माझ्या आई-बाबांनी एकमेकांना त्यांच्या नावाने कधीच हाक मारली नाही... निदान आमच्यासमोर, चार चौघात तरी नाहीच. त्यावेळी यांना एकमेकांजवळ बसून अगदी प्रेमाचं तर सोडाच, पण कधी साधं कुजबुजतांनाही ऐकल्याचं आठवणीत नाही.
बाबा आईसाठी साडी घेऊन येत असत नवी, तेव्हा तीला जवळ बोलावून प्रेमाने तीच्या हातात ती देणं हा प्रकार नसे तर पिशवी टेबलावर ठेऊन बाहेरुनच आेरडून सांगत असत "अगं हे बघ जरा बरंय का?" आणि आईला ते बरं नाही तर कायम अप्रतिमच वाटत असे... बदला बदलीचा प्रश्न कधीच ऊद्भवला नाही.
बाबा आईवर आेरडायचे... चिडायचे... अगदी आमच्यासमोर तीला बोलायचे पण आईने चुकून कधी 'अरे' ला 'कारे' केल्याचं पुसटसही स्मरणात नाही. तसं करणं चुकिचं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाहिये पण त्याकाळातही बाई नोकरी करत असे... कदाचित घरच्या परिस्थितीमुळे पण... "मीही कमावते... मीही खुप दमते... मग मीच एकटीने का म्हणून करायची घरीही राब राब?" हे वाक्य त्या पिढीतील कुठल्याही बाईने, तीच्या नव-याला ऐकवलं नसेल... कधीच.
राग यायचा बाबांचा... एक wicked thought यायचा खुप लहान असतांना मनात की, सुट्टीच्या दिवशी दुपारचं जेऊन मस्त घोरत पडलेल्या बाबांच्या ऊघड्या राहिलेल्या तोंडात भांडंभर पाणी ओतावं नी पळून जावं... पण हा विचार मी त्या कधीच न घेतलेल्या भांड्यातील पाण्याच्या घोटाबरोबरच गिळत असे.
पण जसं वय वाढू लागलं तसं बाबांचंही contribution घरातलं कळू लागलं... एक भक्कम अस्तित्व त्यांचं अाम्हा सगळ्यांना निर्धास्त करत असे, यात काडीमात्र शंका नाही. या माझ्या बाबांना आईच्या आजारपणांत... दोन-एक मोठ्या आॅपरेशन्स दरम्यान मी दिवस रात्र तिच्यासाठी झटतांना पाहिलंय... तीच्या उशाशी जागतांना पाहिलय, एखाद्या क्षणी हतबल... हळवं होऊन डोळ्यांची आेली किनार रुमालात लपवतांना पाहिलंय. गोवंडीला झालेली अाईची बदली जीवाचा अाटापीटा करुन, महिन्याभराच्या अात विक्रोळीला अाणून ठेवल्याचंही पाहिलंय. माहेराला गिरगावात आलेल्या आईला नी आम्हाला, दिवसाआड आॅफिसमधुन येऊन... भेटुन... फक्त डोळ्यांवाटे तीची चौकशी करुन... आधी डोंबिवली नी मग मुलुंडला अपरात्री परततांना पाहिलय.
अाता आई बाबांवर आेरडते... आणि बाबांची गोगलगाय होते... पण आईचा राग येत नाही... ऊलट मजा वाटते, फिरलेली चक्र पाहून. कारण मला माहित असतं की हे तीचं आेरडणं म्हणजे स्वतःआधी बाबांसाठी जगणं असतं. बाबांची आैषधं... पथ्य-पाणी ही तीची priority झालीये अगदी स्वतःची, वितभर वरुन बोटभर झालेली खळगी भरण्याही आधीची. बाबांनी कमरेला पट्टा बांधलाय... नाही बांधलाय याला ती अापण गळ्यात मंगळसुत्र घातलय... नाही घातलय या गोष्टीईतकच महत्व देते. रात्री झोपतांनाही मंगळसुत्र गळ्यातुन न काढणारी ती, बाबांनी पट्टा काढलाय की नाही हे आवर्जुन बघते.
आमच्या पिढीच्या ऊघड... ऊथळ... दिखाऊ प्रेमापेक्षा, ह्या पिढीचा अव्यक्त... अबोल... खोल जिव्हाळा हे अनाकलनीय सत्य आहे माझ्यासाठी... अगदी निर्विवादपणे. आयुष्यभर एकमेकांशी चार घटकाभरही निवांत होऊन न बोललेली ही पीढी, एव्हढी घट्ट एकमेकांशी कशी राहू शकते? एकमेकांना कधी चोरटा स्पर्श ही न करणारी ती पीढी, फक्त डोळ्यांतून साठलेल्या प्रेमावर एव्हढा लांबचा पल्ला एकत्रीत कसा गाठू शकते?? हे मला सतावणारे गहन प्रश्न होते... आहेत... राहतील.
ह्या त्यांच्या अबोल 'Attachment'ला खरंच माझं साष्टांग दंडवत अाहे.
#Touchwood
---सचिन श देशपांडे