दिवा देखून नमस्कार
लहान मुलाला भारतीय माता प्रकाशाची पूजा कर म्हणून सांगतेः
दिव्या दिव्या दीपोत्कार
कानी कुंडले मोतीहार
दिवा देखून नमस्कार

हा श्लोक माता मुलाला शिकवते. प्रकाशाची मूर्ती त्याच्यासमोर उभी करते. तो प्रकाशदेव कानात कुंडले घालून आला आहे. गळयात मौक्तीक हार घालून आला आहे. त्या झगझगीत ज्योती, त्या जणू त्याचे अलंकार! प्रकाश पाहतच आपण प्रणाम करतो. दुकानात दिवे लागताच व्यापारी नमस्कार करतात. काळाबाजार करणारे असले तरीही प्रकाशाची कदर करतात. आज ना उद्या तेही सन्मार्गावर येतील.

प्रकाशासाठी जन्म
लहान मूल आईच्या पोटात सजीव होते. हालचाल करु लागते. तेथे अंधार असतो. तेथे संकुचितता असते. ते लहान जग. ते बाळ चळवळ करु लागते. आणि शेवटी प्रकाशासाठी बाहेर येते ! आणि डोळे उघडून बघते. आपण सूर्यदर्शनाचा समारंभ करतो. मूल महिन्याचे झाले म्हणजे त्याला अंगणात आणतो. “तो बघ देव, तो सूर्यनारायण.” असे त्याला म्हणतो. तू प्रकाशात राहणारा, प्रकाशात वाढणारा आहेस. अंतर्बाह्य शुची, स्वच्छ राहा. शरीर सतेज, मनोबुद्धी सतेज, असा हो, असे जणू त्याला आपण अप्रत्यक्षपणे सांगत असतो.

खरा प्रकाश कोणता ?
ते लहान मूल प्रकाशासाठी बाहेर आले. परंतु ते जसजसे वाढते तसतसे अंधारात लोटले जाते ! आपण तोंडाने प्रकाशाची उपासना करणारे परंतु कृतीने तमाचे भक्त आहोत. द्वेष, मत्सर, खून-कत्तली हे सारे तमोगुणाचे राज्य आहे. मुलाबाळांना संकुचित दृष्टीचे करणे म्हणजे त्यांना अंधाराची पूजा कर, सांगण्यासारखे आहे. खरा प्रकाश सूर्याचा नाही. कोणाचा नाही. खरा प्रकाश प्रेमाचा. आईचे प्रेम मुलाला वाढवते. तुम्ही प्रकाशाचे उपासक असाल तर प्रेम करा. दुस-याच्या जीवनात दैन्य, दास्य यांचा अंधार असतो. तू प्रेमाने त्यांच्याजवळ जा. त्या जीवनात आशा येईल, प्रकाश येईल. जगात विजेचे दिवे, आणखी शक्तीचे दिवे आहेत; परंतु प्रेमाचा दिवा जगात नाही. तो तर आपण मालवून टाकला आहे. आपण सार अंधार माजवला आहे. भुतांचा गदारोळ आहे. एकमेकांना चावे घेत आहोत, एकमेकांना तुडवत आहोत. या अंधा-या दुनियेत प्रकाश कधी येईल ? प्रेम करू लागा तेव्हा.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel