योसेफाला विकत घेतलेल्या व्यापाऱ्यांनी त्याला मिसरला नेले व फारो राजाचा एक अधिकारी गारद्यांचा म्हणजे संरक्षक दलाचा सरदार पोटीफर यास विकले.
2 परंतु परमेश्वराने योसेफाला सहाय्य केले म्हणून तो यशस्वी पुरुष झाला. योसेफ आपला स्वामी मिसरचा रहिवासी पोटीफर याच्यास घरी राहात असे.
3 परमेश्वर योसेफा बरोबर आहे आणि म्हणून त्याच्या हर एक कामात तो त्याला यश देतो हे पोटीफरला दिसून आले.
4 म्हणून पोटीफर योसेफावर फार खुष होता. त्याने योसेफाला आपल्या घरचा कारभार पाहाण्यात मदत करण्यास सांगितले.
5 तेव्हा पोटीफराच्या सर्व कारभाराचा अधिकारी नेमल्यावर परमेश्वराने योसेफामुळे पोटीफराचे घरदार, शेतीबाडी इत्यादी त्याच्या मालकीच्या सर्व मालमत्तेस आशीर्वाद दिला.
6 याप्रमाणे पोटीफराने आपल्या घरादाराचा सर्व कारभार योसेफाच्या हवाली केला; म्हणून पोटीफर फक्त पुढ्यात वाढलेले भोजन घेई, त्या पलीकडे कशाचीही जबाबदारी त्याच्यावर नव्हती.योसेफ फार देखणा व बांधेसूद तरुण होता.
7 काही काळानंतर पोटीफराच्या बायकोला तो आवडू लागला. एके दिवशी ती त्याला म्हणली, “माझ्याबरोबर नीज”
8 परंतु तसे करण्यास योसेफाने तिला नकार दिला. तो म्हणाला, “पाहा, या घराच्या सर्व कारभाराबद्दल माझ्या स्वामीचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हा खेरीज येथील सर्व गोष्टी त्याने माझ्या ताब्यात देऊन त्यांची सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.
9 माझ्या स्वामीने मला या घरात जवळ जवळ त्याच्या समान मोठपणा दिला आहे; असे असताना अशा उदार स्वामीच्या बायकोपाशी निजणे मला योग्य नाही. ते चुकीचे आहे; ते परमेश्वराच्या विरुद्ध घोर पाप आहे!”
10 पोटीफराची बायको दररोज योसफाबरोबर बोलत असे परंतु त्याने तिच्याबरोबर निजण्यास स्पष्ट पणे नकार दिला.
11 एके दिवशी योसेफ आपले काही काम करण्याकरिता आतल्या घरात गेला. तो तेथे अगदी एकटाच होता व घरात दुसरे कोणीही नव्हते.
12 अशावेळी त्याच्या स्वामीच्या बायकोने त्याचे वस्त्र धरुन त्याला म्हटले “तू माझ्यापाशी नीज.” परंतु योसेफ ते वस्त्र तिच्या हातात सोडून आतल्या घरातून बाहेर पळून गेला.
13 तेव्हा योसेफ आपले वस्त्र आपल्या हाती सोडून पळून गेला हे तिने पाहिले. खोटे बोलून या घटनेचा अर्थ उलट करायचा असे तिने ठरवले.
14 आणि तिने आरडा ओरडा करुन बाहेरील माणसांना बोलावले. ती म्हणाली, “पाहा, हा इब्री तरुण गुलाम आमच्या घरच्या माणसांची अब्रू घेण्यासाठी येथे आणून ठेवला आहे. त्याने आत येऊन माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी मोठयाने आरडा ओरडा केला;
15 त्यामुळे घाबरुन हे त्याचे वस्त्र माइयापाशी टाकून तो पळून गेला.”
16 तेव्हा तिने आपला नवरा, योसेफाचा स्वामी घरी येईपर्यंत ते वस्त्र आपल्याजवळ सांभाळून ठेवले.
17 आणि आपला नवरा घरी आल्यावर तिने त्याला तीच गोष्ट सांगितली. ती म्हणाली, “तुम्ही हा जो इब्री तरुण गुलाम घरी आणून ठेवला आहे त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
18 परंतु तो माझ्याजवळ आल्यावर मी आरडा ओरडा केला म्हणून तो घाबरून आपले वस्त्र टाकून पळून गेला;”
19 आपल्या बायकोचे बोलणे एकल्यावर योसेफाच्या स्वामीचा राग खूप भडकला.
20 राजाच्या शत्रूंना डांबण्यासाठी एक तुरुंग होता. तेव्हा पोटीफराने योसेफाला त्या तुरुंगात टाकले. योसेफ त्या तुरुंगात राहिला.
21 परंतु परमेश्वर योसेफाबरोबर होता; आणि योसेफावर परमेश्वराची दया सतत राहिली; काही काळानंतर तुरुंगाच्या अधिकाऱ्यास योसेफ आवडूं लागला.
22 त्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व कैद्यांना योसेफाच्या स्वाधीन केले योसेफ; त्यांचा प्रमुख होता तरी पण तोही त्यांच्या सारखेच काम करी.
23 तुरुंगाच्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व गोष्टीसाठी योसेफावर विश्वास ठेवला; परमेश्वर योसेफाबरोबर होता म्हणून हे सर्व काही झाले. योसेफ जे काही करी त्यात परमेश्वर त्याला यश देई.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel