डॉक्टरांच्या मते, त्यांच्या प्रकृतीला कोरडे हवामानाच अनुकूल असल्याने त्यांनी भाटतात जावे. शेवटी मार्च, १९१९ मध्ये ते भारतात परतले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. मित्र व हितचिंतकांनी उपचार करूनही २६ एप्रिल, १९२० रोजी त्यांचे कुंभकोणम येथे अकाली निधन झाले. एक उज्ज्वल तारा क्षितिजावर अचानकच निखळला. त्यावेळी त्यांचे वय केवळ ३२ वर्षांचे होते. गणितज्ञांकडून त्यांना असामान्य व विलक्षण प्रतिभावंतांसारखी प्रतिष्ठा मिळाली, की जी केवळ स्वीस गणितज्ञ लियोनहार्ड यूलर (इ.स. १७०७-८३) व जर्मन गणितज्ञ कार्ल जैकोबी (इ.स. १८०४-५१) यांच्याशिवाय कोणाला मिळाली नाही.
जाडजूड अशा तीन वह्यांमध्ये असणारे गणितातील त्यांचे संशोधन कार्य आज 'रामानुजन्स नोटबुक्स' या नावाने ओळखले जाते. त्यांचे हे साधन नंतर तर प्रगाढ अभ्यासाचा विषय ठरले. इ.स. १९२७ मध्ये केंब्रिज विद्यापीठाने या संशोधन कार्याचे हार्डी यांच्याकडून संपादन करवून घेऊन ते प्रकाशित केले. त्यांचे काही संशोधन अजूनही अप्रकाशित आहे. रामानुजन यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च, मुंबई यांच्या गणित विभागाने त्यांच्या अनेक कृती संपादित व प्रकाशित केल्या. त्यांची एक वही गहाळ झाली होती. नंतर ती प्रा. जॉर्ज अॅन्र्डूज यांना सापडली. ते अमेरिकेत संशोधन कार्य करत आहेत व तेथेच ते संपादित प्रकाशित करू इच्छित आहेत.
विद्यापीठात त्यांनी केलेल संशोधन, संस्थांना दिलेली अमूल्य सेवा व गणिती विश्वाला दिलेले संशोधनासंबंधीचे योगदान यासाठी केंब्रिज विद्यापीठ व ट्रिनीटी महाविद्यालय यांनी या विश्वप्रसिद्ध गणितज्ञाच्या पत्नी जानकी अम्मा यांना इ.स. १९८८ साली २००० पौंड वार्षिक निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय घेतला.