इ.स.१९१६ मध्ये डॉ. बाबासाहेब लंडनला आले. अर्थशास्त्रात पदवीसाठी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मास्टर ऑफ सायन्ससाठी आणि डॉक्टर ऑफ सायन्ससाठी प्रवेश घेतला. कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टर व्हावे, अशी महत्त्वाकांक्षा बाळगत त्यांनी "ग्रेज इन्" येथे प्रवेशासाठी अर्ज केला. परंतु त्यांच्या शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे बाबासाहेबांना भारतात परतावे लागले. बडोदा संस्थानच्या करारान्वे त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरीचा स्वीकार केला. पुढे ते मुंबई येथे सिडनहॅम कॉलेजमध्ये 'राजकीय अर्थशास्त्र' शिकवण्यासाठी जाऊ लागले. व पुन्हा लंडनला जाण्याची तयारी केली. डॉ. बाबासाहेब ५ जुलै १९२० रोजी अभ्याक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन लंडनला गेले. ३० सप्टेंबर १९२० रोजी त्यांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत मास्टर ऑफ सायन्स साठी प्रवेश मिळवला तसेच ग्रेज-इन या संस्थेत नाव दाखल करुन बॅरिस्टरीचा अभ्यास सुरु केला, वर्षभरात त्यांनी शोधप्रबंध तयार केला. 'प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स' प्रबंध लंडन विद्यापीठाने स्विकारून २० जून १९२१ रोजी त्यांना मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली. २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संख्येने त्यांना बार-ॲट-लॉ (बरिस्टर-ॲट-लॉ) ही वकिलीची पदवी प्रदान केली. त्यानंतर 'द प्रोब्लम ऑफ रुपी' हा प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.) या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. लंडन विद्यापीठात प्रबंध सादर केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जर्मनी येथे गेले. तेथील बॉन विद्यापीठामध्ये अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त करण्यासाठी प्रवेश घेतला. तेथे तीन महिने राहिले आणि तद्नंतर त्यांचे शिक्षक एडवीन कॅनन यांनी बाबासाहेबांना लंडनला येण्यासंबंधी पत्र पाठवले. ते लंडनला परतले व पुढे नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना लंडन विद्यापीठा कडून 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी बहाल केली. इंग्लंड येथील प्रकाशकांनी "ब्रिटीश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती"हा प्रबंध प्रशिद्ध केला. या संशोधनामुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जाऊ लागले. विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तोच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिण्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला. या साठी त्यांना २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.