(गीति)

देव गजानन वदती, भूपति भक्‍ता तपांत ते ऐक ।

तीन प्रकार असती, कायिक वाचिक तसेच मानसिक ॥१॥

रुजुतार्जव शुद्धपणा, तत्त्व अहिंसा नि ब्रह्मचर्य कायीक ।

देव गुरु ब्राह्मण नी, पंडितपूजन असेंच कायीक ॥२॥

नित्य स्वधर्मपालन, करणें हेंही तसेंच कायीक ।

१-२.

आतां पुढती कथितों, तप तें दुसरें श्रवार्थ वाचीक ॥३॥

सार्वत्रिक गोष्टींचें, मर्म समजणें नि वेदशास्त्रांचें ।

करणें अध्यायन नी, त्रास न कवणास न होयसें साचें ॥४॥

सत्य तसें हितकारक, भाषण करणें तसेंच आवडिचें ।

३.

या सार्‍या गोष्टींना, वाचिक तप वदति ते तया साचें ॥५॥

निर्मल बुद्धी शांती, इंद्रियनिग्रह अणीक तें मौन ।

४.

चित्तीं प्रसन्नता ही, जाणावि मानसीक तप म्हणुन ॥६॥

इच्छारहीत ऐसें, श्रद्धेनें ज्या तपास अनुसरणें ।

त्यांतें सात्त्विक समजें, ऐकें राजस तपास शांतपणें ॥७॥

अपुली बुद्धी व्हावी, यास्तव पूजादि युक्त सत्कार ।

५.

दांभिकपणेंच करिती, ऐसीं राजस तपेंच साचार ॥८॥

अस्थैर्य जन्ममृत्यू, राजस नामक तपेंच जाणावीं ।

६.

दुसर्‍याला पीडादी, करणें हीं तामसीच समजावीं ॥९॥

जाणून देशकाला, विधिपूर्वक नी सुभक्‍तिनें दान ।

७.

सत्पात्रीं देणें तें, गणती सात्त्वीकसें असें दान ॥१०॥

उपकारास्तव आणिक, फलइच्छेनें तसेंच कष्टानें ।

८.

भक्‍ती धरुन देणें, दान तयासीच राजसी गणणें ॥११॥

जाणे न देशकाला, हेळसुनी नी अनादरें देती ।

९.

देती अपात्रिं दाना, त्याला तामस असेंच वदताती ॥१२॥

कर्ता कर्म नि ज्ञाना, यांमाजीही प्रकार ते तीन ।

१०.

आला प्रसंग म्हणुनी, कथितों भूपा अनुक्रमें करुन ॥१३॥

सार्‍या भूतांमाजी, मी आहें हें नृपा तरी समज ।

तैसा आएह नेश्वरिं, नित्य बघें तूम नृपावरा सहज ॥१४॥

याला सात्त्विक ज्ञानचि, संबोधिति हें तुला कळायास ।

११.

सांगतसें नृपनाथा, सात्त्विकसें ज्ञान साच हें खास ॥१५॥

ज्या ज्या भूतांमाजी, भावासम पाहतात ते पृथक ।

१२.

त्या त्या परि मी भासें, त्या ज्ञानालाच राजसी ऐक ॥१६॥

देह नि आत्मा एकच, मिथ्याला सत्य मानिती ज्ञान ।

१३.

हेतूरहीत असती, याला वदतात तामसी ज्ञान ॥१७॥

फलइच्छेवांचुन जें, कर्म असे तें असेच सात्त्वीक ।

१४.

यापरि सुचिन्हं असती, ऐशीं कर्में सुजाण नृप ऐक ॥१८॥

फलइच्छेनें केलें, क्लेशानें कीं तसेंच केलें तें ।

१५.

दंभानें केलेलें, राजस म्हणती नृपाल हें तूंतें ॥१९॥

शक्‍तीचा अर्थाचा, विचार नाहीं असेंच तें कर्म ।

१६.

आणखि कर्माठायीं, आहे अज्ञान तामसी कर्म ॥२०॥

भूपति आतां तुजला, सात्त्विक कर्ता कसा असे सांगें ।

१७.

उत्साह धैर्य आणिक, सिद्धि असिद्धी समानसा वागें ॥२१॥

गर्वरहित नि अविक्रय, ऐसा मानव असेच सात्त्विक तो ।

१८.

कर्ता राजस म्हणती, तें ऐकें नृपवरा अतां कथितों ॥२२॥

फलप्राप्तीची इच्छा, अशुचि हिंसा प्रमोदसें चित्त ।

१९.

शोक क्रोध नि लोभहि, राजस कर्ता गुणीं असे युक्‍त ॥२३॥

आळशी षठ प्रमादी, अज्ञानी नी कुतर्क करणारा ।

२०.

तामस कर्ता म्हणती, आणखि परकीय नाश करणारा ॥२४॥

सात्त्विक राजस तामस, सुखही असतें नृपावरा ऐक ।

२१.

दुःखाचा अंतक तें, बुद्धीची नी प्रसन्नता एक ॥२५॥

इच्छित मनोरथानें, पूरीतसें नी तसेंच श्रविं एक ।

२२.

पूर्वी विषइव भासे, अमृतसम शेवटीं असे ऐक ॥२६॥

सात्त्विक सुख तें कथिलें, आतां राजस सुखास मी कथितों ।

२३.

विषयांचा भोग अधीं, अमृत इव वाटुनीच विष होतो ॥२७॥

आतां तामस सुख तें, सांगतसें ऐक राजसा शांत ।

२४.

तंद्री प्रमाद आळस, यांपासुन तृतिय त्यास सुख होत ॥२८॥

मोहक सौख्य निरंतर, तामस आहे असेंच समजावें ।

२५.

ऐसा कोणी नाहीं, या तींहींनीं सुमुक्‍त जगिं व्हावें ॥२९॥

ॐतत् सत् हे तीनी, ब्रह्मालाही सगूण करतात ।

२६.

त्रैलोकीं हें ब्रह्महि, व्यापक असुनी त्रीगूण वसतात ॥३०॥

ब्राह्मण क्षत्रिय आणिक, वैश्य तसे शूद्र हे स्वभावांनीं ।

२७।३०.

कर्में भिन्न करीती, तीं सांगें मी श्रवार्थ चिन्हांनीं ॥३१॥

अंतर्बाह्य अशीं हीं, इंद्रियदमनीं असून आर्जव हीं ।

शुचिता क्षमा नि करिती, नानाविधशीं तपादि कर्मे ही ॥३२॥

ज्ञानप्रकार दोनी, वेद-पुराणें नि शास्त्रिंचें ज्ञान ।

स्मृतिवाक्यादी जाणति, अर्था तेही तसें अनुष्ठान ॥३३॥

ऐशीं कर्में ब्राह्मण, आचरती तीं कथीत मीं केलें ।

क्षत्रिय कर्मे ऐकें, धृति तेज नि ज्ञान रक्षणा केलें ॥३४॥

दृढतर धैर्य नि प्रभुता, उत्तम नीती स्वकर्मि ते दक्ष ।

३१.

स्वामित्व पांच कर्मां, चिन्हें हीं क्षात्रधर्मिचीं लक्ष ॥३५॥

युद्धिं न मागें फिरती, शरणाच्या रक्षणार्थ ते दक्ष ।

मन मोठें असतें नी, लोकांच्या रक्षणार्थ ते दक्ष ॥३६॥

कृषि-गोरक्षक आणि, वाणिजवृत्ती तशींच त्री कर्में ।

३२.

ऐशीं चिन्हें असती, वैश्याला जाण भूपती धर्में ॥३७॥

शंकरसेवा आणिक, द्विजसेवाही सदैव ती करणें ।

३३.

विप्रांस दान देणें, शूद्रांनीं हीच नीति आचरणें ॥३८॥

सार वर्णिक अपुलें, विधिपरि करीति स्वकर्म तें नित्य ।

३४.

मजला अर्पण करितां, अढळपदीं स्थान देइं मी नित्य ॥३९॥

यापरि राजा तुजला, अंगउपांगासहीतसा सांग ।

आहे अनादि ऐसा, विस्तृतसा पूर्ण हा कथी योग ॥४०॥

पूर्ण असा भक्‍त खरा, यास्तव कथिला तुलाच हा योग ।

३५.

हा योगयुक्‍त ऐसा, सांगूं कवणासही न हा योग ॥४१॥

हा योग रक्षणानें, उत्तम सिद्धी त्वरीत पावशिल ।

३६.

माझ्या उपदेशावरि, श्रद्धा ठेवीं असें करी शील ॥४२॥

व्यास म्हणे सूताला, प्रसन्न ऐशा सुथोर गणपतिचें ।

३७.

भूपति वरेण्य वागे, ऐकुन बोधापरीच तो साचे ॥४३॥

झडकरि कुटुंब राज्या, त्यागुन गेला वनांतरीं राजा ।

३८.

गणपति कथीत योगा, वर्तुन त्यापरि सुमुक्त हो ओजा ॥४४॥

गुप्त अशा योगाचें, श्रवण करी जो त्वरीत मानव तो ।

३९.

योग्यापरि वाटे तो, कैवल्य अशा त्या पदांस मी वदतों ॥४५॥

तैसाच स्वार्थ साधुन, दुसर्‍याला हा कथीतसे योग ।

४०.

योग्यापरीच तोही, निर्वाणपदीं जातसेच हा योग ॥४६॥

गुरुपासुन अर्थासी, घेतो जाणून करित अभ्यास ।

गीतेचा मानव तो, पाठ करितसे सदैवसा खास ॥४७॥

गणपतिची पूजा ही, भक्तीनें नित्य ती करित जातो ।

४१।४२.

गीतापाठ करी जो, तो होतो ब्रह्मरुप मानव तो ॥४८॥

त्याचें दर्शन घेतां, मुक्‍ती लाभे असें वदे व्यास ।

यज्ञें व्रतें नि दानें, अग्नीहोत्रें महा-धनें खास ॥४९॥

सांग-ज्ञानें आणिक, वेदाभ्यासें पुराणश्रवणांनीं ।

शास्त्र ज्ञानें करुनी, साधू-चिंतन करुन योगांनीं ॥५०॥

ऐशापरि वागूनी, लाधतसे साच तें परब्रह्म ।

४३।४४.

ऐसें व्यास कथी हें, ऐकति सूतादि भाष्य हें ब्रह्म ॥५१॥

मोठीं पापें करिती, करिती संसर्ग चार वर्णांचा ।

स्त्रीहत्या गोवध हीं, मोठीं पापें नि मद्यपानाचा ॥५२॥

गुरु-भार्यागमनाची, पातकश्रेणि नि विप्रहत्येची ।

४५।४६.

गीतेच्या पठणानें, ऐशी ही पापश्रेणि नासेची ॥५३॥

त्यानंतर शुद्ध असा, मानव पावे त्वरीत मुक्‍तीस ।

गीता पठून होतो, गणपति केवळ सुभक्‍तसा खास ॥५४॥

व्रतनेम चतुर्थीचे, दिवशीं पाठक पठेचि ही गीता ।

४७.

मोक्षपदाला जातो, सांगतसें हें सुभाष्य त्या सूता ॥५५॥

गणेशक्षेत्रामाजी, जाउन तेथें करुन स्नानासी ।

४८.

गणेशपूजन करुनी, गीता पठुनीच ब्रह्मरुपासी ॥५६॥

मृण्मय गणेशमूर्ती, करुनी पूजा सुभक्‍तिनें तूंची ।

४९.

नभ-मासीं शुद्ध तीथी, नाम चतुर्थी सुपुण्य दिवसाची ॥५७॥

सायुध नी सहवहनीं, बसलेली मूर्ति करुन पूजन तें ।

५०.

यत्‍नें करुन गीता, सप्तमिती वांचुनीहि मग तूंतें ॥५८॥

ऐसें पूजन करितां, गणपति पावे त्वरीत भक्‍तांना ।

५१.

देतो सुभोग आणिक, संततिवर्धन सुरत्‍न दे त्यांना ॥५९॥

धनधान्यादी पशुही, संपद येई प्रचूरशी भक्‍तां ।

विद्यार्थ्यांना विद्या, सुख इच्छिति त्यांस देत तें दाता ॥६०॥

कामिक मानव यांची, इच्छेपरि कामना करी पूर्ती ।

प्रभुवर भक्‍तांसाठीं, प्रकटुनि मंगल करीतसे मूर्ती ॥६१॥

एकादश अध्यायीं, त्रिवीधवस्तू विवेक हा योग ।

५२.

गणपति वरेण्य भूपा, सांगे उकलून सुलभसा योग ॥६२॥

(उपसंहार काव्यें)

इच्छेपरि मज करवी, गणपति प्रभुंनीं सुकाव्य ही सेव ।

पूर्ण करविली गीता, दास मुखीं हा सुकाव्यसा ठेवा ॥६३॥

संतांनीं भक्‍तांनीं, उघडुन पाहावा सुपूर्ण हा ठेवा ।

हंसक्षीरन्यायें, क्षीरापरि मानुनी मुखें गावा ॥६४॥

गणेशगीता रचिली, आवड देवा असेचि मयुराची ।

यास्तव आर्यावृत्तीं, रुचिली आर्या रुचीर मयुराची ॥६५॥

कवनें सुमनें वेंचुन, स्फूर्तीदोरक तयार रुद्रमित ।

माला गुंफुन केल्या, गणपतिकंठीं समर्पिल्या उचित ॥६६॥

मोरेश्वरसुत बलभिम, आज्ञाधारक सुदास गणपतिचा ।

त्यांनीं प्रसाद दिधला, काव्य कारुनियां सुरंजवी वाचा ॥६७॥

जननी जनक नि गुरुसी, वंदन करितों यथाविधी बाळ ।

काव्यफूर्ती दिधली, यास्तव सेवा घडोच चिरकाळ ॥६८॥

माझे जिव्हें बसुनी, सुकाव्य सेवा घटीतसे देवी ।

याची सुलीन चरणीं, सदैव सेवा घडो असें भावी ॥६९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel