एकदा भगवान श्रीकृष्‍ण, बलराम आणि सात्‍यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्‍या वेळी काहीच न कळाल्‍याने रस्‍ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्‍याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्‍याचा. तेव्‍हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्‍थ व्‍हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्‍येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्‍याचे ठरवले. पहिली पाळी सात्‍यकीची होती. सात्‍यकी पहारा करू लागला तेव्‍हाच झाडावरून एका पिशाच्‍चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्‍च झाडावरून खाली उतरले व सात्‍यकीला मल्‍लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्‍चाने बोलावलेले पाहून सात्‍यकी संतापला व क्रोधाने पिशाच्‍चावर धावून गेला. त्‍याक्षणी पिशाच्‍चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्‍लयुद्ध झाले. पण जेव्‍हा जेव्‍हा सात्‍यकीला क्रोध येई तेव्‍हा तेव्‍हा पिशाच्‍चाचा आकार मोठा होई व ते सात्‍यकीला अजूनच जास्‍त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्‍यांनी सात्‍यकीला झोपण्‍यास सांगितले. सात्‍यकिने त्‍यांना पिशाच्‍चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्‍चाने मल्‍लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्‍चाशी लढायला गेले तर त्‍याचा आकार हा वाढलेला त्‍यांना दिसून आला. ते जितक्‍या क्रोधाने त्‍याला मारायला जात तितका त्‍या पिशाच्‍चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्‍णाची होती. पिशाच्‍चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्‍णांना आव्‍हान दिले पण श्रीकृष्‍ण शांतपणे मंदस्मित करत त्‍याच्‍याकडे पहात राहिले. पिशाच्‍च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्‍णांना बोलावू लागले पण श्रीकृष्‍ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्‍चर्य झाले ते म्‍हणजे जसे जसे पिशाच्‍चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्‍याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्‍चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्‍णांनी अलगद त्‍याला आपल्‍या उपरण्‍यात बांधून ठेवले. सकाळी सात्‍यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्‍णांनी तो किडा त्‍यांना दाखविला व म्‍हणाले,’’ तुम्‍ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्‍हता कारण हे क्रोधाचे पिशाच्‍च होते. त्‍याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्‍याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्‍हणून हे पिशाच्‍च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’

तात्‍पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel