१) बौद्ध तत्त्वज्ञानाचा हिंदू धर्मावरील प्रभाव
बौद्ध धर्मातील अहिंसा, सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम व सहानुभूती इत्यादी विचारांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला. त्यामुळेच वैदिक धर्मीयांना पुढे अहिंसा (non-voilence) तत्त्वाच्या आवश्यकतेवर भर द्यावा असे वाटले.
२) वैचारिक स्वातंत्र्य
वैचारिक स्वातंत्र्य हे बौद्ध धर्मात खोलवर रुजलेले असून, त्याचा हिंदूंच्या, कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित न करता, वैदिक परंपरांचे पालन करण्याच्या पारंपरिक विचारपद्धतीवर परिणाम झाला.
३) सद्गुणांचा विकास
बौद्ध धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम व मादक पदार्थाचे सेवन करू नये ह्या पाच शील तत्त्वे (पंचशील तत्त्वे) पालन करण्याचा उपदेशच केला नाही तर ती शिकविली आहेत व त्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला आहे.
४) समता तत्त्वाचा प्रभाव
तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय, वर्ण व सामाजिक दर्जा ह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता (equality) प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. त्याचा जातिव्यवस्थेवर आधारलेल्या पारंपरिक हिंदू समाजरचनेवर प्रभाव पडला.
५) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास
विज्ञानवादी बौद्ध धर्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबविण्यासाठी साहाय्य केले आहे. या धर्माची मूलतत्त्वे व तत्त्वज्ञान ही विज्ञानधिष्ठित असल्याने, त्याच्या शिकवणीतून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लागला आहे. २० व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धर्मच खरा विज्ञानवादी धर्म असल्याचे सांगतलेले आहे.
६) नैतिक सिद्धान्ताचा प्रभाव
करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशिलता, शीलसंवर्धन, यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला. याचा वैदिक हिंदू धर्माच्या नियतिवादावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धर्म हा हिंदू धर्माहून अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धर्म आहे.
७) बौद्ध धर्माचे कलेतील योगदान
वास्तुविद्या, लेण्यांचॆ आणि विहारांचे खोदकाम आदी क्षेत्रांत बौद्ध धर्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी (गुफा) -खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रांतील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली.
बौद्ध धर्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन, हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ थायलंड मधील पांढऱ्या रंगाचा एक अप्रतिम बुद्ध विहार आहे.
८) स्थानिक भाषेतील साहित्यविषयक योगदान
बुद्ध, बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या भाषेत (पाली) मांडल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जलद गतीने झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या पालीसारख्या प्राकृत भाषेचा मोठा विकास झाला. बौद्ध धर्माने पाली भाषा व तिच्या धर्मग्रंथ व अन्य धार्मिक पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून साहित्य विकासाला हातभार लावला आहे.
९) शिक्षणास प्रोत्साहन
बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौद्ध विहार व बौद्ध मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खू हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. तक्षशिला व नालंदा या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. नालंदा हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धर्माने स्त्रीशिक्षणाचा व कनिष्ठ जातींच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला.
१०) भारतीय संस्कृतीचा परदेशात प्रसार
बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे आपले पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ १८० देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झालेला असून या देशांत बौद्ध अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
११) आर्थिक विकासाला प्रोत्साहन
बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्याचा बौद्ध धर्म हा राजधर्म होता. जगाच्या एकूण अर्थव्यस्थेत सर्वाधिक म्हणजेच ३४% वाटा हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा होता.