1 नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “या काळातील दुष्ट लोकात माझ्यासमोर तूच एक नीतिमान माणूस आहेस असे मला आढळले आहे; तेव्हा तुझ्या कुटुंबातील सर्वांना घेऊन तारवात जा.
2 अर्पणासाठी वरील प्रत्येक जातीच्या शुद्ध प्राण्यापैकी नरमाद्यांच्या सात जोड्या, इतर अशुद्ध प्राण्यापैकी नरमादी अशी एकच जोड़ी,
3 आणि पक्षांच्या नरमादी अशा सात जोड्या तुझ्याबरेबर तारवात नें. पृथ्वीवर त्यांचे बीज राहील
4 आतापासून सात दिवसांनी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र प्रचंड पाऊस पाडीन; त्यामुळे पृथ्वीवर मी निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचा नाश होईल.”
5 परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्वकाही केले.
6 पाऊस आला तेव्हा नोहा सहाशे वर्षांचा होता.
7 जलप्रलयातून तरुन जावे म्हणून नोहा व त्याचे सह त्याचे कुटुंब म्हणजे त्याची बायको, त्याचे मुलगे व सुना हे तारवात गेले.
8 तसेच पृथ्वीतलावरील सर्व शुद्ध व अशुद्ध पशूपक्षी, सरपटणारे व रांगणारे प्राणी
9 हे सर्व देवाने सांगितल्याप्रमाणे नर व मादी अशा जोडी जोडीने नोहाबरोबर तारवात गेले.
10 मग सात दिवसानंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरवात झाली.
11 दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी पृथ्वीतील पाण्याचे सर्वझरे फुटले व पाणी उफाळून वर आले व जमिनीवरुन वाहू लागले; त्याच दिवशी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली; जणू काय आकाशाच्या खिडक्या उघडल्या; चाळीस दिवस व चाळीस रात्र मुसळधार पाऊस पडला. त्याच दिवशी नोहा, त्याची बायको, त्याचे मुलगे शेम, हाम व याफेथ व त्यांच्या बायका ही सर्वमंडळी तारवात गेली. त्यावेळी नोहा सहाशे वर्षांचा होता.
12
13
14 नोहाचे कुटुंब आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राणी म्हणजे सर्व जातीची गुरेढोरे इतर पशू जमिनीवर सरपटणारे आणि आकाशात उडणारे पक्षी हे तारवात होते.
15 आणि ज्यांच्या जीवात प्राण आहे असे सर्व प्रकारचे प्राणी दोन दोनच्या गटाने तारवात गेले.
16 देवाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे जीवंत प्राणी जोडीने नर व मादी असे तारवात गेले आणि मग परमेश्वराने दार बंद केले पाणी वाढू लागले आणि त्याने जमिनीवरुन तारु उचलले.
17 चाळीस दिवस पृथ्वीवर महापुर पाणी आले;
18 पाणी एक सारखे चढतच गेले आणि त्यामुळे तारु जमिनीपासून उंचावर तरंगू लागले;
19 पाणी इतके वर चढत गेले की उंच उंच पर्वत देखील पाण्यात बुडून गेले;
20 पाणी सर्वात उंच पर्वत शिखरावर वीस फुटा पेक्षा अधिक उंच इतके वर चढले.
21 पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राणी, म्हणजे सर्व स्त्री, पुरुष, तसेच सर्व पक्षी, गुरेढोरे, ग्रामपशू, वनपशू सरपटणारे प्राणी हे सर्व जीव जंतू मरुन गेले.
22
23 अशा रीतीने देवाने पृथ्वीच्या पाठीवरील सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व जीवधारी प्राण्यांचा नाश केला; जे वाचले ते म्हणजे नोहा, त्याचे कुटुंब आणि तारवात त्याच्या सोबत असलेले प्राणी, फक्त एवढेच.
24 पाण्याने एकशे पन्नास दिवस पृथ्वीला झाकून ठेवले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel