वयाच्या पाचव्या वर्षी रामानुजन यांचे नाव कुंभकोणमच्या प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. आपल्या वर्गात ते सर्वात हुशार विद्यार्थी होते. गणितावर त्यांचे कल्पनातीत प्रभुत्व होते. ते मनातच गणित करून उत्तर शोधत. रामानुजन विलक्षण प्रतिभाशाली होते. कधी कधी ते असे प्रश्न विचारत की, त्यांचे शिक्षकही कोड्यात पडत. संध्याकाळी शाळा सुटल्यावर इतर मुले खेळत असत, तेव्हा ते पाटी व खडू घेऊन प्रश्न सोडवण्यात मग्न होत.
नोव्हेंबर, १८९७ मध्ये, दहा वर्षांचे असताना संपूर्ण तंजावर जिल्ह्यात प्राथमिक शाळेच्या परीक्षेत ते प्रथम आले. यामुळे कुंभकोणम हायस्कूलमध्ये मोफत शिक्षण मिळण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. माध्यमिक शाळेत देखील गणिताच्या सर्व परीक्षांत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला व अनेक पारितोषिकेही मिळवली. त्यांच्या या यशामुळे त्यांचे शिक्षक प्रभावित झाले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.