माता भुवनेश्वरी देवी
उत्तर कलकत्त्यातील सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३, सोमवारी सकाळी ६:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.