क्षुब्ध झालेला, अविचारी, भावनावश जनसमाज ओरडला, ''दोघांना खेचा, दोघांस तुरुंगात टाका. फाशी द्या गुलामांना!''
जनसमाजाने अशा प्रकारचा निकाल दिला व एकच कोल्हेकुई, हुल्लड सुरू केली. अध्यक्ष पेरिक्लीस उभा राहिला. पेरिक्लीसची चर्या पाहून पुन्हा सर्वत्र शांत झाले. एवढा जनसमाज होता, पण एक सुई पडली असती तर ऐकू आली असती, अशी शांतता उत्पन्न झाली. पेरिक्लीसच्या डोळयांत अश्रूबिंदू आले होते. परंतु ते दाबून तो गद्गद वाणीने म्हणाला, ''नाही, जोपर्यंत पेरिक्लीस जिवंत आहे, तोपर्यंत मी यांना मरू देणार नाही. तो पुतळा पाहा; पाहा तरी त्या सुंदर मूर्ती-प्रत्यक्ष देवाच्या हातच्या त्या मूर्ती वाटत आहेत. मला माझ्या हृदयातून परमेश्वर सांगत आहे, अन्यायी कायद्यापेक्षा या जगात काहीतरी श्रेष्ठ आहे हे जगास कळू दे. कायद्याचे ध्येय काय? जे जे सत् आहे, शिव आहे, सुंदर आहे, सत्य आहे त्या सर्वांचे संरक्षण करावयाचे. 'The highest purpose of law should be the development of the beautiful.' अथेन्स जर जगाला ललामभूत व्हायचे असेल, अथेन्सची कीर्ती यावच्चंद्रदिवाकरौ राहो असे जर कोणास वाटत असेल, तर त्याने 'सत्यं शिवं सुंदरं' यांची सतत पूजा केली पाहिजे. कलांची किती भक्तिभावाने अथेन्स पूजा करते हे जगाला कळू दे. कलांची अधिष्ठात्री, कलांची पूजा करणारी अशी ही अथेन्स नगरी विश्वास शोभत राहो. आणा, त्या कृश तरुणास-त्या दैवी देण्याच्या तरुणास-माझ्याजवळ आणा. तुरुंग त्याच्यासाठी नाही.''
सर्व समाज चित्राप्रमाणे तटस्थ राहिला. पेरिक्लीसने मोठया प्रेमाने क्रेऑनला स्वत:जवळ बसविले. पेरिक्लीसच्या पत्नीने विजयचिन्हदर्शक माला क्रेऑनच्या गळयात घातली; तिने क्रेऑनच्या बहिणीस आलिंगन देऊन पोटाशी धरले.
पेरिक्लीस, फिडियम, सॉक्रेटिस-सर्वांच्या तोंडचे धन्यवाद ऐकून क्रेऑनचे हृदय ब्रह्मानंदाने भरून गेले.
कलांची पूजा, गुणांचा गौरव कसा करावा हे ग्रीस देशाला, अथेन्स शहराला माहीत होते. क्रेऑन गुलाम होता, तरी त्याच्या गुणांची पूजा करण्यात आली. 'इसापनीती' म्हणून ज्या गोष्टी आपण वाचतो, त्या सुंदर व बोधप्रद गोष्टी लिहिणारा इसाप हाही एक गुलामच होता. अथेन्सने त्याचाही गौरव करून त्याचा पुतळा उभारला. ज्या राष्ट्रातील जनतेला व सरकारला गुणांबद्दल आदर आहे, त्या राष्ट्राचा उत्कर्ष का होणार नाही? परंतु जेथे गुणांची बूज नाही, जातिभिन्नत्वामुळे जनतेस ख-या गुणाला मोल नाही, अधिकारमदामुळे सरकारलाही ते सहन होत नाहीत, त्या राष्ट्राचा उत्कर्ष केव्हा कसा होईल हे भगवंतासच माहीत!