बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना देशातील सर्वसामान्य लोक तर विसरले नाहित, उलट त्यांच्या विचारांचा जगात सर्वत्र जोमाने प्रचार होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान 'आंबेडकरवाद' हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या विचारांमुळे देशातील शोषित पीडित जनता जागृत होत आहे. त्यांचे तत्त्वज्ञान हे कालबाह्य ठरले नाही. त्यांच्या तत्त्वज्ञानातून केवळ देशातीलच शोषित लोकांना प्रेरणा मिळाली नाही, तर इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळत आहे. जपानमध्ये बुराकू नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. आज ते नेते डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले प्रेरणास्थान मानते. युरोपाचे ह्रदय असलेल्या हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी हा विचार हंगेरीतील जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांनी आपल्या स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत समानता पाहिली. आणि ते आंबेडकरांपासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली आहे. हंगेरीयन लोकांनी २००७ मध्ये सांजाकोजा शहरात डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. बहुतेक आंबेडकरांचे नाव असलेली ही विदेशातील एकमेव शाळा असावी. या विद्यालयात बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व विचारही लावण्यात आलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे पाठही शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मिती अमूल्य योगदान या बाबी शिकवल्या जातात. हंगेरी देशाचे शिक्षणमंत्री पालकोवीक्स यांनीही या शाळेला भेट दिलेली आहे. त्या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी बाबासाहेबांचा अर्धपुतळाही स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जय भीम नेटवर्कने या शाळेला भेट दिला होता.
कार्ल मार्क्सच्या जीवनकाळात त्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित क्रांती घडली नाही. परंतु १९१७ मध्ये रशियामध्ये मार्क्सच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे क्रांती घडून आली. त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशात आणि बौद्ध राष्ट्रात डॉ. आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील प्रकाशित केलेल्या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मागणी आहे. तैवान देशात डॉ. आंबेडकरांच्या इंग्रजी, मराठी आणि हिंदी ग्रंथाच्या लाखो प्रती प्रकाशित करून हे ग्रंथ मोफत वाटले जात आहेत.