तिने डोळे पुसले. ती शांत झाली व म्हणाली, ''तुम्ही माझ्या पतीला मूठमाती दिलीत. तुमचे उपकार कसे फेडू? हृदयावर ते कोरलेले राहतील. मला ती जागा दाखवता, जेथे त्याला पुरलेत?''
''तुमच्याबरोबर आम्हीहि अश्रूंची तिलांजली द्यायला येतो चला.''
घट्ट पदर बांधून जड गांठोडे उचलून ती निघाली. हृदय फोडून अश्रूंचे पाट वहात येत होते.
ते पहा. भिंतीचे शेवटचे टोक, समुद्राला ते मिळाले आहे. खाली लाटा उसळत आहेत. आकाशाला भेटू बघत आहेत! ती म्हणाली, ''कोठे पुरलेत? दाखवा थडगे.''
ते म्हणाले, ''ही सारी सम्राटाची जागा. त्याची मालकी. येथे कोणाला कसे पुरता येईल? म्हणून येथे भिंतीच्या पायाशी त्याला पुरले. खूण म्हणून तीन हाती दगड बसवला. त्यावर त्याचे नाव खोदले. ही अमर शिळा आहे. ती बघा, ती.?''
तिने तो दगड पाहिला. वारा, पाऊस, ऊन यांना पुसून टाकता न येणारे नाव तिने पाहिले. तिची प्रेमज्वाळा पेटली, भडकली. ''नाथ, वेडया आशेने तुम्ही जिवंत भेटाल म्हणून आले. आणि आता का एकटी राहू? शून्य आकाशाकडे बघत? नाही, कधीहि नाही!''
तिचे प्रेम, तिचे पातिव्रत्य आकाशाला भेदून गेली. पातिव्रत्याची शक्ति विश्वाला हलवील. ती आपल्या पतीची हाडे मिळतात का पहात होती. आणि भिंत फाटली! दगड माती जरा दूर झाली. पतीची त्रिभुवन मोलाची हाडे मिळाली. अंमलदाराने सम्राटाला चमत्कार कळविला. सम्राटाने मेंग चियांगला प्रासादराणी करतों कळवले!
सम्राटाची आज्ञा ती धिक्कारते. ती हाडे आपल्या विश्वासू हृदयाशी धरून लांब भिंतीच्या टोकावर ती उभी राहते. खाली समुद्र उसळत असतो.
घेतली तिने उडी! डुब्!
पूर्व समुद्रात ती विलीन झाली.
आणि सम्राटाला तिच्या पातिव्रत्याची खात्री पटली. तेथे त्या भिंतीजवळ तिचे समाधिमंदीर त्याने उभारले. तिचा दिवस चीनभर पाळण्यात येऊ लागला. तिची पूजा होऊ लागली. मेंग चियांग अमर झाली!
एक चिनी लोककथा