बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिद्धांतावरून तथागत बुद्धांना जगातील महान महापुरुष व गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान,व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार,श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.