(डॉ. जाकीर हुसेन हे सुप्रसिध्द शिक्षणशास्त्रज्ञ होते. वर्धा शिक्षण पध्दतीचे ते प्रमुख होते. हिंदीच्या परिचय-परीक्षेसाठी त्यांनी लिहिलेली ''अब्बूखाँकी बकरी'' ही सुंदर गोष्ट आहे. ती मनोहर व भावपूर्ण गोष्ट माझ्या सर्व वाचकांस कळावी म्हणून देत आहे.)
हिमालयाचे नाव कोणी ऐकले नाही? हजारो मैल लांब तो पसरला आहे. त्याची शिखरे इतकी उंच आहेत, की कोणी त्यावर अद्याप पोचला नाही. हिमालय पर्वतात मधून मधून वस्ती आहे. अशा वस्तीच्या जागांपैकी आल्मोडा ही एक आहे.
आल्मोडात एक मोठा मिया राहात होता. त्याचे नाव अब्बूखाँ. बक-यांचे त्याला फार वेड. तो एकटा होता. ना बायको, ना पोर. दिवसभर बक-या चारीत असे. त्या निरनिराळया बक-यांना तो गमतीगमतीची नावे ठेवी. एकीला कल्लू म्हणे, दुसरीला मुंगीया म्हणे, तिसरीला गुजरी, चौथीला हुकमी. तो बक-यांजवळ बसे व नाना गोष्टी करी. सायंकाळी बक-या घरी आणी व बांधून ठेवी.
आल्मोडा ही पहाडी जागा. अब्बूखाँच्या बक-या पहाडी जातीच्या. अब्बूखाँ बक-यांवर इतके प्रेम करी, तरी त्या पळून जात. मोठा दुर्दैवी होता. बक-या पळून जात व एक लांडगा त्यांना मटकावी. अब्बूखाँचे प्रेम, सायंकाळचा दाणा, कशाचाही त्यांना मोह पडत नसे.
ते दाणे, ते प्रेम त्यांना रोखू शकत नसे. पहाडी लांडग्याने भयही त्यांना डांबू शकत नव्हते. पहाडी प्राण्यांना स्वातंत्र्याची चाड असते. आपले स्वातंत्र्य कितीही मोठी किंमत मिळाली तरी गमविण्यास ते तयार नसतात. आनंद व आराम मिळावा यासाठी कैदेत पडणे त्यांना रुचत नसे.
अब्बूखाँच्या ध्यानात येत नसे की, बक-या का पळून जातात. तो त्यांना हिरवे हिरवे गवत चारी. शेजा-यांच्या शेतात चोरून चारून आणी. सायंकाळी दाणा देई. तरीही त्या बिचा-या पळून जात! लांडग्याला आपले रक्त देणे का पसंत करीत?
अब्बूखाँने आता निश्चय केला की, बकरी नाही पाळायची. बकरीशिवायच राहावयाचे. तोही म्हातारा झाला होता. परंतु एकटयालाही काही करमेना. पुन्हा बिचा-याने एक बकरी आणली. बकरी लहान होती. पहिल्यानेच व्यायली होती. लहानपणीच आणली तर लळा लागेल असे म्हाता-या अब्बूखाँला वाटले. ही बकरी फार सुंदर होती. ती गोरीगोरीपान होती. तिच्या अंगावरचे केस लांब लांब होते. काळी काळी शिंगे जणू शिसव्याच्या लाकडावर कुणी नक्षी करून तयार केली होती. डोळे लालसर होते. बकरी दिसायलाच चांगली होती असे नाही, तर स्वभावही चांगला होता. अब्बूखाँचे हात ती प्रेमाने चाटी. लहान मुलाने धार काढली तरी ती पाय उचलत नसे. दुधाचे भांडे पाडीत नसे. अब्बूखाँला तर तिला कोठे ठेवू अन् कोठे न ठेवू असे होई. तिचे नाव काय ठेवले होते, माहीत आहे? चांदणी. चांदणीजवळ तो गप्पा मारी. पहाडातील लोकांच्या गोष्टी सांगे.