1 याकोब (इस्राएल) आपली मुले व त्यांची कुटुंबे यांच्या बरोबर मिसरला गेला, इस्राएलाची मिसरला गेलेली मुले ही:
2 रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा
3 इस्साखार, जबुलून, बन्यामीन;
4 दान, नफताली, गाद व आशेर.
5 त्याच्या वंशाचे हे एकूण सत्तरजण होते. (त्याच्या बारा मुलांपैकी योसेफ हा अगोदरच मिसरमध्ये होता.)
6 काही काळानंतर योसेफ, त्याचे भाऊ व त्या पिढीतील सर्व लोक मरण पावले.
7 परंतु इस्राएल लोकांना पुष्कळ मुले झाली आणि त्यांची संख्या वाढत गेली; ते लोक महाप्रबल झाले आणि सर्व मिसर देश त्यांनी भरून गेला.
8 नंतर मिसर देशावर नवीन राजा राज्य करु लागला. योसेफ व त्याची कर्तबगारी याची त्याला माहीती नव्हती.
9 तो आपल्या लोकांना म्हणाला, “ह्या इस्राएल लोकांकडे पाहा; देशात ते फार झाले आहेत! आणि ते आपल्यापेक्षा संख्येने अधिक आहेत व शक्तीमानही झाले आहेत;
10 त्यांची वाढ थांबवावी म्हणून आपण काहीतरी उपाय योजना केलीच पाहिजे. जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे इस्राएल लोक आपल्या शत्रुला जाऊन मिळतील; आणि मग ते आपला पराभव करुन आपणापासून निसटून जातील.”
11 तेव्हा इस्राएल लोकांस त्रास देऊन त्यांचे जीवन कष्टमय व कठीण करावयाचे असे मिसरच्या लोकांनी ठरविले, म्हणून त्यांनी, गुलामाकडून बिगार कामे करुन घेण्यासाठी जसे मुकादम नेमतात तसे इस्राएल लोकावंर मुकादम नेमले. त्या मुकादमांनी राजाकरिता पिथोम व रामसेस ही दोन शहरे जबरदस्तीने इस्राएल लोकांकडून बांधून घेतली; राजाने या दोन शहरांचा धान्य व इतर वस्तु साठवून ठेवण्यासाठी उपयोग केला.
12 मिसरवासीयांनी इस्राएल लोकावंर अधिक कठीण व कष्टाची कामे लादली; परंतु जसजसे ते त्यांच्यावर अधिक कष्टाची कामे लादू लागले तसतसे इस्राएल लोक अधिकच संख्येने वाढत गेले व अधिकच पसरले;
13 आणि मग मिसरवासीयांना त्यांची अधिकच भीती वाटू लागली; म्हणून त्यांनी त्यांच्यावर अधिक कष्टाची कामे लादली.
14 अशा प्रकारे मिसरवासीयांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केलें; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, घाण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीन व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.
15 इस्राएली स्त्रिया बाळंत होताना त्यांना मदत करणाऱ्या शिप्रा व पुवा नावांच्या दोन इब्री म्हणजे इस्राएली सुइणी होत्या. मिसरच्या राजाने त्यांना आज्ञा केली.
16 तो म्हणला, “तुम्ही इब्री स्त्रियांना बाळंतपणात सहाय्य करण्याचे काम चालू ठेवा. त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा; परंतु त्यांना मुलगा झाला तर त्याला अवश्य मारून टाका.”
17 परंतु त्या सुइणा देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या म्हणून त्यांनी राजाची आज्ञा मानली नाही; त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले.
18 तेव्हा मिसरच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही जन्मलेल्या मुलांना का जिवंत ठेवले?”
19 सुइणी म्हणल्या, “ह्या इब्री म्हणजे इस्राएली स्त्रिया मिसरच्या स्त्रियांपेक्षा फार ताकदवान आहेत; आम्ही सुइणी त्यांच्याकडे जाऊन पोहोंचाण्यापूर्वीच त्या बाळंत होतात.”
20 त्या सुइणींच्या कामाबद्दल देवाला आनंद झाला; त्याबद्दल देवाने त्यांचे कल्याण केले वे त्यांची घराणी स्थापित केली;
21 इस्राएल लोकांना अधिक मुले होत राहिली; ते संख्येने फार वाढले व फार बलवान झाले.
22 तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा दिली, “त्या लोकापैकी ज्यांना मुलगा होईल तो प्रत्येक मुलगा नाईल नदीत फेकून द्या पण मुलगी मात्र जिवंत ठेवा

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel