हळूहळू तेथील रीतिरिवाज तो शिकला. तेथून तो दुस-या गावी गेला. त्या देशाच्या राजाच्या पदरी तो नोकरीस राहिला. त्याची हुशारी व त्याचे गुण यामुळे तो मोठा अधिकारी झाला. राजाजवळ तो स्वदेशी परत जाण्यास परवानगी मागे. पण 'तू परत येणार नाहीस; येथेच लग्न करून राहा' असे राजा सांगे.
किसनच्या डोळयांसमोर ती गोजिरवाणी मुले व लिली यांची मूर्ती उभी राही. त्यांची काय कंगाल हीनदीन स्थिती झाली असेल, माझी चातकासारखी वाट पाहून कशी निराश झाली असतील, वगैरे विचारांनी किसन कावराबावरा होई. एखादा दिवस तो आपल्या खोलीत खिन्न बसून काढी.
आज मुलांबरोबर लिली पण टेकडीवर समुद्रावर फिरावयास आली होती. बरोबर रतन पण होता. मुले खाली वाळवंटात खेळू लागली. वाळूचे मनोरे रचू लागली. त्या टेकडीवर दोन दगडांवर लिली व रतन बसली होती. किती दिवसांनी लिली तेथे आली हाती. रतनच्या मनात एक गोष्ट विचारावयाची होती. पण किती दिवस त्यास धैर्य होईना. आज तो मनाचा हिय्या करणार होता. तो लिलीला हळूच म्हणाला, ''लिले, मी एक गोष्ट तुला विचारीन म्हणून म्हणतो. पण धीर होत नाही. आज विचारतो. तू अगदी रागावू नकोस. लिले, तू माझ्याशी लग्न लाव. लहानपणी तू म्हणाली होतीस 'मी तुमची दोघांची लहानशी बायको होईन.' ते आठव. आज आठ वर्षे झाली. किसनचा पत्ता नाही. समुद्राने त्याला दगा दिला असावा. नाही तर तो येता. पत्र अगर निरोप पाठवता. आता तू मला नाही म्हणू नकोस. लहानपणचे तुझे शब्द देवाने खरे करण्याचे ठरविले! का? लिले माझ्या या औध्दत्याबद्दल, स्पष्टपणाबद्दल रागावू नकोस.''
लिलीच्या मनात काय आले, काय ठरले? ती म्हणाली, ''विचार करीन.'' सायंकाळ संपली व सर्व जण घरी गेले.
मुले जेवून-खाऊन गुरफटून निजली. लिली एकटीच विचार करीत बसली. ती मनात म्हणाली, ''रतन म्हणतो, त्याप्रमाणे केले तर काय होईल? माझा पूर्व पती किसन खरोखरच या जगातून निघून गेला का? ते जिवंत असतील आणि येतील तर? परंतु शक्यच नाही. समुद्राच्या लाटांनी केव्हाच त्यास गिळंकृत केले असेल; त्याच वेळेला मला वाटले, 'काही तरी अशुभ होणार.' देवाच्या मनात मी दोघांची व्हावे असेल असेल का? काही हरकत नाही. रतनची मी पत्नी झाले तर-भगवंता! माझ्या मनात पाप नाही; संपत्तीचा, सुखाचा माझ्या मनात अभिलाष नाही. लहानपणचे हे दोन सवंगडी-मी दोघांची होते.''
लिलीने ठरविले. पुन्हा रतन भेटला. लिली म्हणाली, ''सहा महिने थांबू व मग आपण पतिपत्नी होऊ.'' रतनचे मन आनंदित झाले. त्याचे उदासीन हृदय सुखासीन झाले. सहा महिने गेले व लिली आणि रतन ही नवरा-बायको झाली. लिली व तिची मुले रतनच्या घरात राहावयास गेली. रतनचे घर आतापर्यंत भेसूर दिसे, ते झकपक झाले, झाडलोट झाली, बैठकी घातल्या, चित्रे टांगली, बागबगीचा फुलला, सर्वत्र टवटवी नटली, रतन संसारात रमू लागला. लिलीचे मन मात्र एखादे वेळेस खिन्न होई व तिचे हृदय चरके.