लोककथा सांगतात की एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. त्याच्या सारथ्याच्या - चन्नच्या अडविण्यास न जुमानता, हाती रथाचे सूत्र घेऊन, सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खऱयाया जगाकडे रथ दौडत निघाला. त्याच्या आयुष्याचा सांधा बदलायची वेळ आली होती. आजवर त्याची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती. पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले. घर भरून उरणारे दारिद्ऱ्य त्याने पाहिले. प्रथमच, जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला, जराजर्जर वृद्धत्व पाहिले. एक प्रेतयात्रा त्यास दिसली. चन्नने त्यास सांगितले, की या सार्‍या जीवमात्राच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था आहेत. त्याच्या जगाच्या संदर्भात या जाणिवांना जागाच नव्हती. या गोष्टींचा त्याला अर्थ लागेना. तो सुन्न होऊन गेला. आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात आकंठ बुडालेले आहे हा त्याला साक्षात्कार झाला. त्यानंतर त्याने एक संन्यासी त्याने पाहिला आणि त्याची झोप उडाली, सुखात मन रमेनासे झाले. आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरविले. २९व्या वर्षी एका पावसाळी रात्री, प्रिय पत्‍नी यशोधरेचे ओझरते, अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्ध राजवाड्याबाहेर निघाला. त्याच्या सोबतीला सारथी चन्न कंठक नामक घोड्यासह उभा होता. चन्‍नाने कंथकाच्या टापांचा आवाज होऊ नये म्हणून त्याचे खूर कापडात बांधले होते.

सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला. या संन्याशाला मगध देशाच्या राजा बिंबिसाराच्या सैनिकांनी ओळखले. राजा बिंबिसाराने त्याची थोरवी जाणून त्याला आपले सिंहासन नजर केले. त्यास नकार देत सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले.

ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एकापाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्ममार्गातील त्याची प्रगती पाहून, दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले. परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणार्‍या सिद्धार्थाने त्या दोघांसही नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग तो चालू लागला.

सिद्धार्थ आणि इतर पाच सहसंन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला. ऐहिक सुखाचा पूर्णं त्याग हे सूत्र त्यांनी धरले. अन्नपाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेषी हा मार्ग अतिशय बिकट होता. अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले. शरीर क्षीण होऊन गेले. एके दिवशी स्नान करीत असता झोक जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला, तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली.या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्याने आता ध्यानाचा मार्ग पत्करला.

सिद्धार्थाने मध्यममार्ग निवडला. शरीर हे साधन आहे, ते नाकारून चालणार नाही. शरीर धारण करुनच आत्मबोध होऊ शकेल. शरीरधारणेस आवश्यक एवढेच अन्न ग्रहण करावे, पण शारीरिक भोगापासून दूर रहायला हवे, हा तो मध्यम मार्ग. शरीर धारणेपुरते अन्न –थोडे दूध आणि खीर तो सुजाता नामक एका ग्रामकन्येकडून घेऊ लागला. त्याची शारीरिक अवस्था एवढी विकल झालेली होती, की तिला तो एक प्रेतात्माच वाटत होता. मग एके दिवशी, बोधगया येथे एका अश्वत्थ(पिंपळ) वृक्षाखाली बसून त्याने अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईतो न उठण्याचा निश्चय केला. त्याच्या सोबत्यांच्या मनाने घेतले, की सिद्धार्थ आपल्या सत्य शोधाच्या मार्गापासून ढळला आहे, सबब त्याला सोडून ते निघून गेले. ४९ दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर, वयाच्या ३५व्या वर्षी बोधिवृक्षाच्या छायेत अखेर त्यास ज्ञानप्राप्ती झाली. चांद्रमासांपैकी, काही विद्वानांच्या मते तो पांचवा महिना होता, काहींच्या मते तो बारावा महिना होता. इथून पुढे त्यास बुद्ध म्हटले जाऊ लागले

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel