1 मोशे व अहरोन इस्राएल लोकांशी बोलल्यानांतर फारोकडे गेले व त्याला म्हणाले, “इस्राएल लोकांचा देवम्हणतो, ‘माझ्या लोकांना माझ्या सन्मानाकरिता उत्सव करावयास रानात जाऊ द्यावे.”‘
2 परंतु फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? आणि मी त्याचे का ऐकावे? मी इस्राएल लोकांना का जाऊ द्यावे? तुम्ही परमेश्वर म्हणता तो कोण आहे हे मला माहीत नाही. म्हणून इस्राएल लोकांस मी जाऊ देत नाही.”
3 मग अहरोन व मोशे म्हणाले, “इब्री लोकांचा म्हणजे इस्राएल लोकांचा देव आम्हाशी बोलला आहे. म्हणून आम्हाला रानात तीन दिवसांच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर या करिता यज्ञार्पण करु द्यावे अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाही तर कदाचित् त्याला फार राग येईल व तो रोगराईने किंवा तलवारीने आमचा नाश करेल.”
4 परंतु फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही त्रास निर्माण करून घेत आहात! तुम्ही लोकांना काम करू देत नाही; तुम्ही त्यांच्या कामात अडथळा आणीत आहात! त्या गुलामांना आपल्या कामावर माघारी जाण्यास सांगा!
5 येथे खूप कामगार आहेत आणि त्यांना काम करण्यापासून तुम्ही रोखत आहात!”
6 त्याच दिवशी इस्राएल लोकांचे काम अधिक खडतर करण्यासाठी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली.
7 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही ह्या लोकांना विटा बनविण्याकरिता आज पर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणण्यास सांगा.
8 तरी परंतु पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनविल्या पाहिजेत. ते आळशी झाले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या देवाला यज्ञ करण्यासाठी त्यांना जाऊ देण्याविषयी ते मला विचारत आहेत.
9 तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग मोशेच्या खोट्या गोष्ठी ऐकण्यास त्यांना वेळ मिळणार नाही.”
10 म्हणून मिसरचे मुकादम व इस्राएली किंवा इब्री नायक इस्राएल लोकांकडे जाऊन म्हणाले, “फारोने तुम्हाला विटा बनविण्यासाठी लागणारे गवत न देण्याचे ठरवले आहे.
11 तेव्हा तुम्हाला लागणारे गवत तुम्ही स्वत:च आणले पाहिजे म्हणून आता जाऊन तुमच्यासाठी गवत आणा परंतु पूर्वीइतक्याच विटा तुम्ही बनविल्या पाहिजेत.”
12 म्हणून मग इस्राएल लोक गवत शोधण्याकरिता सर्व मिसर देशभर पांगले.
13 त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरिता त्याच्या मागे सतत तगादा लावीत.
14 मिसरच्या मुकादमांनी लोकांवर इब्री म्हणजे इस्राएली नायक नेमले होते. लोकांनी केलेल्या कामासाठी त्यांना जबाबदार धरले जाई. मिसरचे मुकादम इस्राएली नायकांना मारीत व म्हणत, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवीत होता तेवढ्या आता का बनवीत नाही? तुम्ही जर त्यावेळी तेवढ्या विटा करीत होता तर मग आताही तेवढ्याच विटा करु शकला पाहिजे!”
15 मग इस्राएली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, “आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशाप्रकारे का वागत आहा?
16 तुम्ही आम्हाला गवत देत नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा बनविण्याचा हुकूम करता. आणि आता आमचे मुकादम आम्हाला मारतात. अशा रीतीने तुमचे लोक जे करीत आहेत ते चुकीचे आहे.”
17 फारोने उत्तर दिले, “तुम्ही लोक आळशी आहा. तुम्हाला काम करायला नको आणि म्हणूनच तुम्हाला जाऊ देण्याविषयी तुम्ही मला विचारता आणि त्या करिताच तुम्हाला येथून निघून जायला आणि तुमच्या परमेश्वराला यज्ञ करावयास पाहिजे.
18 आता आपल्या कामावर माघारी जा. आम्ही तुम्हाला गवत देणार नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा तुम्ही केल्या पाहिजेत.”
19 आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा करून दे त्यांना शक्य नव्हते.
20 फारोच्या भेटीनंतर परत जाताना त्यांना मोशे व अहरोन भेटले; ते नायकांसाठीच थांबले होते.
21 तेव्हा ते मोशे व अहरोनास म्हणले, “आम्हाला जाऊ द्यावे असे फारोला विचारून तुम्ही मोठे वाईट केले. फारो व त्याचे अधिकारी यांच्या मनात आमच्या विरुद्ध द्वेष निर्माण केल्याबद्दल परमेश्वर तुम्हाला शिक्षा करो. आम्हास मारून टाकण्यास तुम्ही त्यांना चांगले निमित्त दिले आहे.”
22 मग मोशे परमेश्वराची प्रार्थना करीत म्हणाला, “प्रभु तुझ्या लोकांसाठी ही वाईट गोष्ट तू का केलीस? तू मला इकडे का पाठवलेस?
23 मी फारोकडे जाऊन तू मला सांगितलेल्या गोष्टी त्याला सांगितल्या. परंतु त्या वेळेपासून तो लोकांशी अधिक कठोरपणे वागत आहे. आणि त्यांच्या मदतीकरिता तू काहीच केले नाहीस!”