॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे ओंकाररुपा पशुपती । हे भवानीवरा दक्षिणामूर्ति ।
ब्रह्मांडांत जितुक्या विभूति । तितकीं रुपें तुझीं देखा ॥१॥
तुझें रुप जें निराकार । जेणें हें व्यापक चराचर ।
जें सर्वस्वीं आधार । अविद्या माया प्रकृतीला ॥२॥
तें स्वरुप जाणावया । अशक्य आहे देवराया ।
म्हणून तूं करण्या दया । सगुण रुपें धरलींस ॥३॥
जैसें ज्याला वाटत । तैसें तो तुला भाग देत ।
नामामुळें तुजप्रत । भिन्नत्व ये ना कधींही ॥४॥
शैव तुला शिव म्हणती । ब्रह्म बोलती वेदान्ती ।
रामानुजांचा सीतापती । वैष्णवांचा विष्णू तूं ॥५॥
उपासनेप्रमाणें । नांवें मिळालीं तुजकारणें ।
परी तूं अभिन्नपणें । सर्वांठायींच गवससी ॥६॥
तूं सोमनाथ विश्वेश्वर । हीम केदार ओंकार ।
क्षिप्रातटाकीं साचार । महांकाल तूंच कीं ॥७॥
नागनाथ वैजनाथ । घृष्णेश्वर वेरुळांत ।
त्र्यंबक तुला म्हणतात । गोदावरीच्या तटाकीं ॥८॥
तूं भीमाशंकर । मल्लिकार्जुन रामेश्वर ।
तूं गोकर्णरुपी शंकर । तूं महादेव शिंगणापुरीं ॥९॥
त्या अवघ्यांकारण । असो माझें साष्टांग नमन ।
माझ्या त्रितापांचें हरण । शीघ्र करी दीनबंधो ॥१०॥
देवा तुम्ही कुबेराला । क्षणांत धनपती केला ।
मग माझ्याविषयीं कां हो पडला । प्रश्न तुम्हांसी गिरिजापते ? ॥११॥
बाळकृष्णाच्या सदनासी । समर्थ आले दुसरे वर्षी ।
त्या बाळापुरासी । दासनवमीकारणें ॥१२॥
सुकलाल बाळकृष्ण । या बाळापुरालागून ।
निःसीम भक्त होते दोन । त्यांची सरी न ये कोणा ॥१३॥
या वेळीं बरोबर । होते पाटील भास्कर ।
बाळाभाऊ, पितांबर । गणू, जगदेव, दिंडोकार ॥१४॥
उत्सव दासनवमीचा । सांग झाला तेथ साचा ।
दैवयोग भास्कराचा । तेथेंच आला ओढवून ॥१५॥
एक कुत्रें पिसाळलेलें । भास्करा येऊन चावलें ।
तेणें लोक इतर भ्याले । म्हणती आतां हा पिसाळलेला ॥१६॥
उपाय अवघे व्यावहारिक । भास्करासी केले देख
कोणी म्हणती निःशंक । डाँक्टरा धाडा बोलवणें ॥१७॥
भास्कर म्हणे ते अवसरीं । वैद्याची ना जरुर खरी ।
माझा डाँक्टर आसनावरी । बैसला आहे गजानन ॥१८॥
त्याचकडे मजला न्यावें । वृत्त अवघें कळवावें ।
ते सांगतील तें ऐकावें । आपला हेका करुं नका ॥१९॥
गजाननाचे समोर । आणिला पाटील भास्कर ।
बाळाभाऊनें समाचार । अवघा समर्थांस श्रुत केला ॥२०॥
तो अवघा ऐकून । महाराज वदले हांसून ।
हत्या, वैर आणि ऋण । हें कोणासी चुकेना ॥२१॥
सुकलालच्या गाईठायीं । द्वाडपणा जो होता पाही ।
तो या भास्करें लवलाही । शेगांवीं दवडिला ॥२२॥
तें तिचें द्वाडपण । कुत्रें येथें झालें जाण ।
तेंच चावलें येऊन । या पाटील भास्कराला ॥२३॥
तिचा हरण्या द्वाडपणा । मशीं यानें केली प्रार्थना ।
इचें प्यावया दूध जाणा । ऐसा भास्कर मतलबी ॥२४॥
दूध पितां वाटलें गोड । आतां कां रे चाललें जड ।
नको पडदा ठेवूंस आड । वांचवूं कां मी सांग तुला ? ॥२५॥
हें कुत्रें निमित्त झालें । तुझें आयुष्य मुळींच सरलें ।
आतां पाहिजे प्रयाण केलें । तूं या सोडून मृत्युलोकां ॥२६॥
जरी इच्छा असेल मनीं । वांचण्याची तुजलागुनी ।
तरी तुझें मी यापासुनी । रक्षण वेडया करीन ॥२७॥
परी ती होईल उसनवारी । जन्ममृत्यूची बाळा खरी
या अशाश्वताच्या बाजारीं । देणें घेणें चालत ॥२८॥
बोल आतां झडकर । काय तुझा विचार ।
ऐसी कधीं ना येणार । पर्वणी ती जाण तुला ॥२९॥
भास्कर बोले त्यावरी । मी अजाण सर्वतोपरी ।
जें असेल अंतरीं । आपुल्या तेंच करावें ॥३०॥
लेंकुराचें अवघें हित । माता एक तें जाणत ।
ऐसें एक्या अभंगांत । श्रीतुकोबा बोलले ॥३१॥
मी आपलें लेंकरुं । म्हणून विनंती कशास करुं ? ।
तूं अवघ्या ज्ञानाचा सागरु । अवघें कांहीं कळतें तुला ॥३२॥
ऐसें ऐकतां भाषण । संतोषले गजानन ।
खर्याप्रती समाधान । खरें बोलतां होतसे ॥३३॥
कोणी म्हणाले गुरुराया । भास्करासी वांचवा सदया ।
या कुत्र्यापासूनिया । तो आपुला भक्त असे ॥३४॥
महाराज म्हणती त्याकारण । हेंच तुझें अज्ञान ।
अरे वेडया जन्ममरण । हीच मुळीं भ्रांति असे ॥३५॥
जन्मे न कोणी, मरे न कोणी । हें जाणावयालागुनी ।
परमार्थाचा उपाय जाणी । शास्त्रकारें कथन केला ॥३६॥
त्याचा उपयोग करावा । मोह समूळ सोडावा ।
प्रारब्धभोग भोगावा । निमुटपणें हेंच बरें ॥३७॥
संचित-प्रारब्ध-क्रियमाण । हें भोगल्यावांचून ।
या बद्ध जीवालागून । सुटका होणें मुळींच नसे ॥३८॥
पूर्वजन्मीं जें करावें । तें या जन्मीं भोगावें ।
आणि तें भोगण्यासाठीं यावें । जन्मा हा सिद्धान्त असे ॥३९॥
या जन्मीं जें करावें । तें पुढच्या जन्मास उरवावें ।
असे किती सांग घ्यावे । फेरे जन्ममृत्यूचे ? ॥४०॥
पूर्वजन्मीचें उर्वरित । भास्कराचें न उरलें सत्य ।
तो अवघ्यापून झाला मुक्त । मोक्षास जायाकारणें ॥४१॥
म्हणून आग्रह करुं नका । मार्ग त्याचा आडवूं नका ।
काय भास्करासारखा । भक्तराणा जन्मे पुन्हां ॥४२॥
पूर्वजन्मीचें याचें वैरी । कुत्रें होतें निर्धारीं ।
म्हणून तें या बाळापुरीं । चावतें झालें भास्करास ॥४३॥
त्यानें अवघा आपुला । डाव येथें साधिला ।
तैसा जरी शेष उरला । द्वेष मनीं भास्कराच्या ॥४४॥
तरी तो त्याचा द्वेष । कारण पुढील जन्मास ।
कारण होईल भास्करास । दावा आपुला उगवावया ॥४५॥
म्हणून पूर्वजन्मींचें वैर सरलें । आतां न कांहीं शेष उरलें ।
या भासकराकारण भलें । अवघ्या उपाधि निरसल्या ॥४६॥
आतां मी इतकेंच करितों । दोन महिने वांचवितों ।
याला न पिसाळूं देतों । श्वानविषापासून ॥४७॥
तें न मीं केलें जरी । हा जन्मास येईल पुन्हां परी ।
दोन महिने भूमिवरी । उरलें आयुष्य भोगावया ॥४८॥
ऐसें ज्ञान ऐकिलें । तें कित्येकांस नाहीं पटलें ।
मात्र बाळाभाऊ आनंदले । त्या बोधातें ऐकुनी ॥४९॥
भास्करा, तूं धन्य धन्य । संतसेवा केलीस पूर्ण ।
चुकलें तुझें जन्ममरण । काय योग्यता वानूं तुझी ? ॥५०॥
ऐसा प्रकार झाल्यावरी । मंडळी आली शेगांवनगरीं ।
भास्कर बोले मधुरोत्तरीं । महाराजांच्या भक्तगणां ॥५१॥
बाळापूरची हकीकत । सांगे प्रत्येका इत्यंभूत ।
माझी विनंती जोडून हात । हीच तुम्हां भास्कर म्हणे ॥५२॥
महाराज लाधले शेगांवा । याचा विचार करावा ।
या कीर्तीचा अमोल्य ठेवा । सांभाळा स्मारक करुन ॥५३॥
त्यांना स्मारकाची जरुर नाहीं । ते पुढीलांसाठीं पाही ।
तें स्मारक साक्षी देई । त्यांच्या अमोल साधुत्वाची ॥५४॥
पाहा आळंदीस ज्ञानेश्वर । समर्थ सज्जनगडावर ।
पवित्र केलें देहूनगर । त्या तुकोबारायानें ॥५५॥
त्यांचीं स्मारकें त्या त्या ठायां । ठेविलीं भव्य करुनिया ।
तोच पथ अनुसराया । तुम्हीं झटावें मनापून ॥५६॥
ऐसें प्रत्येका सांगत । भास्कर राहिला निवांत ।
परी त्याच्या मनांत । ऐसें आलें एकदां ॥५७॥
हे मला हो हो म्हणती । माझी ऐकून विनंती ।
परी शंका येत चित्तीं । हो म्हणण्याची यांची मला ॥५८॥
त्यानें एकदां ऐसें केलें । अवघ्या लोकांस मिळविलें
एक्या ठायीं मठांत भले । महाराजांच्या अपरोक्ष ॥५९॥
बंकटलाल पाटील हरी । मारुती चंद्रभान कारभारी ।
जो खंडुजीच्या दुकानावरी । होता कारभार करीत ॥६०॥
श्रीपतराव वावीकर । ताराचंद साहुकार ।
आणिक मंडळी होती इतर । नांवें कुठवर सांगावीं ? ॥६१॥आ
मिळवूनिया त्या लोकांला । भास्करें पदर पसरीला ।
माझा आतां संबंध उरला । दोन महिनेच तुमच्याशीं ॥६२॥
माझ्या मनीं ऐशी आस । समर्थांचें स्मारक खास ।
भव्य व्हावें वर्हाडास । या शेगांवामाझारी ॥६३॥
तुम्ही हें करितों म्हणा । तेणें आनंद माझ्या मना ।
होऊन सुखें करीन गमना । मी वैकुंठाकारणें ॥६४॥
संतसेवा कधींही । अनाठाईं जाणार नाहीं
इच्छा जयाची ज्या ज्या होई । त्या, त्या संत पुरविती ॥६५॥
स्मारक ऐसें करावें । अवघ्यांनींच वाखाणावें ।
पाहून त्या डोलावें । प्रत्येकानें आपुल्या मनीं ॥६६॥
ऐसेंच स्मारक करण्याची । शपथ वाहा समर्थांची ।
ही विनंति अखेरची । माझी ती मान्य करा ॥६७॥
तें अवघ्यांनीं कबूल केलें । भास्कराचें स्थीरावलें ।
यायोगें तें चित्त भलें । रुखरुख मनाची संपली ॥६८॥
उत्तरोत्तर आनंदवृत्ती । भास्कराची वाढत होती ।
जैसीं लेंकुरें आनंदती । पुढील सणाच्या आशेनें ॥६९॥
माघ वद्य त्रयोदशीस । महाराज वदले भास्करास ।
चाल त्र्यंबकेश्वरास । जाऊं आपण शिवरात्रीला ॥७०॥
तो त्र्यंबकराजा कर्पूरगौर । भवभवांतक भवानीवर ।
जो आहे झाला स्थीर । श्रीगोदावरीच्या तटातें ॥७१॥
तें ज्योतिर्लिंग मनोहर । करी पातकाचा संहार ।
नको करुंस आतां उशीर । जाऊं गंगास्नानाला ॥७२॥
भास्करा, त्या त्र्यंबकेश्वरीं । पहाड एक ब्रह्मगिरी ।
जेथें औषधी नानापरी । बहुसाल असती उगवलेल्या ॥७३॥
त्या ब्रह्मगिरीवर स्थित । आहेत पहा गहनीनाथ ।
ज्यांना आहेत अवगत । गुणधर्म औषधीचे ॥७४॥
वेडया कुत्र्याच्या विषावरी । तेथें औषधी आहे खरी ।
तिचा उपयोग सत्वरीं । करुन पाहूं येधवां ॥७५॥
भास्कर म्हणे गुरुनाथा । आतां औषधी कशाकरतां ? ।
तुमची आहे अगाध सत्ता । औषधीहून आगळी ॥७६॥
आपुल्या कृपेनें भलें । विष बाळापुरींच निमालें ।
आयुष्याचे आहेत उरले । दोन महिने आतां कीं ॥७७॥
म्हणून वाटे मजप्रती । शेगांवींच राहूं गुरुमूर्ती ।
त्र्यंबकेश्वरा आम्हांप्रती । तुहीच आहांत साक्षात् ॥७८॥
गोदावरी तुमचे चरण । तेथेंच मी करी स्नान ।
अन्य तीर्थाचें प्रयोजन । मला न आतां राहिलें ॥७९॥
ऐसी ऐकतां त्याची वाणी । समर्थ वदले हांसोनी ।
हें जरी खरें जाणी । तरी तीर्थमहिमा मानावा ॥८०॥
चाल नको करुं उशीर । पाहूं तो त्र्यंबकेश्वर
बाळाभाऊ पीतांबर । यांसही घे बरोबरी ॥८१॥
मग ती मंडळी निघाली । शेगांवाहून भली ।
शिवरात्रीस येती झाली । त्र्यंबकेश्वराकारणें ॥८२॥
कुशावर्ती केलें स्नान । घेतलें हराचें दर्शन ।
गंगाद्वारां जाऊन । पूजन केलें गौतमीचें ॥८३॥
वंदिली माय निलांबिका । तेवीं गहनी निवृत्तिनाथ देखा ।
तेथून आले नाशिका । गोपाळदासास भेटावया ॥८४॥
हा गोपाळदास महंत । काळ्या रामाच्या मंदिरांत ।
धुनी लावूनी द्वारांत । पंचवटीच्या बसलासे ॥८५॥
राममंदिरासमोर । एक पिंपळाचा होता पार ।
शिष्यांसहित साधुवर । तेथें जाऊन बैसले ॥८६॥
गोपाळदासास आनंद झाला । बोलले जवळच्या मंडळीला ।
आज माझा बंधु आला । वर्हाडांतून गजानन ॥८७॥
जा घ्या त्यांचें दर्शन । अनन्यभावें करुन ।
माझी ही भेट म्हणून । नारळसाखर त्यांसी द्या ॥८८॥
हा हार घाला कंठांत । तो मी एक साक्षात् ।
देह भिन्न म्हणून द्वैत । आम्हां उभयतीं मानूं नका ॥८९॥
शिष्यांनीं तैसेंच केलें । दर्शन घ्याया अवघे आले ।
कंठामाजीं घातिले । दिलेल्या पुष्पहाराला ॥९०॥
नारळ आणि खडीसाखर । ठेविली स्वामीसमोर
ती पाहून गुरुवर । ऐसें बोलले भास्कराला ॥९१॥
हा प्रसाद अवघ्यांस वाटी । परी न होऊं देई दाटी ।
माझ्या बंधूची झाली भेटी । आज या पंचवटींत ॥९२॥
माझें येथील काम झालें । आतां नाशकाचें राहिलें ।
म्हणून पाहिजे तेथें गेले । धुमाळ वकीलाच्या घरा ॥९३॥
महाराज आले नाशकांत । लोक दर्शना जमले बहुत ।
बारीक सारीक गोष्टी अमित । तेथें असतां जहाल्या ॥९४॥
त्या अवघ्या सांगतां । विस्तार होईल उगीच ग्रंथा ।
म्हणून देतों संक्षेप आतां । त्याची क्षमा करा हो ॥९५॥
तेथें राहून कांहीं दिवस । महाराज आले शेगांवास ।
तो अडगांवीं नेण्यास । श्यामसिंग पातला ॥९६॥
त्यानें आग्रह केला फार । समर्थें दिलें उत्तर ।
रामनवमी झाल्यावर । येऊं आम्ही अडगांवा ॥९७॥
आतां तूं जावें परत । उगा न पडे आग्रहांत ।
श्यामसिंग मुळींच भक्त । निःसीम होता समर्थांचा ॥९८॥
तो आला तैसा परत गेला । आपुल्या त्या अडगांवाला ।
पुन्हां श्रोते येतां झाला । रामनवमीस शेगांवीं ॥९९॥
उत्सव करुन शेगांवांत । समर्थांना शिष्यांसहित ।
आला घेऊन अडगांवांत । हनुमानजयंतीकारणें ॥१००॥
अडगांवीं असतां समर्थस्वारी । चमत्कार झाले नानापरी ।
एके दिवशीं दोन प्रहरीं । भास्कर लोळविला फुपाट्यांत ॥१॥
छातीवरी बैसून । भास्करा केलें ताडन ।
लोक पहाती दुरुन । परी जवळी कोणी जाईना ॥२॥
बाळाभाऊ जवळ होता । तो म्हणाला सद्गुरुनाथा ।
भास्करासी सोडा आतां । बेजार झाला उन्हानें ॥३॥
तैं म्हणाला भास्कर । बाळाभाऊ न जोडा कर ।
माझा हा साक्षात् ईश्वर । काय करील तें करुं दे ॥४॥
लोकांसी वाटती चापटया दिल्या । मला होतात गुदगुल्या ।
अनुभवाच्या गोष्टी भल्या । अनुभवीच जाणती ॥५॥
पुढें घेऊन भास्करासी । महाराज आले बिर्हाडासी ।
त्या अडगांव ग्रामासी । उतरलेल्या ठिकाणास ॥६॥
बाळाभाऊस बोलले । अवघे आतां दोन उरले ।
भास्कराचे दिवस भले । पंचमीला जाईल तो ॥७॥
आज मीं जें केलें कृत्य । ताडनाचें रानांत ।
तें कां हें तुजप्रत । आलें असेल कळोनी ॥८॥
तुजला या भास्करानीं । मारविलें होतें छत्रीनीं ।
शेगांवीं माझ्या करांनीं । तें आहे कां ध्यानांत ? ॥९॥
तें क्रियमाण नासावया । त्यास मीं मारिलें ये ठायां ।
ह्या एकाच गोष्टीवांचूनिया । अन्य नव्हता हेत कांहीं ॥११०॥
उत्सव पूर्ण झाल्यावर । त्या अडगांवींचा साचार ।
काय घडला प्रकार । तो आतां परियेसा ॥११॥
उत्सवाचा काला झाला । वद्य पंचमी दिवस आला ।
एक प्रहर दिवसाला । समर्थ म्हणती भास्करासी ॥१२॥
भास्करा तुझें प्रयाण । आज दिवशीं आहे जाण ।
पद्मासन घालून । पूर्वाभिमुख बैसावें ॥१३॥
चित्त अवघें स्थिर करी । चित्तीं सांठवावा हरी ।
वेळ आली जवळ खरी । आतां सावध असावें ॥१४॥
इतर जनांकारण । म्हणूं लागले करा भजन ।
"विठ्ठल विठ्ठल नारायण" । ऐसें उच्च स्वरानें ॥१५॥
हा तुमचा बंधु भला । जातो आज वैकुंठाला ।
त्याच्या करा पूजनाला । माळ बुक्का वाहून ॥१६॥
भास्करें घातलें पद्मासन । नासाग्रीं दृष्टि ठेवून ।
वृत्ति अवघ्या केल्या लीन । अंतर्मुख होऊनियां ॥१७॥
भक्त भास्करा पूजिती । माळा बुक्का वाहती ।
तें कौतुक पाहाती । समर्थ दूर बैसून ॥१८॥
भजन झालें एक प्रहर । माध्यान्हीस आला दिनकर ।
महाराजांनीं ’हरहर’ । शब्द केला मोठयानें ॥१९॥
त्यासरसा प्राण गेला । भास्कराचा वैकुंठाला ।
संतांनीं हातीं धरिलें ज्याला । तो पाहुणा हरीचा ॥१२०॥
लोक पुसती महाराजास । कोठें करणें समाधीस ।
या भास्कराच्या शरीरास । कोठें न्यावें ठेवावया ? ॥२१॥
समर्थ अवघ्यांस सांगती । द्वारकेश्वर जो पशुपती ।
ज्याच्या सन्निध आहे सती । तेथें ठेवा भास्कराला ॥२२॥
ऐसी आज्ञा होतां क्षणीं । विमान बांधिलें लोकांनीं ।
केळीचे खांब लावुनी । चहुं बाजूंस विबुध हो ॥२३॥
आंत ठेविलें कलेवर । पुढें भजनाचा होय गजर ।
मिरवीत आणिला भास्कर । द्वारकेश्वराचीयापासी ॥२४॥
सांगविधि समाधीचा । ते ठायीं झाला साचा ।
लोक म्हणती महाराजांचा । परम भक्त गेला हो ॥२५॥
दुसरे दिवसापासून । समाधीच्या सन्निध जाण ।
होऊं लागलें अन्नदान । गोरगरीबांकारणें ॥२६॥
स्थान द्वारकेश्वराचें । अडगांवाच्या सन्निध साचें ।
अंतर एक मैलाचें । गांवापासून उत्तरेस ॥२७॥
जागा द्वारकेश्वराची । परमरमणीय होती साची ।
झाडी चिंचवृक्षांची । होती विशेष ते ठायां ॥२८॥
निंब अश्वत्थ मांदार । आम्र वट औदुंबर ।
ऐसे वृक्ष होते इतर । शिवाय कांहीं फुलझाडें ॥२९॥
अडगांव अकोलीच्या मध्यंतरीं । हें ठिकाण निर्धारी ।
तेथें समाधि दिधली खरी । समर्थांनीं भास्कराला ॥१३०॥
दहा दिवस अन्नदान । झालें याचें वर्णन ।
तुम्ही नुकतेंच केलें श्रवण । संतभंडारा नांव ज्याचें ॥३१॥
चिंचवृक्षांच्या सावलींत । जेवाया बसे पंगत ।
तयीं कावळे अतोनात । त्रास देऊं लागले ॥३२॥
काव काव ऐसें करिती । द्रोण पात्रीचे उचलून नेती ।
मलोत्सर्ग तोही करिती । जेवणारांच्या अंगावर ॥३३॥
यायोगें लोक त्रासले । कावळ्यांस हाकूं लागले ।
भिल्लांनीं ते तयार केले । तीरकमटे त्या मारावया ॥३४॥
तईं बोलले गजानन । अवघ्या लोकांलागून ।
नका मारुं त्याकारण । अपराध त्यांचा कांहीं नसे ॥३५॥
या भंडार्यांत येण्याचा । हेतु इतकाच आहे त्यांचा ।
प्रसाद आपणा भास्कराचा । इतरांपरी मिळावा ॥३६॥
कां कीं हा भास्कर । वैकुंठीं गेला साचार ।
हा पितृलोकावर । नाहीं मुळींच राहिला ॥३७॥
दहा दिवसपर्यंत । प्राण अंतरिक्षांत ।
राहे परिभ्रमण करित । सपिंडी होता जाय पुढें ॥३८॥
त्या अकराविया दिवशीं । बली देती कावळ्याशीं ।
काक जेव्हां स्पर्शेल त्यासी । तेव्हांच प्राण जातो पुढें ॥३९॥
त्या बलीदानाचें । कारण भास्करा नुरलें साचें ।
म्हणून या कावळ्यांचें । पित्त गेलें खवळून ॥१४०॥
आत्मा या भास्कराचा । मुळींच मुक्त झाला साचा ।
तो पाहुणा वैकुंठीचा । झाला आहे येधवां ॥४१॥
या सोमसूर्य लोकाचें । कारण त्यासी नुरलें साचें ।
म्हणून पिंडदानाचें । नुरलें पाहा प्रयोजन ॥४२॥
जयाला न ऐसीं गती । त्याच्यासाठीं पिंड देती ।
कावळ्यांची वाट पाहाती । पिंड ठेवून कलशावर ॥४३॥
म्हणून कावळे रागावले । त्यांनीं हें जाणीतलें ।
भास्करानें गमन केलें । एकदम वैकुंठ लोकाला ॥४४॥
म्हणून आम्हां प्रसाद त्याचा । मिळूं द्या या भंडार्याचा ।
ऐसा विचार कावळ्यांचा । दिसतो या कृतीनें ॥४५॥
तुम्ही त्यांस मारुं नका । मीच तया सांगतों देखा ।
अहो जिवांनो ! माझें ऐका । गोष्ट आतां सांगतों जी ॥४६॥
तुम्ही उद्यांपासोन । वर्ज्य करा हें ठिकाण ।
ना तरी भास्करालागून । येईल माझ्या कमीपणा ॥४७॥
आज प्रसाद घेऊन । तुम्ही तृप्त व्हा अवघेजण ।
मात्र उद्यांपासून । या स्थळासी येऊं नका ॥४८॥
ऐसें महाराज बोलले । तें भाविकांसी अवघें पटलें ।
परि कुत्सित जे कां बसले । होते त्या मंडळींत ॥४९॥
ते एकमेकांलागुनी । म्हणते झाले हांसोनी ।
ही गजाननानें केली वाणी । अस्थानीं कीं निरर्थक ॥१५०॥
पक्षी कुठें कां वागतात । मानवाच्या आज्ञेंत ? ।
पाहूं याची प्रचीत । उद्यां मुद्दाम येऊनी ॥५१॥
हे वेडे कांहीं बोलती । भाविका नादीं लाविती ।
आपलें स्तोम माजविती । संतत्वाचें निरर्धक ॥५२॥
अहो साजेल तें बोलावें । जें कां पचेल तेंच खावें ।
उसनें न कधीं आणावें । अवसान तें अंगांत ॥५३॥
दुसरे दिवशीं ते कुत्सित । मुद्दाम पाहाया आले तेथ ।
तों एकही ना दृष्टीप्रत । पडला त्यांच्या कावळा ॥५४॥
मग मात्र चकित झाले । समर्थांसी शरण आले ।
बारा वर्षें तेथ भले । कावळे न आले श्रोते हो ॥५५॥
चौदा दिवस झाल्यावरी । गजानन फिरले माघारीं ।
येते झाले शेगांव नगरीं । आपल्या उर्वरित शिष्यांसह ॥५६॥
श्रोते त्या शेगांवांत । एक गोष्ट घडली अघटित ।
ती ऐका सावचित्त । सांगतों मी येधवां ॥५७॥
होतें साल दुष्काळाचें । म्हणून एका विहिरीचें ।
काम चाललें खोदण्याचें । सुरुंगातें लावून ॥५८॥
विहीर दोन पुरुषावर । गेली खोल साचार ।
खडक काळा लागला थोर । गती खुंटली पहारीची ॥५९॥
म्हणून भोकें करुन । आंत दारु ठासून ।
सुरुंगांच्या साह्यें करुन । काम फोडण्याचें सुरुं झालें ॥१६०॥
चारी बाजूंस भोकें चार । केलीं पहारीनें तयार ।
दारु ठासिली अखेर । आंत दोर्या घालुनी ॥६१॥
एरंड पुंगळ्या पेटवून । सोडल्या चारी दोर्यांतून ।
तों मध्येंच बसल्या अडकून । दोर्याचीया गांठीवरी ॥६२॥
पुंगळी खालीं जाईना । दारुस विस्तव लागेना ।
पाणी दम धरीना । आलें जवळी सुरुंगाच्या ॥६३॥
तैं कामावरचा मिस्तरी । विचार करी अंतरीं ।
सुरुंगास लागल्या वारी । सुरुंग वायां जाईल कीं ॥६४॥
म्हणून गणू जवर्याला । मिस्तरी तो बोलला ।
तूं उतरुन विहिरीला । पुंगळ्या थोडया सरकीव ॥६५॥
आणि तूं येईं लौकर वरी । पुंगळ्या जातील तोंवरी ।
बाराचिया शेजारी । म्हणजे काम होईल ॥६६॥
त्या पुंगळ्या सरकावण्यासी । कोणी न धजे जावयासी ।
म्हणून या गणू जवर्यासी । मिस्तरीनें दटाविलें ॥६७॥
काय करितो बिचारा । दारिद्रय होतें ज्याच्या पदरां ।
त्याच्यावरी चाले जोरा । यज्ञास बळी बोकडाचा ॥६८॥
या गणू जवर्याची । निष्ठा समर्थावरी साची ।
आज्ञा होतां मिस्तरीची । गणू आंत उतरला ॥६९॥
एक पुंगळी सरकविली । ती तात्काळ तळा गेली ।
दारुप्रती जाऊन भिडली । गणू आंत सांपडला ॥१७०॥
दुसरीस जों घाली हात । पुंगळी सरकवण्याप्रत ।
तों पहिला सुरंग उडाला सत्य । मग काय विचारतां ? ॥७१॥
गणू म्हणे विहिरींतून । समर्था ये धांवून ।
माझें आतां रक्षण । तुझ्यावीण कोण करी ? ॥७२॥
विहिरीमाजीं धुराचा । डोंब झाला होता साचा ।
दुसरा सुरुंग पेटण्याचा । अवधि उरला थोडका ॥७३॥
तों गणू जवर्या भली । कपार हातां लागली ।
त्या कपारींत बैसली । स्वारी गणू जवर्याची ॥७४॥
एकामागून एकांनीं । पेट घेतला सुरुंगांनीं ।
उडाले सुरुंग ऐसे तिन्ही । दगड अपार निघाले ॥७५॥
छिन्न भिन्न शरीर । झालें असेल साचार ।
डोकावून पाहाती नारीनर । आंत गणू जवर्याला ॥७६॥
तो कोठें दिसेना । जनाच्या नाना कल्पना ।
दगडाप्रमाणें गणू जाणा । उडाला असेल बाहेर ॥७७॥
त्याचें आसमंत भागांत । कोठें तरी असेल प्रेत ।
पडलेलें त्या शोधण्याप्रत । माणूस कोणी पाठवा ॥७८॥
मिस्तरीचा शब्द ऐकिला । आंतून गणू बोलला ।
अहो मिस्त्री नाहीं मेला । गणू आहे विहिरींत ॥७९॥
गजाननाच्या कृपेनीं । मी वांचलों या ठिकाणीं ।
बसलों आहे दडोनी । या पहा कपारींत ॥१८०॥
परी कपारीच्या तोंडाला । धोंडा एक मोठा पडला ।
त्यामुळें बाहेर मला । येतां येत नाहीं कीं ॥८१॥
गणूचे शब्द ऐकिले । लोक अवघे आनंदले ।
लोक खालीं उतरले । तो धोंडा काढावया ॥८२॥
दहापांच जणांनीं । धोंडा सरकविला पहारींनीं ।
गणूस बाहेर काढूनी । घेऊन आले वरते त्या ॥८३॥
वरतीं येतांच गांवांत । गणू गेला पळत पळत ।
समर्थांच्या मठांत । दर्शन त्यांचें घ्यावया ॥८४॥
गणू दर्शना येतांक्षणीं । बोलले त्या कैवल्यदानी ।
गण्या कपारींत बैसोनी । किती धोंडे उडविलेस ? ॥८५॥
त्यांत मोठा धोंडा तुला । रक्षण्यास येऊनी बैसला ।
कपारीच्या तोंडाला । म्हणून तूं वांचलास ॥८६॥
पुन्हां ना ऐसें साहस करी । पुंगलीवरुन सुटल्यापरी ।
मधेंच तिला जाऊन करीं । कशाही प्रसंगीं धरुं नये ॥८७॥
जा तुझें गंडांतर । आज निमालें साचार ।
गणूप्रती पाहाया इतर । लोक आले गांवींचे ॥८८॥
गणू म्हणे सद्गुरुनाथा । सुरुंग चारी पेटतां ।
तूंच मला देऊन हातां । कपारींत बैसविलें ॥८९॥
म्हणून मी वांचलों । तुझे पाय पाहाया आलों ।
ना तरी असतों मेलों । विहिरीमाजीं गुरुराया ! ॥१९०॥
ऐसें गजाननकृपेचें । महिमान आहे थोर साचें ।
तें साकल्य वर्णण्याचें । मसीं नाहीं सामर्थ्य ॥९१॥
श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
आल्हादवो भाविकांप्रत । हेंच इच्छी दासगणू ॥१९२॥
शुभं भवतु ॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥