बोधिवृक्ष किंवा महाबोधी वृक्ष म्हणजेच 'ज्ञानाचा वृक्ष' (Knowledge Tree) होय. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते. ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसवलेला आहे. सम्राट अशोक बुद्धांचा अनुयायी झाला व नित्यनियमाने बोधिवृक्षाचे दर्शन घेऊ लागला. तेव्हा त्यांची पत्नी राणी तिश्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होऊन तो वृक्ष उपटून टाकला. पण सम्राट अशोकांनी तो पुन्हा लावला. अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा या ठिकाणी नेऊन लावली. इ.स.पू दुसऱ्या शतकात पुष्पमित्र शुंगने आणि इ.स. ६०० मध्ये शशांक राजाने बोधगयेतील बोधिवृक्ष पुन्हा तोडला होता.
चिनी प्रवासी झ्यूझांग यांने बोधिवृक्षाबाबत विस्ताराने लिहिले आहे. परंतु जेव्हा जेव्हा बोधिवृक्ष तोडला गेला तेव्हा प्रत्येक वेळी नवा बोधिवृक्ष त्याठिकाणी लावला गेला.
बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बुद्ध शिल्प
बौद्ध धर्मीय या वृक्षाला अतिशय पवित्र मानतात व त्याची पूजा करतात. भारहूत व बोधगया येथील शिल्पकामात गजराज (हत्ती) हे बोधिवृक्षाची पूजा करीत आहेत अशी चित्रे कोरलेली दिसतात. गया माहात्म्य, अग्नी पुराण, वायू पुराण इ. ग्रंथात बोधगया व बोधिवृक्ष यांचा पुष्कळ महिमा गायलेला आहे. इ.स. १८६२ मध्ये ब्रिटिश पुरातत्त्व अधिकारी अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या पहिल्या खंडामध्ये याची प्रथम नोंद घेतली.