त्रिंबकमाहात्म्य.

१.

पुण्यभूमी गंगातीरीं । धरी अवतार त्रिपुरारी । नाम त्रिंबक निर्धारी । मागें ब्रह्मगिरी शोभत ॥ १ ॥

पार्वतीसी सांगे कैलासराणा । येथें नांदेल निवृत्ति निधान । त्याचेनि ठाव हा पुण्यपावन । जीवा उद्धरण म्हणता निवृत्ती ॥ २ ॥

जुनाट जुगादीचें गुप्त ठेविलें । तेचि निवृत्ति नाथा दिधलें । ज्ञानदेवें प्रगट केलें । जगा दाविलें निधान ॥ ३ ॥

या भूमिकेचें वर्णन । करूं न शके चतुरानन । कैलासाहून पुण्यपावन । तुजला पूर्ण सांगितलें ॥ ४ ॥

तो हा निवृत्तिनाथ निर्धारी । स्मरतां तरती नरनारी । सेना म्हणे श्रीशंकरी ॥ ऐसे निर्धारी सांगितले ॥ ५ ॥

२.

शिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥ १ ॥

तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ २ ॥

सव्य नांदे कैलासराणा । मागें गंगा ओघ जाणा ॥ ३ ॥

सेना घाली लोटांगण । वंदि निवृत्तिचे चरण ॥ ४ ॥

३.

निवृत्ति निवृत्ति । म्हणतां पाप नुरेची ॥ १ ॥

जप करितां त्रिअक्षरीं । मुक्ती लोळे चरणावरी ॥ २ ॥

ध्यान धरितां निवृत्ती । आनंदमय राहे वृत्ती ॥ ३ ॥

सेना म्हणे चित्तीं धरा । स्मरता चुके येरझार ॥ ४ ॥

४.

सिद्धांमाजी अग्रगणी । तो हा भोळा शुळपाणी ॥ १ ॥

धन्य धन्य त्रिंबक राजा । तया नमस्कार माझा ॥ २ ॥

जटी गंगा वाहे । तो हा त्रिगुणात्मक पाहे ॥ ३ ॥

भोंवता वेढा ब्रह्मगिरी । मध्यें शोभे त्रिपुरारी ॥ ४ ॥

सेना घाली लोटांगण । उभाहर के जोडुन ॥ ५ ॥

५.

धन्य धन्य निवृत्तिराया । शरण आले तुझियां पायां ॥ १ ॥

नको पाहूं दुसरें आतां । गुण दोषाची वारता ॥ २ ॥

नाहीं माझा अधिकार । यातीहीन मी पामर ॥ ३ ॥

अपराधाचा केलों । सेना म्हणे काय बोलों ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel