राम : परंतु शेकडो हिंदू माय-बहिणींच्या पोटालाही मिळत आहे!
बाप : मला बुध्दिवाद नको.
राम : बाबा, हिंदुस्थानातील मुसलमान हे बहुतेक आपल्यातीलच आहेत. ते वाईट असतील तर आपणच वाईट आहोत, असा नाही का अर्थ? आपल्या पूर्वजांची क्षुद्र दृष्टी नव्हती. हे मुसलमान एके काळचे आपल्यातीलच-काही हिंदू धर्मातील छळामुळे, काही परकी धर्माच्या जोरामुळे व काही स्वार्थामुळे परधर्मात गेले. त्यांना आपल्या पूर्वजांनी जगविले. त्यांना काही धंदे दिले. आपल्या समारंभास आपल्या चौघडयांबरोबर त्यांचे ताशेही आपण बोलावीत असू. त्यांनाही जगू दे. आपल्य शेजारचेच ते. त्यांना उपाशी ठेवणे धर्म नव्हे. कोठे ती थोर दृष्टी व कोठे आमचे घातकी इंग्रज सरकारच्या वळणाचे धोरण! बाबा, मी खादीची टोपी घालणार. देशाचे तोंड उजळ करणारी, हिंदु-मुसलमानांचे ऐक्य साधणारी, साम्राज्याला दूर करणारी स्वातंत्र्याची खूण अशी ही स्वच्छ शुभ्र टोपीच मी घालणार! या टोपीवर इंग्रजांनी लाठीमार केले. ही टोपी घालणा-यांवर इंग्रजांनी गोळया झाडल्या, तुम्ही तेच करणार असाल तर तुम्ही त्याच साम्राज्यवाल्यांच्या, माझ्या देशाला गुलाम करणा-यांच्या जातीचे ठराल.
बाप : येथे राहावयाचे असेल तर मी सांगेन तसे वागले पाहिजे.
बापाने गांधी टोपी फेकून दिली. रामाच्या डोक्यावर काळी टोपी चढविण्यात आली. फाशी देताना टोपी घालतात असे रामला वाटले. त्याच्या डोळयांसमोर काळोखी आली. काय करावे त्याला कळेना.
सुदैवाने आतापर्यंत रामच्या शाळेत चांगले शिक्षक होते. त्यांच्यामुळेच रामला असा बुध्दिवाद करता येई. परंतु नवीन वर्षी द्वेषाचे विष वमणारे शिक्षण त्या शाळेत आले. ते इतर परीक्षांबरोबर विषप्रसाराचीही परीक्षा पास झालेले होते. एके दिवशी ते नवीन शिक्षक एका वर्गात येताच विचारू लागले, ''आर.एस.एस. मध्ये किती जण जातात?'' त्या शाळेचे निर्मळ गाव हे कलंकित करणार असे काही थोर वृत्तीच्या मुलांस वाटले.
रामाच्या वर्गावर ते नवीन विषारी शिक्षक आहे. तेथे त्यांनी तोच प्रकार सुरू केला. राम एकदम उभा राहिला.
राम : आपल्या शाळेत 'सहनाववतु सहनौ भुनक्तु' वगैरे प्रार्थना म्हणण्यात येत असते. गुरुशिष्यांच्या अभेदाची ही प्रार्थना आहे. तुम्ही तर आमच्यात हिंदु-मुसलमान भेद निर्मीत आहात. या शाळेच्या ध्येयाप्रमाणे तुम्ही वागले पाहिजे.