इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९ इ.स. १९१७ - ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.
लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.
इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.
१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या २ सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली.इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते.