भाग्यदेवता म्हणाली, ''मी फसले व स्वातंत्र्य गमावून बसले, मुलगे मोहाला बळी पडले. आता गोरा चोर सर्व घेऊन बसला आहे. माझी मुले गो-याबाईकडे जातात व भीक मागतात-'द्या हो एक तरी तुकडा.' तर गोरीबाई उलट काही ने देता फटकारे मारून हाकलून देते. मला मुलांची अन्नान्नदशा पाहवत नाही. जेथे फुले टिपली तेथे शेण्या वेचायची पाळी आली. केले सहन-परंतु आता नाही हो करवत.''
अकलंकेचे डोळे भरून आले; इतर स्त्रियांनी सुध्दा डोळयांस पदर लावले. थोरामोठयांवरची विपत्ती सर्वांच्या हृदयाचे पाणी करते. अकलंका डोळे पुसून म्हणाली, ''भाग्यबाई तुम्ही सर्व उपाय केलेच आहेत. परंतु मी उपाय सांगते तो करून पाहा. मी एक तुम्हांला व्रत सांगेन. या व्रताप्रमाणे तुम्ही व तुमची मुले वागतील तर गेलेले वैभव परत येईल. स्वतंत्रता हसत येईल.''
भाग्यबाई म्हणाली, ''सांगा ते व्रत. मी मर्त्य लोकांची असल्ये तरी उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. घेतलेले व्रत सोडणार नाही. पूजासाहित्य सर्व जमवीन. सांगा मला वसा.''
अकलंका देवी म्हणाली, ''आम्हांला हे व्रत पूर्वी नारदाने सांगितले होते, ते तुम्हांला सांगते. त्याचा वसा कसा घ्यावा, काय पुजावे, कसे पुजावे, काय करावे सर्व सांगते. हे हातात तांदूळ घ्या. हं, ऐका आता. हा वसा केव्हा घ्यावा. केव्हाही घ्या. ज्या दिवशी मनी पवित्र विचार असतील त्या दिवशी उठावे, दिवस वार ठरवू नये, चांगले विचार येतील तीच वेळ धरावी. त्या दिवशी स्वतंत्रतादेवीची मूर्ती करावी. तिला खादीचे शुभ्र वस्त्र नेसवावे, स्वत:ही खादीचे वस्त्र परिधान करावे. स्वतंत्रतादेवीला फुलांच्या माळा घालाव्या-फुले कोठली घालायची? एकेक सद्गुणाचे फूल आणून ऐक्याचे दो-यात ते ओवावे. अशी गुंफलेली माळच तिला आवडते. तिला नैवेद्य लागतो. नैवेद्य कसा करावयाचा तो ऐका. व्रतात चूक होता कामा नये. कर्म यथासांग झाले पाहिजे म्हणून नीट ऐका. स्वावलंबनाची डाळ आणावी, ती दुहीच्या जाळावर कळकळीच्या तुपावर भाजावी; ती डाळ मग चांगली दळावी. दळून झाल्यावर तिच्यात प्रयत्नांची शर्करा घालावी व तिला प्रेमाचा कढ आणावा. देशभक्तीचे व धर्मशक्तीचे लवंगा-वेलदोडे आणावे व देवभक्तीचे केशर आणावे-ते त्यास सर्व नीट प्रमाणात घालावे. मग हे लाडू नीट वळावे. स्वतंत्रतादेवीला नैवेद्य दाखवावा. नंतर स्वतंत्रतादेवीची मंगल आरती करावी. पूजा संपल्यानंतर सर्वांनी हा प्रसाद भक्षण करावा. दरवर्षी असे करीत जा. असे झाले तर स्वतंत्रतादेवी प्रसन्न होईल. ती तुमच्याकडे नांदावयास येईल. चोराचिलटांना दूर करील. अशी नारदांनी सांगितलेली पूजा तुम्हांला सांगितली. तुम्ही करा, आता आम्ही जातो, फार उशीर झाला. स्वर्गात आमची वाट पाहात असतील.''