डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची संकल्पना स्पष्ट होती. अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही.बाबासाहेबांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे? डॉ. बाबासाहेबांनी १३ ऑक्टोबर १९३५ येवला, नाशिक येथे हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी बाबासाहेबांनी त्यांच्या लक्षावधी व कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत बाबासाहेबांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानचे गव्हर्नर व्हावे अशी ऑफर दिली होती. तर त्यावेळेची जगातील सर्वाधिक श्रीमंत राजवट असलेल्या निझामाने बाबासाहेबांना इस्लाम स्वीकारल्यास धर्मांतरीत प्रति व्यक्ति मागे लक्षावधी नव्हे तर कोट्यवधी रूपये बाबासाहेबांना देण्याचे कबूल केले होते. परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्यें जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही ऑफर नाकारल्या. एका ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याती विनंती केली व धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली. महाबोधी सोसायटीकडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म आशिया खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांचे उद्धिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते.
बुद्धिप्रमाण्यवादी बाबासाहेबांनी घाई न करता आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर सलग २१ वर्षे जगातील विविध धर्मांचे अध्ययन केले. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी म्हणून पूर्णपणे बौद्ध धम्माकडे वळला. म्हणूनच धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ स्थापन केले.तसेच औरंगाबाद या ठिकाणी इ.स. १९५० महाविद्यालयात काढून त्यास मिलिंद महाविद्यालय व परिसरास नागसेनवन असे नाव दिले. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाला 'राजगृह' असे नाव दिले.त्यांनी 'दिनांक १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर' हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.
बाबासाहेब करे पुकार बुद्ध धम्म का करो स्वीकार...
आकाश पाताल एक करो बौद्ध धम्म का स्वीकार करो...
अशा आंबेडकरवाद्यांनी घोषणा देत सारा परिसर दणाणून टाकला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती (या दिवशी सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता). हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. डॉ. सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून सर्वप्रथम धम्मदीक्षा घेतली आणि त्यांनंतर स्वत: आपल्या ५,००,००० अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी, १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा नागपूरमध्ये त्यांनी आदल्या दिवशी येऊ न शकलेल्या २,००,००० अनुयायांना दीक्षा दिली. त्यानंतर १६ ऑक्टोबरला धम्मदीक्षेसाठी चंद्रपूरला गेले, आणि तेथेही तिसऱ्यांदा त्यांनी ३,००,००० अनुयायांना धम्म दीक्षा दिली. अशाप्रकारे केवळ तीन दिवसांत आंबेडकरांनी १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली. मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. या घटनेची जागतिक इतिहासात नोंद झाली तर या घटनेने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर जगात ऐतिहासिक होते कारण ते जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.
बाबासाहेबांनी आपल्या नवीन बौद्धांना, ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या त्या बौद्ध धर्माचेच सार आहेत, अशा स्वतःच्या २२ प्रतिज्ञा दिल्या ज्यामध्ये बौद्ध धर्मात असलेला हिंदू देव-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत. बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकिद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्वाचा आहे.