आर्यसमाजानें स्त्री-शिक्षणाची केवढी कामगिरी केली ! अस्पृश्यता निवारण्यासाठीं हुतात्मा श्रध्दानंद यांनी Liberator म्हणून वर्तमानपत्र चालविलें होतें. वैकोमच्या सत्याग्रहाला हरिजनांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून ते गेले होते. किती ठिकठिकाणचे हिन्दु महासभेच्या नांवाखालीं उभे राहणारे अस्पृश्यांना जवळ घेण्यासाठीं चळवळी करीत आहेत ? उलट काँग्रेसचे लोक, महात्माजींचेच शेंकडों अनुयायी ही खरी हिन्दुसंघटना करीत आहेत. संघटना म्हणजे शिव्या नव्हेत. डॉ. कुर्तकोटी म्हणतात, हिन्दुधर्मांतील सामाजिक अन्याय दूर करण्यासाठीं हिन्दुमहासभा ठेवा, राजकारणासाठीं एक काँग्रेस ओळखूं या. परंतु सावरकरी मंडळीस हें कसें पटणार ? महाराष्ट्राचा एकांडे शिलेदारपणा मग कसा गाजेल ?

कधीं कधीं गत इतिहासाचा दुरुपयोग होत असतो. आम्ही मराठ्यांनी मुसलमानांस जिंकलें, पुन्हां आम्ही त्यांना हुसकून देऊं अशा अहंकारानें कांही महाराष्ट्रीय व बृहन्महाराष्ट्रीय पछाडलेले आहेत. गुजराथ, कर्नाटक, आंध्र, केरळ, तामीलनाड, बिहार संयुक्तप्रांत वगैरे ठिकाणीं हा इतका चावटपणा नाहीं.

येथील मित्रांजवळ अनेक गोष्टी मी बोललों. कांही विद्यार्थ्यांजवळ बोललो. इतके बहुतेक हायस्कुलांतून आर. एस. एस. वाले शिक्षक आहेतच. विद्यार्थ्यांच्या जमिनी मागील युध्दांत मिळाल्या आहेत. त्यांना काय बोल लावावा ? स्वातंत्र्याचा व सर्वांच्या पोटाचा विशाल प्रश्न त्यांच्या समोर आजपर्यंत कोणी मांडलाच नाहीं. इकडे दारिद्र्यहि अपरंपार. लंगोटी लावणारे शेतकरी बन्धू, त्यांच्या बायकामाणसांची लुगडीं ढोपराच्यावरच गुंडाळलेलीं असतात. संस्कृतीच्या व अब्रूच्या व विनयशीलतेच्या गप्पा मारणार्‍या पावित्र्यसंरक्षकांनी हें दारिद्र्य पहावें, व टाचेपर्यंत येणारीं लुगडीं या श्रमजीवी भगिनींस कशीं मिळतील त्याची चिंता करुन साम्यवादी अहिंसक क्रांति करायला उठावें. बंगले बांधून संस्कृतीच्या गप्पा मारणार्‍यांची चीड येते.

आमच्याकडे लक्ष्मी म्हणून एक कामाला येते. शेतकरी बहीण, तिचा नवरा दमेकरी, सारा संसार ती बिचारी चालविते, परन्तु घरीं पोटभर खायला नाहीं. एके दिवशीं सायंकाळी ४ वाजतां ती मला म्हणाली, आतांपर्यंत पोरें उपाशीं आहेत; काय देऊ खायला ? माझे डोळे भरुन आले. मी तरी काय देणार ! एक दिवस देईन. रोज कोठून देऊं ! सर्व जमीन श्रमजीवीच्या मालकीची होईल तेव्हांच हा थोडासा प्रश्न सुटेल.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel