आपले एक आटपाट नगर होते. तेथे एक भाग्याची बाई राहात असे. लेकी-सुनांनी घर भरलेले, गुराढोरांनी गोठा भरलेला, खायलाप्यायला काही कमी नव्हते. पाटीभर दागिने एकेकीच्या अंगाखांद्यावर होते. लोक आपापले उद्योगधंदे करून सुखाने दिवस काढीत होते. त्या नगरात सर्वत्र बाईचीच सत्ता होती. तिचे भाग्य मोठे थोर म्हणून तिला 'भाग्यबाई' म्हणत. तिची मुलेही मोठी उद्योगी : कोणी उत्कृष्ट कारागीर, कोणी उत्कृष्ट संगीतज्ञ, कोणी शास्त्रज्ञ, कोणी तत्त्वज्ञ, कोणी चांगले विणकर, कोणी चांगले योध्दे, कोणी मुत्सद्दी, कोणी तपस्वी असे होते. सर्व त्या त्या कामात मोठे वाकबगार, मोठे दर्दी! परस्परांचा हेवादावा त्यांना माहीत नाही. सर्वच धंदे चांगले, ज्याला आवडेल तो त्याने करावा, असे होते. मुलांच्या या प्रेमळपणामुळे, या ऐक्यामुळे भाग्यबाई मोठी सुखी होती. तिचे मुख नेहमी प्रसन्न दिसे.

भाग्यबाई इतकी श्रीमंत व वैभववती होती, तरी तिला इतकादेखील गर्व नव्हता हो. कोणी आला गेला, आतिथ्यअभ्यागत, सर्वांचे ती स्वागत करी. तिला सर्वच चांगले दिसत. जो कोणी भुकेला, तान्हेला येई त्याला तिने जवळ घ्यावे, त्याला कुरवाळावे, त्याला खायला द्यावे, कोणास तिने शेतीभाती द्यावी, वतनवाडी द्यावी असे चाले. परदेशातून किती तरी नवीन नवीन बुभुक्षित लोक तिची कीर्ती ऐकून येत. तिची कीर्ती दिगंतात गेली होती. कोणी तिच्या नगराला 'सोन्याची नगरी' म्हणत, कोणी तेथील जमिनीला 'सुवर्णभूमी' म्हणत. कर्णोपकर्णी तिची कीर्ती सर्व त्रिभुवनात पसरली. कोणी संपत्तीसाठी, कोणी ज्ञानासाठी भाग्यबाईच्या नगरात येऊ लागले. कोणी कायमची वस्ती केली तरी भाग्यबाई 'ना' म्हणत नसे. ''माझी बाळे, तसेच तुम्ही या. गुण्यागोविंदाने राहा. भांडू नका, तंडू नका. मिळून मिसळून राहा. माझ्या मुलांच्या मनोभावना दुखवू नका, ते पण तुमच्या दुखावणार नाहीत,'' असे ती आपली म्हणायची.

एखादे वेळेस मुळे जरी भांडली, तरी ती त्यांना जवळ घेई व त्यांची भांडणे मिटवी. असे आपले चालले होते.

होता होता काय झाले, दूर देशचा एक व्यापारी आला. पांढ-या तोंडाचा व पांढ-या पायांचा तो होतो. बोलायला मोठा मिठ्ठास! वाणी अमृताची, करणी कसाबाची, असा तो होता. त्याच्या जिभेवर ऊस लावलेले होते, परंतु पोटात विषाचे गरळ होते. भाग्यबाई भोळी, सर्वांवर तिचा विश्वास. तिने या पांढ-या व्यापा-याला दुकान घालण्याची परवानगी दिली.

व्यापा-याने वखार थाटली, व्यापार चांगला चालू लागला. त्याने एका वखारीच्या दोन वखारी केल्या, दोहीच्या चार झाल्या. चारांच्या दहा झाल्या. त्याचा पसारा वाढत चालला. व्यापारासारखे वैभव व वैभवासारखा हावभाव असतो. व्यापार वाढला तर वैभव वाढते. व्यापारी मोठा कुशल होता. नाना त-हेचा माल मांडी. दिसायला सुबक. किंमतीला स्वस्त. भाग्यबाईच्या नगरातील लोक हा माल घेऊ लागले. व्यापा-याला बरकत चढली. भाग्यबाईची सर्व मुले तो माल पाहून लोभावली. गो-याचा माल घेऊ लागली. कोणी उधार घेई. कोणी रोख घेई. उधारवाल्याकडे बाकी थकली की, गोरा व्यापारी त्याची शेतीवाडी, बागबगीचा, घरदार जप्त करी व आपण मालक बने.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel