले विद्यापीठ आहे'.या वाक्याच्या प्रकाशात गुरुजींची आई हीच एक शाळा आहे. शाळेत मूल असते ६ तास आणि उरलेले १८ तास घरात असते. त्याच्या आयुष्यात शाळा खूप उशिरा येते. सुरवातीची महत्वाची वर्षे या आईच्या विद्यापीठातच तर जातात. तेव्हा शाळा जीवनात काय करते याचे मूल्यमापन करताना आई नावाच्या शाळेत मूल काय शिकते आणि त्यापेक्षा काय शिकायला पाहिजे? हे या स्मृती शताब्दीच्या प्रकाशात आपण विचार करू या...

त्यासाठी अगोदर श्यामची आईची वैशिष्ठ्ये कोणती? ती महाराष्ट्राला एवढी का भावली? हे लक्षात घ्यायला हवे.

'श्यामची आई' कोणतेच तत्वज्ञान सांगत नाही. ती एक सोशीक भारतीय महिला आहे. अविरत कष्ट आणि पुरुषप्रधान व्यवस्था ज्याप्रकारे कुटुंबात स्त्रीला दुय्यम स्थान देतो तेच स्थान तिचे आहे. त्यामुळे ती स्वातंत्र्यवादी म्हणून आजच्या नव्या पिढीच्या महिलांना आदर्श वाटणार नाही, पण तिचे ते समर्पण केवळ गुलामी म्हणून बघता येणार नाही. ती हलाखीच्या दारिद्रयात अत्यंत स्वाभिमानी आहे.स्वत:च्या वडिलांना ही ती दरिद्रयात आम्ही आमचे बघून घेऊ हे सुनावते. सावकाराचा माणूस घरावर जप्ती आणू शकतो हे माहीत असूनही त्याने स्त्री म्हणून तिच्यावर शेरेबाजी करताच ती नागिणीसारखी परिणामाची पर्वा न करता त्याच्या अंगावर धावून जाते. हा तिचा दारिद्रयातला स्वाभिमान थक्क करून टाकतो. श्यामने कुठेतरी जेवायला गेल्यावर दक्षिणा आणल्यावर ती त्या गरिबीतही ते पैसे मंदिरात नेऊन द्यायला सांगते. गरिबीतल्या तिच्या या मूल्यसंस्काराचे भान महत्वाचे आहे.     ती स्वत: मुलांना आदर्श तिच्या समर्पणातून घालून देते.

मला स्वत:ला गुरुजींची आई एक शिक्षिका म्हणून खूप भावते. कुटुंबव्यवस्थेत ठरवले तर किती प्रकारचे अनुभव दिले जाऊ शकतात? छोट्या छोट्या प्रसंगातून ती जाणिवा विकसित करते. यासाठी मला ती भावते. ती पर्यावरण, जातीयतविरोध, गरिबांविषयी कणव, समर्पण हे सारं सारं शिकवते. श्यामने मुक्या कळ्या खुडल्यावर किंवा झाडाची जास्त पाने तोडली तरी ती आई त्याला पर्यावरणाची, झाडाच्या भावनांची जाणीव करून देते. आपला मुलगा भित्रा बनू नये म्हणून ती सक्तीने त्याला पोहायला पाठवते. दलित म्हातारी मोळी उचलू शकत नाही म्हणून त्या बुरसटलेल्या काळात श्यामला दलित म्हातारीला स्पर्श करायला लावते. या सर्व गोष्टीतून ती जे संस्कार त्याच्यावर करते ते त्या काळाच्या कितीतरी पुढचे आहेत.

सोप्या सोप्या प्रसंगातून ती जे तत्वज्ञान सांगते ते किती विलक्षण आहे. श्याम डोक्यावरचे केस वाढवतो. वडील रागावतात.तेव्हा श्याम वैतागून म्हणतो, “आई केसात कसला गं आलाय धर्म" तेव्हा ती म्हणते, "तुला केस राखायचा मोह झाला ना. मग मोह टाळणे म्हणजे धर्म!" इतकी सोपी धर्माची व्याख्या क्वचितच सांगितली असेल. किंवा लाडघरच्या समुद्रात ती समुद्राला पैसे वाहते. तेव्हा श्याम म्हणतो की ज्याच्या पोटात रत्न आहेत त्याला पैसे कशाला? तेव्हा ती म्हणते की सूर्याला ही आपण काडवातींनी ओवाळतोच ना? प्रश्न त्या कृतज्ञतेचा आहे.

मला तिचे मुलाला केवळ उपदेश न करता ती हे संवादी राहणे विलक्षण हलवून टाकते. मूल जे विचारील त्याला ती प्रतिसाद देते आणि तिच्या समजुतीनुसार ती समजून सांगत राहते. आजच्या नव्या पिढीच्या मातांसाठी श्यामची आई मला म्हणूनच महत्वाची वाटते. आज एकतर मुलांशी बोललेच जात नाही व जे बोलले जाते ते मुलाच्या करियर च्या भाषेत आणि मुलाला त्याचे दोष सतत सांगत. पण श्यामने इतक्या गंभीर चुका करून ही ती सतत करुणेने ओथंबली आहे. आज हा संवाद आणि मुलांशी त्याच्या पातळीवर जाऊन व्यक्त करणेच कमी झाले आहे. असलाच तर 'श्यामच्या आई' चा हा धागा महत्वाचा आहे.

अभावातले आनंद आणि समर्पणातला आनंद ती मुलांना शिकवते. स्वत:ला सणाच्या दिवशी साड्या नसताना स्वत:ला आलेल्या भाऊबीजेतून ती पतीचे फाटके धोतर बघून नवे धोतर आणवते. मुलांना त्यातून एकमेकांसाठी काय करायचे असते याचे भान येते.

आजच्या पिढीच्या मातांसाठी श्यामच्या आईचे आज औचित्य काय आहे?

अनेकजण असे म्हणतील की आज काळ बदलला आहे. आजचे प्रश्न वेगळे आहेत. मुले आता काही श्याम इतकी भाबडी राहिली नाहीत. मोबाइल आणि संगणक वापरत ही पिढी खूप पुढे गेली आहे.

हे जरी खरे असले तरी मुलांमधील बालपण जागवायला मुलांना संवेदनशील आणि सामाजिक बनवायला श्यामच्या आईचीच पद्धती वापरावी लागेल.

आज मध्यमवर्ग /उच्च मध्यमवर्गात मुलांवर सुखाचा मारा होतो. त्यातून त्याच्या संवेदना तरल राहत नाहीत. अभाव वाट्याला न आल्याने गरीबी वंचितता याची वेदना कळत नाही किंवा आजूबाजूचे जग हे ही सुखवस्तू असल्याने या गरीबांच्या जगण्याचा परिघच परिचित होत नाही. पुन्हा वाचन, संगीत, निसर्ग असे अनुभव बहुतेक घरात न दिल्याने मुले टीव्ही, मोबाइल, कार्टून, दंगामस्ती असले स्वस्त आनंदाचे मार्ग शोधतात व त्यातून त्यांची विचारशक्ती व संवेदनाच विकसित होत नाही.

आपली मुले एकमेकात ज्या गप्पा मारत वेगाने आत्मकेंद्रित होत आहेत. समाजातील वंचितांविषयीची वेदना त्यांना हलवत नाही. डिस्कवरी वृत्तवाहिनीवर वाघ हरणाचा पाठलाग करीत असतो. हरिण जिवाच्या आकांताने पळत असते. ज्या क्षणी वाघ हरिणावर झेप घेते तो क्षण आपल्याला बघवत नाही आपण चॅनल बदलतो. पण आपली मुले रिमोट हिसकवून घेत ते दृश्य बघतात. हे बघून भयचकित व्हायला होते. हीच मुले अपघात आणि खून ही असेच लाईव्ह बघतील. मुलांचे हे कोलमडणारे भावविश्व ही मला चिंता वाटते आणि हीच मुले उद्या अधिकारी होणार आहेत. निर्णयप्रक्रियेत सहभागी असणार आहेत. त्यांना गरिबांचे, पर्यावरणाचे प्रश्न तरी कळतील का?

पुन्हा या सर्वातून मुलांचा अहंकार चुकीच्या पद्धतीने विकसित होतो आहे. थोडे बोलले तरी मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत.

पालकांची स्वयंव्यग्रता ही पुन्हा समस्या बनली आहे. पालक दिवसभर काम आणि घरी आल्यावर टीव्ही फोन आणि सोशल मीडियात रमून गेलेत. याला मुलांच्या आई ही अपवाद नाहीत. यातून मुलांशी संवाद बंद झालेत. घरात वस्तु मिळताहेत पण प्रेम आणि संवाद मिळत नाहीये. यातून मुले प्रेम दुसरीकडून मिळवतात आणि संवाद ही चुकीचा करू लागतात.

इथेच नेमकी श्यामची आई मला महत्वाची वाटते. ती मुलाशी सतत बोलत राहते. न चिडता ती त्याला समजून घेते. छोट्या छोट्या प्रसंगातून त्याला मूल्य परिचित करून देते. केवळ शब्दाने संस्कार करण्यापेक्षा आपल्या अपरिमित कष्टाने आणि मायेने संस्कार करते. आजच्या सुशिक्षित कुटुंबातील श्यामच्या आईकडून हे शिकायला हवे. मुलांशी बोलावे कसे एवढे शिकण्यासाठी या स्मृतीवर्षात श्यामची आई आपण प्रत्येक पालकाने वाचावी. त्या आरशात आपले पालक असणे तपासून बघता येईल.
            
'श्यामची आई स्मृतीशताब्दी' हे उपक्रम होऊ शकतात...
 
श्यामची आई पुस्तकाचे वाचन पालकांनी करणे...

श्यामची आई चित्रपट सर्वत्र दाखविणे...

'आजच्या मुलांचे प्रश्न व सुजाण पालकत्व' या विषयावर व्याख्याने, चर्चा घडविणे...

महिला मंडळे, बचत गट, शाळांचे माता पालक संघ इथे मुले, श्यामची आई व माता अशा चर्चा घडविणे...

मुलांसाठी श्यामच्या आईतील एक प्रसंग अशी भाषण निबंध किंवा चित्रकला स्पर्धा घेणे....इ.  

~ हेरंब कुलकर्णी
फोन 9270947971

herambkulkarni1971@gmail.com

साने गुरुजींची प्रसिद्ध आई २ नोव्हेंबर १९१७ रोजी मृत्यू पावली. तिची स्मृतिशताब्दी २ नोव्हेंबर ला सुरू झाली त्यानिमित्ताने सकाळ च्या सप्तरंग पुरवणीत हेरंब कुलकर्णी यांचा प्रसिद्ध झालेला लेख.

सौजन्य पद्मभूषण देशपांडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel