1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर असेन मी तुला फारोसाठी देव असे केले आहे; आणि अहरोन हा तुझा संदेष्टा होईल;
2 मी तुला सांगतो ते सर्व तू अहरोनाला सांग; मग माझे सर्व बोलणे तो फारोला सांगेल आणि मग फारो इस्राएल लोकांना हा देश सोडून जाऊ देईल.
3 परंतु मी फारोचे मन कठोर करीन. मग मी मिसरमध्ये अनेक चमत्कार दाखवीन. तरीही फारो ऐकणार नाही.
4 तेव्हा मग मी मिसरच्या लोकांना जबर शिक्षा करीन आणि त्या देशातून माझ्या सर्व लोकांना मी बाहेर काढीन
5 तेव्हा मिसरच्या लोकांना समजेल की मी परमेश्वर आहे मी मिसरच्या लोकांविरुद्ध होईन आणि मग त्यांना कळेल की मी परमेश्वर आहे मग मी माझ्या लोकांना त्यांच्या देशातून बाहेर घेऊन जाईन.”
6 मग मोशे व अहरोन यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले.
7 ते फारोबरोबर बोलले तेव्हा मोशे ऐंशी वर्षाचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षाचा होता.
8 परमेश्वर मोशेव अहरोन यांना म्हणाला,
9 “फारो तुम्हाला मी पाठविल्याचा पुरावा म्हणून एखादा चमत्कार करून तुमचे सामर्थ्य दाखविण्या विषयी विचारील तेव्हा अहरोनाला आपली काठी जमिनीवर टाकण्यास सांग म्हणजे फारोच्या देखत त्या काठीचा साप होईल.
10 तेव्हा मोशे व अहरोन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे फारोकडे गेले. अहरोनाने आपली काठी जमिनीवर टाकली. तेव्हा फारो व त्याचे सेवक यांच्या देखत त्या काठीचा साप झाला.
11 तेव्हा फारो राजाने आपले जाणते व मांत्रिक बोलावले; तेव्हा मिसरच्या त्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर अहरोनाप्रमाणे केले.
12 त्यांनीही आपल्या काठ्या जमिनीवर टाकल्या तेव्हा त्यांचेही साप झाले परंतु अहरोनाच्या काठीच्या सापाने त्यांचे साप गिळून टाकले.
13 तरीही परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे फारोचे मन कठोर झाले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही व इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
14 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोचे मन कठीण झाले आहे; तो इस्राएल लोकांना जाऊ देत नाही.
15 उद्या सकाळी फारो नदीवर जाईल; तू साप झालेली काठी बरोबर घे आणि नाईल नदीच्या काठी त्याला भेटाक्यास जा.
16 त्याला असे सांग, ‘इब्री म्हणजे इस्राएल लोकांचा देव परमेश्वर याने मला तुझ्याकडे पाठवले आहे व त्याच्या लोकांना त्याची उपासना करावयास रानात जाऊ दे, असे तुला सांगण्यास मला बजावले आहे. आतापर्यंत तू परमेश्वराचे ऐकेले नाहीस.
17 तेव्हा परमेश्वर म्हणतो की मी परमेश्वर आहे हे त्याला अशावरून कळेल: मी नाईल नदीच्या पाण्यावर ह्या माझ्या हातातील काठीने नडाखा मारीन तेव्हा नदीच्या पाण्याचे रक्त होईल.
18 मग पाण्यातील सर्व मासे मरतील. नदीला घाण सुटेल आणि मिसरचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत.”
19 परमेश्वर मोशेला म्हाणाला, “आपली काठी मिसरमधील नद्या, नाले, तलाव व जेथे पाणी भरून ठेवतात त्या जागेवर उगारण्यास अहरोनास सांग म्हणजे त्याने तसे केल्यावर सर्व पाण्याचे रक्त होईल, घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात भरलेल्या पाण्याचे देखील रक्त होईल.”
20 तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी उगारली नाईल नेदीवर मारली. त्याने हे फारो व त्याचे अधिकारी यांच्यासमोर केले. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त झाले.
21 नदीतले मासे मेले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकेनात. अवघ्या मिसरभर रक्तच रक्त झाले.
22 मिसरच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसेच केले. तेव्हा परमेश्वराने संगितल्याप्रमाणे फारोचे मन कठीण झाले.
23 मोशे व अहरोन यांनी केलेल्या चमत्काराकडे फारोने लक्ष दिले नाही; तो मागे फिरला व आपल्या घरी निघून गेला.
24 मिसरच्या लोकांना नदीचे पाणी पिववेना म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी झरे खणले.
25 परमेश्वराने नाईल नदीला दिलेल्या तडाख्याला सात दिवस होऊन गेले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel