श्रीगणेशाय नमः । श्रीमत्त्रिपुरसुंदर्यै नमः ।

जयजयाजी संकटहरणा । जगत्कारणा विश्वभूषणा । सिद्धिबुद्धी आनंदवर्धना । मनमोहना गणपती ॥१॥

सिद्धिबुद्धी कुचदुर्गविहारा । सच्चिदानंदा परात्परा । मनविश्रामा लंबोदरा । विश्वंभरा सुखाब्धे ॥२॥

श्रोते व्हावे सावचित्त । पुढे ऐकावे गोड चरित्र । पार्वती म्हणे गा तात । कथी चरित्र इंदुमतीचे ॥३॥

हिमालय म्हणे गे कन्यके । इंदुमती विव्हल सदा शोके । द्वादशवर्षे लोटता दुःखे । कर्म खंडले तियेचे ॥४॥

नारद करिता पलाटण । प्रवेशला तिचे भुवन । इंदुमती तयासि पाहून । करी नमन सलज्ज ॥५॥

करोनिया अधोवदन । उभी राहिली कर जोडून । रहित सौभाग्यचिन्ह पाहून । सुहास्यवदन बोले ऋषी ॥६॥

कनकलतिके कुरंगनयने । भुजंगवेणी इंदुवदने । बिंबाधरे मणिमयरदने । का गे भूषणे त्यागिली ॥७॥

भाळी लावी रक्तकुंकुम । तळी रेखी मृगमदोत्तम । सौभाग्य शोभा करी परम । करी कंकणे भरी का ॥८॥

ऐकोन नारदाची वाणी । स्फुंदस्फुंदोन रडे तरुणी । म्हणे करू कसी करणी । विपरीत ऋषिवर्या ॥९॥

राक्षसाची भीती पावला । माझा पती जळात पडला । पुन्हा वरता नाही आला । जळी बुडाला तडागी ॥१०॥

जीतपणाची न लागता खबर । कैसा करु गा शृंगार । ऐकूनिया धातृकुमर । प्रत्युत्तर बोले तिसी ॥११॥

जीत तुझा प्राणेश्वर । आहे शृंगार करी सत्वर । ऐकोनि साधूचे उत्तर । विश्वास थोर मानिला तिणे ॥१२॥

आदर्श घेऊनिया सुंदरी । निढळी रेखी कुंकुमचिरी । रत्‍नजडीत अलंकारी । ठाईठाई शृंगारली ॥१३॥

सौभाग्यभूषणे अलंकृत । नारदासि करी दंडवत । मुनि आशीर्वाद देत । सौभाग्य अद्भुत वाढो तुझे ॥१४॥

इंदुमती म्हणे मुनिवरिष्ठा । आता खंडी माझ्या कष्टा । तुझे वचनी माझी निष्ठा । केली प्रतिष्ठा प्रमोदाची ॥१५॥

माझा नाथ आहे कोठे । हे कथिजे मुनिश्रेष्ठे । जेणे व्रते माझी संकटे । खंडोन सुख पावेन मी ॥१६॥

येरू म्हणे वो सुंदरी ऐक । तुवा उपासावा विनायक । श्रावण शुक्ल चतुर्थी अलोलिक । व्रतारंभ दिवस तो ॥१७॥

ते दिवसापासून मासवधी । भाद्रपद शुक्ल चतुर्थी वरी साधी । नित्य मृण्मय गणपति आराधी । कार्यसिद्धी होय तेणे ॥१८॥

करोनिया मंगलस्नान । शुद्धवस्त्र परिधान । नित्यकर्म आचरोन । व्रतनिधान आचरे मग ॥१९॥

सद्विप्राचेनि मुखे । श्रवण करोनि विधान हरिखे । राजोपचारे देखे । विघ्नहरण पूजावा ॥२०॥

ऐसे करिसी सांग व्रत । तरी तुष्टोनि एकदंत । तुझा तुज पाववील कांत । निश्चितार्थ हा जाणे ॥२१॥

ऐसा सांगोन व्रतमहिमा । संतोषविली चंद्रांगदरामा । नारद गेला विष्णुधामा । मग ती भामा व्रत करी ॥२२॥

अष्टांगभावे करिता व्रत । एक मास लोटता एकदंत । प्रसाद करी दीननाथ । नागकन्यास देत सुबुद्धी ॥२३॥

त्याणी त्याचा निश्चय पाहुनी । रायास म्हणती नितंबिनी । तू येथे व्यर्थ राहुनी । आमचे नयनी दुःख देसी ॥२४॥

येथूनि तुवा आता जावे । मग जलतरवारु तयासवे । वस्त्रालंकार तयासि बरवे । देऊनिया बोळविला ॥२५॥

राजा निघोन सराबाहेर । लक्षोनि पातला निजनगर । उपवनी जाऊनि सत्वर । तुरंगाखाली उतरला ॥२६॥

तेथे होते ग्रामस्थजन । त्याणी राजा अवलोकुन । म्हणती हा कोठील कोण । स्वरूपे पूर्ण मन्मथसा ॥२७॥

राजा पुसे तयांसी । इंदुमती माझी गुणैकराशी । सुखी आहे सपुत्रेशी । सांगा मजसी लवलाहे ॥२८॥

ऐसे त्याचे ऐकता वचन । मग ओळखती तयासि जन । जाऊन कथिती इंदुमती लागुन । प्राणजीवन आले तुझे ॥२९॥

ऐसी ऐकता पीयुषवाणी । आनंदे वोसंडली तरुणी । प्रेमे नेत्री गळे पाणी । म्हणे कोणी आणा त्याशी ॥३०॥

इंदुमतीस कैसे भासले । की प्राण जाता परतले । वियोगानळे जळता वर्षले । जन तदा गमन घन ॥३१

शृंगार करूनि लवलाही । सत्पुत्र अमात्य सेना पाही । घेऊनिया चालली पायी । लागली घाई वाद्यांची ॥३२॥

नगर शृंगारले वाडेकोडे । घातले कुंकुमकस्तुरीचे सडे । सुवासिनी चालती मागेपुढे । मध्ये चमके गजगामिनी ॥३३॥

जेथे होता भूपती । तेथे येऊनिया इंदुमती । मस्तक ठेवी चरणाप्रती । अतिप्रीती करूनिया ॥३४॥

राये ह्रदयी आलिंगिता । पुष्ट जाहली राजकांता । प्रमादे पावली ती उभयता । ते आता वर्णू किती ॥३५॥

प्रजामात्यसह राजकुमरे । चरण सेविले नमस्कारे । गजस्कंधी वधुवरे । तैसी दोघे आरूढली ॥३६॥

चंद्रांगद आणि इंदुमती । गजस्कंधी मिरवत जाती । वरी चामरे ढाळताती । वाद्ये वाजती सुस्वर ॥३७॥

पुढे गजांचे गजघंट । वंशावली वर्णिती भाट । त्यामागे तुरंगारूढ भट । अतिसुभट चालती ॥३८॥

रावराणी आनंदे मिरवत । प्रवेशले तेव्हा नगरात । वेत्रधारी पुढे धावत । असंख्यात ते वेळी ॥३९॥

गवाक्षी उभ्या नगरनारी । रत्‍नदीप घेऊन करी । आनंदे ओवाळिती सुंदरी । पुष्पे शिरी वोपिताती ॥४०॥

मग प्रवेशले निजमंदिरी । भावे वंदिला विघ्नारी । परिपूर्ण व्रत करी । राजसुंदरी ते काळी ॥४१॥

करूनिया उद्यापन । लक्षानुलक्ष विप्रभोजन । सौभाग्यवायने सुवासिनीजन । प्रीती करून गौरवितसे ॥४२॥

राये भांडार फोडोन । सुखी केले याचकजन । वस्त्राभरणे भूमिदान । विप्रालागोन दीधली ॥४३॥

देऊन अमित धनास । सुखी केले आप्तजनास । वस्त्रालंकारे सकल दास । परम सुखास पावविले ॥४४॥

नित्यकर्मे सारोनि सारी । मग प्रवेशला भोगमंदिरी । अंकी इंदुमती सुंदरी । अलंकारी साजिरी ॥४५॥

श्रीगणेशप्रसादे । अनुवादती आनंदे । गहिवरोनिया स्फुंदे । इंदुमती तेधवा ॥४६॥

वियोगकाळींची दुःखगती । परस्परे तेव्हा सांगती । मग पावोनि आनंद चित्ती । क्रीडा करिती अतिप्रीती ॥४७॥

बाह्यभोग अंतरंग । भोगिता जाहला दुःखत्याग । मग सुख भोगिती अव्यंग । सिद्धिबुद्धीरंगप्रसादे ॥४८॥

पर्वत म्हणे गे आत्मजे । कृपा करिता गणराजे । त्याचे मग महद्‌दुःख लाजे । तो विराजे सुखामाजी ॥४९॥

जेणे व्रते इंदुमतीला । दयापन्न गणराज पावला । त्याच करोनि व्रताला । तुवा शिवाला पावावे ॥५०॥

ऐसे तातमुखे पार्वती । ऐकोन व्रत जाहली आचरती । तेणे तुष्टला गणपती । हैमवतीसि ते काळी ॥५१॥

निघोन महापर्वतदरी । तप करीत होता मन्मथारी । त्याचे ह्रदयाभीतरी । प्रपंच गिरी उंचावला ॥५२॥

ह्रदयी आठविता त्रिपुरसुंदरी । जपतपध्यान राहिले दुरी । उश्वास टाकोन दीर्घ स्वरी । चारी दिशा पाहे शिव ॥५३॥

उदास जाहली चित्तवृत्ती । दशदिशा धुंद भासती । वसंत वनी त्रास देती । कळा जाळिती चंद्राच्या ॥५४॥

आठवोनि अपर्णेचे गुण । सद्गद जाहला भोगीभूषण । मग नंदीवर बैसोन । नगजे समीप पातला ॥५५॥

पाहूनिया मुंडमाली । नगजा अत्यंत आनंदली । न सावरत धाविन्नली । पदी घातली मिठी तिणे ॥५६॥

शिवे देऊन आलिंगन । केले कालीचे समाधान । देव वर्षती सुमने घन । अप्सराजन नृत्य करिती ॥५७॥

प्रकृतिपुरुष जाहले एक । जगी विस्तारले कौतुक । प्रसन्न होता गणनायक । सुख अलोलिक संसारी ॥५८॥

जन्मा येऊनिया प्राणी । जो न स्मरे मोदकपाणी । त्या नराची व्यर्थ काहणी । उगीच वाणी चावळे त्याची ॥५९॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । गणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । पंचदशोध्याय गोड हा ॥६०॥

श्रीगजाजनार्पणमस्तु । शुभंभवतु । श्रीदत्तप्रसन्न ॥ अध्याय १५ ओव्या ॥६०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel