सासवडमाहात्म्य

नामयाचा धरूनि हात । सांगे संवत्सराची मात । विठोजि म्हणे देई चित्त । ऐक गुह्यार्थ सांगतो ॥ १ ॥

ही पुण्यभूमी पवित्र देखा । याची मूळ आदि पीठिका । सिद्धेश्वर नागेंद्र देखा । पुरातन नांदती ॥ २ ॥

या इंद्रनील पर्वतीं । तप तपिन्नले अमरपती । आणि सूर्यमूखा वरुती । प्रत्यक्ष मूर्ति श्रीशंकराची ॥ ३ ॥

ही स्मशानभूमिका आधीं । येथें सोपान देवा समाधी । पुढें राहिला कैलासनिधी । सन्मुख वाहे भागीरथी ॥ ४ ॥

इची करितां पंचक्रोशी । चुके जन्ममरण चौर्‍यांशी । चारी मुक्ती होती दासी । येउनि चरणासी लागती ॥ ५ ॥

तो हा सोपान निधान । याचे करितां नामस्मरण । सेना कर जोडून । जाती जळून महादोष ॥ ६ ॥

वाचे सोपान म्हणतां । चुके जन्ममरण चिंता ॥ १ ॥

वस्ती केली कर्‍हे तीरीं । पुढें शोभें त्रिपुरारी ॥ २ ॥

सोपानदेव सोपानदेव । नाहीं भय काळाचें ॥ ३ ॥

सोपान चरणी ठेउनि माथां । सेना होय विनविता ॥ ४ ॥

ब्रह्मियाचा अवतर । तो हा सोपान निर्धार । याचें घेतां मुखीं नाम । हरे सकळही श्रम ॥ २ ॥

समाधीपासुनी भागीरथी । स्नानालागी नित्य येती ॥ ३ ॥

अष्टोत्तर तीर्थाचा मेळा । नाम कर्‍हाबाई वेल्हाळा ॥ ४ ॥

वैष्णवांमाजी डिंगर । सेना तयाचा किंकर ॥ ५ ॥

वैकुंठवासिनी कृपावंत माउली । जगा तारावया अळंकापुरा आली ॥ १ ॥

शिव तो निवृत्ति आदिमाया मुक्ताई । ब्रह्मा तो सोपान विष्णु ज्ञानदेव पाहीं ॥ २ ॥

येउनी प्रतिष्ठानी पशुवेद बोलविला । पंडित ब्रह्मज्ञानी यांचा गर्व हरिला ॥ ३ ॥

तप्तीतीरवासी चौदाशें वर्षांचा होता । तयाचा अभिमान गर्व हरी आदिमाता ॥ ४ ॥

वाळितां ब्राह्मणीं स्वर्गाचे पितर आणविले । सेना म्हणे जगीं पूर्णब्रह्म अवतरलें ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel