वासुदेव
टळोनि गेले प्रहर तीन । काय निजतां झांकोन लोचन । आलों मागावया दान । नका विन्मुख होऊं जाण गा ॥ १ ॥
रामकृष्ण वासुदेवा । जाणवितों सकल जिवा । द्या मज दान वासुदेवा । मागुता फेरा नाहीं या गांवा गा ॥ २ ॥
आलों दुरुनी सायास । द्याल दान मागायास । नका करूं माझी निरास । धर्मसार फळ संसारास गा ॥ ३ ॥
एक भाव देवाकारणें । फारसें नलगे देणें घेणें । करा एकचित्त रिघा शरण । हेंचि मागणें तुम्हांकारणें गा ॥ ४ ॥
नका पाहूं काळ वेळां । दान देई वासुदेवा । व्हां सावध झोपेला । सेना न्हावी चरणीं लागला गा ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.