श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जयजय गुणेशा वेदसारा । अप्रमेया परात्परा । भक्तरक्षका विश्वंभरा । स्मरसुंदरा गणपती ॥१॥

तुझेवांचोनि माझी आशा । कोण पुरवील जगदीशा । भक्ताभिमानी सर्वेशा । चारयुगी साजिरा तू ॥२॥

तू सकळ कार्य मूळस्तंभ । तुझे स्मरणे अतिदुर्लभ । निजभक्तांचा विघ्नवेगस्तंभ । करिशी तू दयाळा ॥३॥

ज्याचे बाह्य असे पाहणे । त्यासि उघड मागावे मागणे । तू मिरवशी सर्वज्ञपणे । हे जाणे पूर्ण मी ॥४॥

तरी आता सर्वज्ञता । मज अनुभवी गा तत्वता । सर्व आशा पूर्ण कर्ता । तुजवाचोनि कोण असे ॥५॥

जे निजपदी शरण आले । त्यास तुवा संकटी पाहिजे रक्षिले । हे ब्रीद तुवा आपुले भले । सांभाळिले पाहिजे ॥६॥

श्रोते व्हावे सावधान । गणेशकथेस द्या अवधान । तेणे तुटोनिया भवबंधन । सुखसंपन्न व्हाल पै ॥७॥

जोडोनिया दोनी हाता । व्यास म्हणे विष्णुसुता । आता मयूरेशाची कथा । सविस्तर सांग पै ॥८॥

धाता म्हणे मुनिवरा । पार्वती नमन करोनि शंकरा । म्हणे पावले दिव्य वरा । त्रिगुणेश प्रसादे ॥९॥

आता लागले तेचि ध्यान । कधी देव माझे पुत्रत्व पाऊन । माते करील आनंदघन । गजानन दयाळू ॥१०॥

शंकर म्हणे धरी धीर । सर्व जाणतो सर्वेश्वर । भक्ताभिमानी ईश्वर । आशा सत्वर पुरवील तुझी ॥११॥

तीस लागले तेचि ध्यान । गुणत्रयी गुंतले मन । शेजारणीचे बाळ घेऊन । करी चुंबन तयाचे ॥१२॥

म्हणे गुणेश करुणाकर । कधी होवोनि माझा कुमर । पूर्ण भरील दिशा थोर । कीर्ती करोनि माझे गृही ॥१३॥

तीस म्हणती शेजारिणी । बाळकाचे वेड तुजलागुनी । पुत्रवती होवोन जगी । कधी मिरवशील कौतुके ॥१४॥

मृन्मय गणेशमूर्ती । करोनि पूजित पार्वती । भाद्रपद शुक्लचतुर्थीप्रती । प्रसाद केला गणराये ॥१५॥

ते दिनी असे चंद्रवासर । सिंहलग्नी उच्चग्रहपंचक साचार । ते लग्न साधोनि जगदीश्वर । धरी अवतार गौरीगृही ॥१६॥

मृन्मय करोनि गणेशमुर्ती । पर्वतात्मजा पूजीत होती । तेथे उद्भवला पुण्यकीर्ती । गणपती जगदात्मा ॥१७॥

कोटि बाल सूर्यकांती । आयुधे शोभती दिव्य हाती । माथा दूर्वांकुर मिरवती । प्रसन्नमती परमात्मा ॥१८॥

कंठी विलसे मुक्तमाला । अंगी दिव्य सिंदूर चर्चिला । कटितटी फणींद्र वेष्टिला । उभा राहिला गौरीपुढे ॥१९॥

दैदीप्यमान गजानन । व्याकुल जाहली गौरी पाहून । म्हणे वोढवले काय विघ्न । करिता पूजन एकाकी ॥२०॥

मग सौम्यतेजे गजानन । म्हणे अंबे हो सावधान । अहोरात्र लागले ध्यान । तेच वोळखोन मज पाहा ॥२१॥

ऐकोन त्याची ऐसी भारती । नेत्र उघडोन पाहे पार्वती । घवघवीत गणेशमूर्ती । पाहता चित्ती आनंदली ॥२२॥

आर्या म्हणे जगज्जीवना । वेदांस अतर्क्य तू जगन्मोहना । तपे तीर्थी करिता नाना । न येसी मना प्रत्यया तू ॥२३॥

तो मी प्रत्यक्ष अवलोकिला । माझा तुवा हेत पुरविला । ऐकोन गजानन बोलला । अपर्णेला तेधवा ॥२४॥

तुवा केले तपसायास । त्याचे द्यावया फळ तुम्हांस । मी अवतरलो जगन्निवास । तुझे गृही जननीये ॥२५॥

तीर्थयात्रा तपकोटी । करिता नव्हे माझी भेटी । तो मी साकारोनि तुजसाठी । उठाउठी धावलो गे ॥२६॥

प्रेमळ भक्तांचे मी आधीन । सदा आहे गजानन । उभयतांची सेवा करून । करीन हनन दुष्टांचे ॥२७॥

उतरीन क्षोणीचा पापभार । क्षणे मर्दीन सिंधुअसुर । स्वपदी स्थापीन सुरवर । साधूनर रक्षीन पै ॥२८॥

शिवा म्हणे हे जगदीश्वर । प्राकृत होऊनि माझा कुमर । सर्वपूर्ण करी विचार । तुझे मनी असेल जो ॥२९॥

तथास्तु म्हणोनि दीनदयाळ । प्राकृतापरी जाहला बाळ । मायेवरी मायाजाळ । घाली तत्काळ परमात्मा ॥३०॥

पार्वतीस कैसे भासले । की मी आता प्रसूत जाहले । बाळ रुदन करू लागले । मन आकळिले तियेचे ॥३१॥

तिणे तत्काळ बाळ उचलिले । सप्रेमे ह्रदयी आलिंगिले । शंकरासि वर्तमान कळले । स्नान केले तयाने ॥३२॥

विधिविधाने बाळकमुखी । मधुबिंदु घालोन केला सुखी । हे पाहूनि शंकरप्राणसखी । आल्हाद मानी तेधवा ॥३३॥

शिवे परमोत्साहे केला । अनेक दाने दे याचकाला । सुरवर आनंदे परस्पराला । भेटते जाहले सकौतुके ॥३४॥

अपर्णेचे मंदिरावर । पुष्पे वर्षती सुरवर । ध्वजपताकातोरणे सत्वर । शिवे उभविली निजालयी ॥३५॥

शर्करा वाटी धूर्जटी । आंचण्या घेऊनि रत्नताटी । धावत्या जाहल्या ऋषिगोरटी । भरती वोटी नगजेची ॥३६॥

जगमोहन बाळ पाहता । तन्मय जाहल्या ऋषिवनिता । म्हणती तयासि दृष्टी आता । लागेल वो साजणी ॥३७॥

जेव्हा परमात्मा अवतरला । तेव्हा सिंधुह्रदयी कंप जाहला । परमाल्हाद मानी इला । रस भरला औषधीत ॥३८॥

जाती मालती सुमनवल्ली । सुगंधभारे सुमने फुलली । मने साधूंची आनंदली । प्रसन्न जाहल्या दशदिशा ॥३९॥

रत्नजडित चौरंगावरी । बाळ घेऊनि बैसली गौरी । आवडीने चुंबन करी । क्षणोक्षणी बाळकाचे ॥४०॥

मुखी घालोन त्याचे स्तन । माता करवी स्तनपान । लीला विग्रही जगज्जीवन । दावी कौतुक निजभक्ता ॥४१॥

एकादश दिवसी नामकर्ण । करी तेव्हा भोगिभूषण । गुणेश नाम तयालागुन । ठेविती जाहली जगन्माता ॥४२॥

आवडीने करी लालन । घडोघडी घेत चुंबन । शिवाशिव आनंदघन । सदा वर्तती अवनीपती ॥४३॥

सिंधूचे ह्रदयी परमग्लानी । तेज नसे त्याचे वदनी । पाणी वाहे नयनी । सदा मनी तळमळ पै ॥४४॥

तव नभोवाणी गर्जत । सिंधू ऐके सावचित्त । सावध राहे चक्रपाणीसुत । तुझा अंत होईल आता ॥४५॥

ऐकोन दचकला दैत्यपती । म्हणे कोण असा त्रिजगती । मज मरणार क्रूरशक्ती । आहे सांगा सचिव हो ॥४६॥

प्रधान म्हणती राया ऐक । तू मृत्यूचा मृत्यू एक । तुज मारील म्हणता मूर्ख । खचीत जाणे दानवेंद्रा ॥४७॥

आम्ही त्रिभुवनामाझारी । धुंडोनिया तुझा वैरी । दाऊ त्याते मृत्युपुरी । हे निर्धारी न टळे कदा ॥४८॥

दंडकारण्यी सिद्धक्षेत्री । तेथे वसिजे ऋषि पवित्री । धाडोन गृध्रासुर पत्री । वैरी वधावा निजबळे ॥४९॥

सिंधू म्हणे गृध्रासुरा । तुवा आता करावी त्वरा । वैरी शोधोनिया पुरा । करी निश्चये निजबळे ॥५०॥

नमन करूनि दानवेंद्राशी । गृध्रासुर येवोनि सिद्धक्षेत्राशी । शोधीतसे देवदेवांशी । लक्षुनी मृत्यूशी आपुलिया ॥५१॥

अंकी घेऊनिया निजकुमरा । अंगणी बैसली ती सुकुमारा । लक्षोनि असुर करी त्वरा । पक्षवात प्रेरित ॥५२॥

पक्षवाते प्रळय करी । घाबरी पाहे तेव्हा गौरी । गृध्र येऊनि झडकरी । चंचूत धरी बाळकाते ॥५३॥

एकाएकी झडपोनि नेला । अंतराळी फिरो लागला । हे पाहोनि शैलबाला । कपाळ पिती निजकरे ॥५४॥

म्हणे धावा धावा हो पिनाकधरा । गृध्र नेतो पहा कुमरा । शोके विव्हळ जाहली सुंदरा । अश्रुधारा टाकित ॥५५॥

सख्या म्हणती धरी धीर । कुमर नव्हेगे हा ईश्वर । वधोनिया गृध्रासुर । भेटेल सत्वर तुज माये ॥५६॥

जगदीश्वरे चंचुपुट । करे आवळिले बळकट । श्वास कोंडता चटपट । प्राण सोडिला असुराने ॥५७॥

असुर पावोनिया मरण । दशयोजने पडला विस्तीर्ण । चंचुपुटांतून बाळ सुलक्षण । घे उचलोनि त्रिपुरसुंदरी ॥५८॥

ह्रदयी आलिंगोनि तयाशी । करीतसे मुखचुंबनाशी । करवीतसे स्तन्यपानाशी । झाला मनासि आनंद तिचे ॥५९॥

शिवे केली अरिष्टशांती । दाने दीधली याचकाप्रती । ह्रदयी आलिंगोन गणपती । शिवचित्ती आनंदमय ॥६०॥

गृध्रासुर पावला निधन । ऐकोन सिंधू करी रुदन । तव क्षेम आणि कुशल दोन । दैत्य येउन विनविती ॥६१॥

आम्ही करोन नानायत्न । तुझा आता वधू सपत्न । तू दानवकुळी अमूल्यरत्न । नको आता खेद करू ॥६२॥

देवोनि तयासि वस्त्रालंकार । गौरविले दोनी असुर । ते सिद्धक्षेत्री येऊनि सत्वर । मूषकवर जाहले ॥६३॥

अंबा निजवोनि बाळकाशी । हालवोनि गातसे लीलेशी । मूषक येवोनि वेगेशी । परस्परा भांडती ते ॥६४॥

उंदीर मोठे घोरांदर । चूंचू शब्द करिती भयंकर । झेप घालू पाहती पाळण्यावर । गौरी पाहे घाबरी ॥६५॥

दोघे भांडता उंदीर । उडी घालिती पाळण्यावर । विनायके पसरोनि कर । दोन्ही उंदिर धरियेले ॥६६॥

चूर्ण केले तयांचे काय । होवोनि पडले राक्षसमय । जन पावले पाहता भय । दशयोजने काय त्यांचे ॥६७॥

दोन मासांचे बाळक । पराक्रम दावी अलोलिक । जो अनंतब्रह्मांडनायक । लीला न कळे तयाची ॥६८॥

मिळोन ऋषींच्या नारी । म्हणती महाभाग्य तुझे गौरी । बाळके मर्दिले सुरवैरी । थोर चराचरी हाच सखे ॥६९॥

असुर पावता दोघेमरण । सिंधु दानवे असुर दारुण । देऊनिया वस्त्रभूषण । मरणोन्मुख पाठविले ॥७०॥

मध्यान्हकाळी एके दिवशी । पलंगी निजवोनि बाळकाशी । गौरी निजली त्याचेसरशी । सख्यांसहित तेधवा ॥७१॥

निद्रिस्थ असता अपर्णासती । असुर तेथे गुप्त येती । बाळ उचलता भूमीप्रती । पडते जाहले तेधवा ॥७२॥

भूमीशी पडता कालिनंदन । करु लागला दीर्घरुदन । तेणे माता जागृत होऊन । घाबरी पाहे दशदिशा ॥७३॥

तव बाळकासि घेऊन । असुर चालले तेथून । आक्रोशे अंबा करी रुदन । झाकी नयन असुरभये ॥७४॥

बाळके हाणोनि मस्तकी चरण । असुर केले शतचूर्ण । त्यांचे जाऊनिया प्राण । शरीरांतून रुधिर वाहे ॥७५॥

दोघांची मार्जाररूपान । प्रेते पडली दशयोजन । जागृत जाहला दासीजन । हाहाःकार करिती तदा ॥७६॥

मेले पाहूनिया असुर । उचलोनि घेती तेव्हा कुमर । असुरप्रेते खंडोनि सत्वर । दहन केले शिवगणी ॥७७॥

तीन मास होता बाळकाला । येव्हढा पराक्रम तेणे दाविला । शिवाशिवानी उत्साह केला । ह्रदयी धरिले बाळकाशी ॥७८॥

करावया भूभारहरण । अवतरला गजकर्ण । त्याचे चरित्र जाणेल कोण । यथामती वर्णिजेते ॥७९॥

भक्ताभिमानी जगन्निवास । चवथा मास लागला त्यास । तव सिंधू बाळासुरास । देऊनी वास पाठवी ॥८०॥

त्रिपुरसुंदरीचे मंदिरी । निजबाळे घेऊनि ऋषीनारी । मिळाल्या त्याते हर्षै गौरी । हरिद्राकुंकुमे वाटीतसे ॥८१॥

ऋषिबाळके गौरीसुत । क्रीडा करिती आनंद भरित । तव बाळासुर येऊनी त्वरित । बाळक होत त्यामाजी ॥८२॥

भोवता बाळांचा मेळ । मध्ये विलसे नगजाबाळ । मध्ये बालासुर खळ । घाली गोंधळ कापट्यपणे ॥८३॥

गणेश आणि बालासुर । रांगत पातले समोर । परस्परे जावळ सुंदर । घालोनि कर वोढिती ॥८४॥

अनंतशक्ती गुणेशापुढे । बालासुर कायसे बापुडे । गणेशे वोढिता मान आसुडे । सामर्थ्य गाढे दाखवी तया ॥८५॥

पाहोनि त्याची बळसंपत्ती । बाळासुर विस्मित चित्ती । म्हणे न दिसे बरवी गती । करील माती शरीराची ॥८६॥

करकरा खावोनि दाढी । असुर रगदी गुणेश नरडी । विनायके दाऊनि प्रौढी । दाबिली नरडी तयाची ॥८७॥

एक कराने जावळ वोढिती । एक्या करे कंठ दाबिती । असुर गर्जे गर्धभरीती । पाहूनि युवती हासती त्या ॥८८॥

विनायके कंठ दाबिला । प्राण दैत्याचा एकवटला । तेणे शब्द गुद्मरला । ऐकोनि अबला धाविन्नल्या ॥८९॥

अंबा म्हणे विनायकाशी । सोड जाऊ दे बाळकाशी । असुरे वटारोनि नयनांशी । पंचप्राणाशी सोडिले ॥९०॥

गदगदा हासे शिवनंदन । अंबा जाहली भयापन्न । म्हणे काय केले लेकरान । सोडिला प्राण बाळकाने ॥९१॥

दशयोजने राक्षस प्रेत । पडते जाहले अत्यद्भुत । ललना पळती समस्त । नगजेसहित तेधवा ॥९२॥

ऐकोन स्त्रियांची आक्रोशवाणी । शिवगण धावले तेक्षणी । त्याही बाळक घेतला उचलोनी । खंडे करूनि जाळिती तया ॥९३॥

हिमनगजा धावोनिया । ह्रदयी कवळी गणराया । पादमृत्तिका घेऊनिया । भ्याला म्हणोनि भाळी रेखी ॥९४॥

अनंतब्रह्मांडे ज्याच्या पोटी । त्याची उतरी माय दृष्टी । स्तन घालोनि अधरसंपुटी । स्तन्यपान करवीतसे ॥९५॥

बाळकाचे अरिष्ट खंडले । शिवे तेव्हा विप्र मेळविले । अपरिमित धन वाटले । ध्वज लाविले निजालयी ॥९६॥

चार महिन्याचा असता बाळ । पराक्रम दाविला तेणे प्रबळ । कीर्ती ऐकोनिया तत्काळ । मरिचि ऋषि पातला ॥९७॥

करोनि तयाचा सन्मान । बाळ ठेविला पुढे नेऊन । अंबा म्हणे ऋषिलागुन । सामुद्रिक पहा याचे ॥९८॥

उन्नतपराक्रम ऋषीने कथिता । आनंद पावली वामदेव वनिता । गणेशकवच सांगे तत्वता । नगजेशी ऋष्युत्तम ॥९९॥

विचारोनि नगजेला । शिवदर्शनासि ऋषि गेला । पंचममास प्राप्त जाहला । आरंभिला संस्कार तिणे ॥१००॥

गौतमादि ऋषिगण । मुहूर्त सांगती पंचाग पाहून । अरंभिले उपवेशन । मंडप उभविले शिवगृही ॥१०१॥

लागली वाद्यांची सुस्वरध्वनी । आंचण्या रत्नताटी भरुनी । धावल्या देवऋषिमानिनी । करी भवानी मंगळस्नान॥२॥

शक्रासहीत मरुद्गण । ऊर्वश्यादि अप्सरा येती जाण । तो समारंभ वर्णील कोण । आहे अगण्य शेषासही ॥३॥

बालासुर पावला निधन । ऐकोन करी सिंधू रुदन । तव व्योमासुर पुढे येऊन । कर जोडोन विनवीतसे ॥४॥

दानवेंद्रासि म्हणे व्योमासुर । तुझा वैरी वधीन सत्वर । माझा पराक्रम पाहे साचार । धरी धीर रडू नको ॥५॥

तयासि म्हणे असुरपाल । गोड लागती तुझे बोल । परी यश घेऊनि परतेल । ऐसा कोणी दिसेना ॥६॥

देऊनिया तयासि वास । सन्माने धाडिले त्यास । तेणे येऊनि आसमास । समारंभी विघ्न केले ॥७॥

मंडपावरी वृक्ष विस्तीर्ण । होता त्यासि राक्षस येऊन । हालवी तेव्हा बळे करून । भयसंपन्न जन जाहले ॥८॥

वृक्ष मोडी जेव्हा असुर । कडकडोन शब्द जाहला थोर । पाहोनि पळती नारीनर । टाकोन कुमर वृक्षतळी ॥९॥

नगजा तेथोन घाबरली । स्त्रियांसहित पळोन गेली । असुरे द्रुम घेऊन करतळी । मारी तेव्हा शिवसुता ॥११०॥

विनायक सबळ मुष्टिघाते । द्रुमासह व्योमासुराते । चुर्ण करिता जाहला तेथे । दैत्य प्राणाते मुकला ॥११॥

हाहाःकार आक्रोशे करूनी । सख्यांसहित रडे भवानी । बाळ तेव्हा निश्चळ पाहुनी । सांगिजे जनी तयेते ॥१२॥

रडू नको जगन्माते । दैवे रक्षिले तव सुताते । पाऊनि गौरी समाधानाते । उचलोन सुताते घेतसे ॥१३॥

हर्षे करी मुखचुंबन । प्रेमे करवी स्तनपान । प्रमोदाश्रूने भरले नयन । पाहे वदन तयाचे ॥१४॥

पुन्हा मिळाले नारीनर । उत्साह त्यांही मांडिला थोर । वाद्ये वाजती घनसुस्वर । मग संस्कार संपादिला ॥१५॥

हे ऐकती जे चरित्र गहन । नाही बाधा तयालागुन । सदा प्रसन्न गजवदन । करी अवन तयाचे ॥१६॥

जयजयाजी विश्वतापहरणा । भक्तपाळका जगद्भूषणा । गुणेशा रे धूम्रवर्णा । तुझे चरणा नमन माझे ॥१७॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत । क्रीडाखंड रसभरित । सप्तदशोध्याय गोड हा ॥११८॥

अध्याय ॥१७॥ ओव्या ॥११८॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel