अजिता-अर्चित-पादाब्ज: नित्या-नित्य-अवतंसित: ।
विलासिनी-कृत-उल्लास: शौण्डीसौन्दर्य-मण्डित: ॥६१॥
३१८) अजितार्चितपादाब्ज---अपराजिता शक्तीने ज्याची चरणकमळे पूजली आहेत.
३१९) नित्यानित्यावतंसित---नित्याशक्तीला ज्याचे चरणकमळ सदैव कर्णभूषणांप्रमाणे आहेत.
३२०) विलासिनीकृतोल्लास---विलासिनी शक्तीनेजो उल्लसित राहतो.
३२१) शौण्डीसौंदर्यमण्डित---शौण्डी नामक शक्तीच्या सौंदर्याने जो मण्डित (भूषित) झाला आहे.
अनन्ता-अनन्तसुखद: सुमङ्गलसुमङ्गल: ।
इच्छाशक्ति-ज्ञानशक्ति-क्रियाशक्ति निषेवित: ॥६२॥
३२२) अनन्तानन्तसुखद---अनन्ता नामक शक्तीला अनन्त सुख देणारा.
३२३) सुमङ्गलसुमङ्गल---सुमङ्गल पीठ ज्याच्या मुळे मंगलमय होते.
३२४) इच्छाशक्तिज्ञानशक्तिक्रियाशक्तिनिषेवित---इच्छाशक्ती-ज्ञानशक्ती-क्रियाशक्ती या तीनही शक्ती ज्याची सेवा करतात.
सुभगा-संश्रित-पद: ललिता-ललिता-आश्रय: ।
कामिनी-कामन: काममालिनी-केलि-लालित: ॥६३॥
३२५) सुभगासंश्रितपद---सुभगा नावाच्या शक्तीने ज्याच्या चरणकमळांचा आश्रय घेतला आहे.
३२६) ललिताललिताश्रय---जो ललितादेवीचे मनोहर आश्रयस्थान आहे.
३२७) कामिनीकामन---कामिनी या शक्तिदेवतेची इच्छा पूर्ण करणारा.
३२८) काममालिनीकेलिलालित---काममालिनी शक्तीच्या केलि म्हणजे क्रीडांनी प्रसन्न राहणारा.
सरस्वती-आश्रय: गौरीनन्दन: श्रीनिकेतन: ।
गुरुगुप्तपद: वाचासिद्ध: वागीश्वरीपति: ॥६४॥
३२९) सरस्वत्याश्रय---सरस्वती म्हणजे वाक्‌देवतेचा आश्रय असणारा.
३३०) गौरीनन्दन---पार्वती देवीस आनन्द प्रदान करणारा.
३११) श्रीनिकेतन---श्री म्हणजे लक्ष्मी. निकेतन म्हणजे निवासस्थान. जो लक्ष्मीचे निवासस्थान आहे.
३३२) गुरुगुप्तपद---गणकाचार्यादी समस्त गुरूंनी चरणी दृढ आलिंगन दिल्यामुळे ज्याचे चरण झाकले गेले आहेत.
३३३) वाचासिद्ध---ज्याची वाणी सिद्ध आहे. म्हणजे तो बोलेल त्याप्रमाणे घडते.
३३४) वागीश्वरीपति---भाषेची देवता (वाक्‌+ईश्वरी = वागीश्वरी) सरस्वती अथवा बुद्धिदेवता यांचा स्वामी.
नलिनी-कामुक: वामाराम: ज्येष्ठामनोरम: ।
रौद्रीमुद्रित-पादाब्ज: हुम्बीज: तुङ्गशक्तिक: ॥६५॥
३३५) नलिनीकामुक---नलिनीनाम शक्तीचा वल्लभ.
३३६) वामाराम---वामा नामक शक्तीचा विसावा असलेला किंवा वामा नामक शक्ती ज्याची प्रिया आहे.
३३७) ज्येष्ठामनोरम---ज्येष्ठा नामक शक्ती ज्याची मनोरमा प्रिया आहे असा.
३३८) रौद्रीमुद्रितपादाब्ज---रौद्री नामक शक्तीने ज्याचे चरणकमळ आपल्या ओंजळीत बद्ध केले आहेत.
३३९) हुम्बीज---‘हुम्‌’ हे ज्याचे बीज आहे. ‘वक्रतुण्डाय हुम्‌’ या षडाक्षरी मंत्राचा अन्तिम वर्ण जो ‘हुम्‌’ आहे तोच समस्त पुरुषार्थाचे कारणबीज आहे. त्यामुळे भगवान गणपती ‘हुम्बीज’ या नावाने प्रसिद्ध आहे.
३४०) तुङ्गशक्तिक---‘तुङ्ग’ ही ज्याची शक्ती आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel