1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “होमर्पणाकरता बाभळीच्या लाकडाची साडेसात फूट लांब, साडेसात फूट रुंद व साडे चार फूट उंचअशी चौरस वेदी तयार कर.
2 वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चार शिंगे बनवावी; प्रत्येक शिंग त्याच्या कोपऱ्यास जोडावे म्हणजे ते सर्व सलग व अखंड दिसेल; मग वेदी पितळेने मढवावी.
3 “वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे व अग्नीपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी.
4 तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी.
5 ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखालीं, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी.
6 “वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व ते पितळेने मढवावेत.
7 ते वेदीच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
8 वेदीच्या बाजूंना फव्व्या बसवाव्यात; पर्वतावर मी तुला दाखविल्याप्रमाणे ती तयार करावी.
9 “पवित्र निवास मंडपाला अंगण तयार कर; त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची पन्नास यार्ड(वार) लांबीची कनात बनवावी.
10 तिच्याकरिता वीस खांब करावेत व त्यांच्यासाठी पितळेच्या वीस बैठका बनावाव्यात; खांबाच्या आकड्या व पडद्याचे गज चांदीचे करावेत.
11 वेदीच्या उत्तर बाजूसही दक्षिण बाजूप्रमाणे पन्नास यार्ड (वार) लांबीची कनात, तिच्यासाठी वीस खांब, पितळेच्या वीस बैठका आणि चांदीच्या आकड्या व गज हे सर्व असावे.
12 “अंगणाच्या पश्चिम बाजूस पडद्यांची पंचवीस यार्ड(वार) लांबीची एक कनात असावी; तिला दहा खांब व खांबांना दहा खुर्च्या असाव्यात.
13 अंगणाची पूर्वेकडील म्हणजे प्रवेश द्वाराकडील बाजूही पंचवीस यार्ड (वार) असावी.
14 अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला साडे सात यार्ड(वार) लांबीची पडद्याची कनात असावी; ह्या बाजूस तीन खांब व तीन खुर्च्या असाव्यात;
15 फाटकाच्या दुसऱ्या बाजूलाही तेवढ्याच लांबीची पडद्याची कनात, व तिलाही तीन खांब व तीन खुर्च्या हे सर्व असावे.
16 “अंगणाच्या फाटकासाठी निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा दहा यार्ड (वार) लांबीचा पडदा असावा व त्यावर नक्षीचे विणकाम असावे; पडद्यासाठी चार खांब व चार खुर्च्या असाव्यात.
17 अंगणाभोवतीचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्टयांनी जोडलेले असावेत; त्यांच्या आकड्या चांदीच्या व खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
18 अंगण पन्नास गज लांब व पंचवीस गज रुंद असावे; अंगणाभोवतीची पडद्याची कनात अडीच गज उंच असावी व ती कातलेल्या तनलम सणाच्या सुताची बनविलेली असावी; आणि तिच्या खांबाच्या खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
19 पवित्र निवास मंडपातील सर्व उपकरणे, तंबूच्या मेखा आणि इतर वस्तू आणि अंगणाभोवतीच्या कनातीच्या मेखा पितळेच्या असाव्यात.
20 “इस्राएल लोकांनी दीपवृक्ष सतत जळत ठेवण्यासाठी जैतुनाचे उत्तम तेल रोज संध्याकाळी आणावे अशी तू त्यांना आज्ञा कर;
21 अहरोन व त्याची मुले यांनी दिवा जळत ठेवण्याची काळजी घ्यावी; अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शन मंडपात त्यांनी जावे; आणि तो दीपवृक्ष संध्याकाळापासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची खातरीने सोय करावी; हा इस्राएल लोकांसाठी व त्यांच्या वंशासाठी पिढ्यान्पिढ्या कायमचा विधी आहे; तो त्यांनी पाळलाच पाहिचे.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel